Thursday, September 3, 2020

चांद उजेड विसरावा.....

 हे !आभाळ तुकड्या तु
खिडकीत निरंजन लाव
उजळून निघेल अंधाराचे
सांज दाटले गाव

कंदिल कशाला डकवू
वातीचे काळीज दाटे
मुक बहर फुलवती
झाडाचे हिरवे फाटे

संधेच्या पारावर पिंपळ
रातीस निरखुन घेतो
सांजदाटला रस्ता
उगाच हरखून घेतो

सुर्य अस्ताची ही
उमलणारी कळी
मी टिपून घेई अलगद
गालावरली खळी

सरणा-या सांजेत
ही रात कुठुन साचते
माझ्या शब्दांचे मन हळवे
कोण अलवार वाचते

मी रातीच्या कुंचल्याने
रंगीत चित्र रेखी
उजळून निघण्यासाठी
जळे वात एकली मुकी

दुर पारावर
हा नाद कसला घुमतो
राउळाचा गाभारा
पायरीत कशाला रमतो

एकतारीचे आर्जव
गित मनास भिडते
रातीचे शिंपल मोती
मन चांदण्यावर जडते

भरलेली ओंजळ असता
पदर कशास पसरावा?
तुझ्या चांदण्याच्या पदराखाली
 चांद उजेड विसरावा.....!
Pr@t@p
" रचनापर्व "
03/9/2020
BLOG#prataprachana.blogspot.com











No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...