खडकांचा ॠतु आता
झाला गर्द हिरवा
हवेच्या मनातुन
शिलगतो गारवा
पाऊस देतो घडाभर
पाण्यासाठी हाका
जोगी मोजत बसतो
सरींच्या पैंजणी चुका
मातीच्या काळजावर
पाऊस हंगाम रेखी
अवकाश कशाला धडे
इइंद्रधनुचे घोकी?
हवा उद बनून जळते
झुळुकीस येतो गंध
ढगाच्या ओंजळीत तेवे
पाऊस दिवा मंद
पंखावर सजते इंद्रधनु
झेप अवकाशाला भिडते
मझारीच्या भिंतीआड
मन कुणाचे रडते?
बिंब चंद्राचे नाही तरी
खिडकी चमकून उठते
स्पर्शुन तुझ्या अस्तित्वाला
वा-याला उधाण सुटते
दिव्याभोवती ओंजळ धर
वा-याचा नेम नाही
जरी दिसते हिरवळ गर्द
तरी हंगाम क्षेम नाही
मी पाऊस देतो पाठवून
तुझ्या खिडकीस पडावी भुल
ओंजळीतील दिव्याला लगडो
मग चांदण्याचे फुल
घरभर चांदणे सांडावे
तु चंद्रसभा भरवावी
सरीची चुकभुल मी
ओल्या ढगाखाली गिरवावी
चांदणे आभाळात यावे
मातीत पाऊस नांदावा
तुझ्या माथ्याच्या नभावर
मी चांद पुनवेचा गोंदावा.....
Pr@t@p
" रचनापर्व "
19/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment