Thursday, August 13, 2020

पहाडाचे ओले स्पंदन.....



नदीस लागे अनावर
समर्पणाचा जोग
सागराच्या अंतरी
स्थिरतेचा भोग

दरी भरून घेते
धुक्याने ओटी
कळ्या अनावर सा-या
घेण्या सुगंधभेटी

साचल्या धुक्याचे
हे व्याकुळवेडे कुळ
दरी शोधत असते
रुतल्या अंधाराचे मुळ

ढगास जडते विरळपण
पाऊस हवेत फिरतो
हिरवळीच्या हृदयावर
थेंब एकला झुरतो

धुन गाता वारा
झुळुकीचे थवे
गीत मनात येते
शब्द घेवून नवे

पहाड निश्चल उभा
अंबर थिरकत राही
विजेच्या सावलीला
प्रकाश स्पर्शत नाही

तुझ्या मनाची सर
माझा पाऊस पाडी
निरोप कसला ढगातुन
वारा मनास धाडी

दरी सजवत राहते
ओले हिरवे हसे
ढगाच्या काळजावर
तुझ्या अस्तित्वाचे ठसे

मी पाऊस पहात राही
घेवून तुझी दृष्टी
माझ्या साचल्या मनातुन
तुझ्या आठवणींची वृष्टी

दरी भरून येते
पावसाचे रणकंदन
दुर गुहेत घुमते
पहाडाचे ओले स्पंदन.....
Pr@t@p
" रचनापर्व "
14/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com







No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...