Friday, September 11, 2020

गुमगश्ता वैरागी......

या नभगंधी घटिका
सांज गुलशन चिरागी
मनात गुमगश्ता
हसतो एक वैरागी

नजाकत चांदण्याला
घायाळ चंद्रबिंब
चांदण्याचा पदर हो
चंद्रतळ्यात ओला चिंब

ही गुलझार झरती सांज
नजाकती पैंजण वाट
झुळुक हवेची चुंबे
भारावले ललाट

खडकाच्या काळजावर
शब्दांच्या बंदिशीचे साज
अस्पर्शीत ओठावर
थरथरते अजूनही लाज

चिराग पेटून उठती
जज्बा तम जाळण्याचा
गज-याला सुगंध येई
जश्न माळण्याचा

जिव थरारून जाई
ओलविहीन पाणी
फकिराची बंदिगी दैवी
असर पेरती गाणी

भरून जाते पारिजाताने
रिते पडले पात्र
जिव बावर होई
सुगंधस्पर्शी गात्र

फैसला मुशाफिरीचा
रस्त्याला उडते धुळ
मी शोधे सांजआत्म्यात
माझ्या कवितेचे कुळ

नवनव्या शब्दातुन
तेच प्राचिन सांगणे
फरिश्त्यांचे पैगाम
झोळीला टांगणे

मी देतो चांदण्याला नित्य
चंद्रप्रकाशी साज
तु राखत असते माझ्या
शब्दांचा समर्पी बाज
○Pr@t@p○
" रचनापर्व "
10/09/2020
BLOG#prataprachana.blogspot.com





No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...