ही कसली ओल साचते, कुठे कुणाच्या घरभर?
हे निशीगंधाचे सडे,आकाशी माणिकखडे
रात तरीही कसली,काळीकभिन्न चढे?
उधार घेतला चंद्र,कलेकलेने परत यावा
सांजेच्या काळजातला,अंधार सरत जावा
ती उतरंड कशाची रचली,तो संदूक मुक का बसला
मेहंदिचा कोना हिरवा,नक्षितुन उदास हसला
आठवते का झाड?,पक्षांचा होता डेरा
निष्पर्ण फांद्या भोगती, आता थंड बोचरा वारा
उदास बहर झाला,पक्षी उडून गेले
त्या झाडाखाली काल, पंख रडून गेले
त्या अश्रुंच्या ठशाला,मी ओळख कशास द्यावी?
शिशिराच्या सांजपारी, जणू पावश्याने गाणी गावी
तुझ्या आठवांचे डोंगर,अंधूक होतात म्हणून
तु दिवे कशाला चिणावे?, कडे कपारे खणून
आता माळ आवडत नाही, तेेेथे गाई जमत नाहीत
बासरीचे सुरही आता, यमूनेशी रमत नाहीत
पाण्याची घागर बुडबुड, वाहत जाते धारा
सांज होण्या अगोदरच,का उगवे हा सांयतारा...?
कोण बावरे उभे, ही देते कोण हाक?
वा-याची झुळुकीला, का सुगंधाचा वाटे धाक?
मी पाठमोरा उभा, सुर्य बुडत असतो
मनाचा चकोर माझ्या, चंद्रदिशी उडत असतो
आल्या वाटेला,परतीची दिशा जाचते
चांदण्याच्या शब्दाची कविता, वाट मुक्याने वाचते....
Pr@t@p
" रचनापर्व "
20/09/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment