Sunday, August 9, 2020

हुरहूरीची लकाकी...


 हे पावसाचे अखंड
निनादे बरसगाणे
चांदण्याचे आभाळ
चकाकण्या तरसवाणे

ढगाच्या अंतरंगाला
भिजल्या चांदण्याचा स्पर्श
विजेच्या चकाकण्याला
लगडे पावसाचा हर्ष

मी चांद धुंडी पुर्ण
रात झडीचे पर्व
कोरड्या दृष्टी आसात
ओल दाटते सर्व

मी झडप पावसाची
झेलून घेतो तनी
ओल वाहते धमन्यात
प्राचीन ती जुनी

मी सागराला भेटतो
आत नदी कसली वाहते
लाट तुझी अनावर
उधाणाला पाहते

वाहत्या पाण्याचा
ढगास ध्यास लागे
आभाळाच्या पडद्याआड
चांदणे सारे जागे

ती लुकलुक ते चमकणे
सारे ढगात आटते
पावसाच्या मनात हे
कसले चांदणे दाटते?

कुट्टकाळ्या ढगाआड
चांदण बहर उसळतो
मग पाऊसच होवून चांदणे
मातीवरती कोसळतो

पावसास बिलगे माझ्या
तुझ्या चांदण्याची चकाकी
हिरव्या चिखलात रूजते
मग हुरहुरीची लकाकी...
Pr@t@p
" रचनापर्व "
9/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com














No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...