Thursday, September 24, 2020

सांजफुल.....

शिगाभर चांदणे
चंद्रउगवता वारा
झाड दडवे फांदीत
फुलांचा कोंडमारा

चांदण्याचे कळप
चंद्राची दिशाभुल
झाकुन घे सये!
पदरातील सांजफुल

लेण्यांच्या काळजाचाही
टाकावर जिव जडतो
पहाडाच्या अंतःकरणी मग
घावाचा पाऊस पडतो

स्वप्नांच्या अगम्यतेचे
दगडावर बसती घाव
पहाड तोलून धरतो
लेण्यांचे आर्त भाव

फुलपसा-याचे गुपित
चांदण्यास गोकुळधुंद
कृष्णाच्या बासरकथेत
राधेचे डोळे बंद

मी झाड एकले पाही
फुलांची ओघळ धारा
या निर्गंध सायंकाळी
का उगा बावरे वारा?

मी दिव्याचे उगवणे
खिडकीत तुझ्या पाहतो
उधाण वाराही उगाच
त्या दिशेस का वाहतो?

ओंजळ कर! दिवा जप!
वातीला होईल बाधा
मथुरेस निघत्या पावलावर
मुर्छित होईल राधा

बहर साठवून ठेव
हंगामही झालेत फितुर
कातर झाल्या सायंकाळी
जिव कशास आतुर?

जपून ठेव पेरण्या
हे आठवणींचे मोती
येता हंगामात बहर
जागवेल मग माती
Pr@t@p
" रचनापर्व "
24/09/2020
BLOG#prataprachana.blogspot.com









No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...