फांदीवर टेकला सुर्य
म्लान होत विझतो
सांजेच्या गर्भात हळवा
अंधार मुक थिजतो
ढगांची दग्धभुमी
किरणांची विझती काया
अंधारलाटा पसरती
धरणीवर काळी माया
हलकीच हुल वावटळीची
हवा अवखळ वाहते
दुरल्या वळणावर झाड
स्पर्शाची वाट पाहते
सुर्य विझत जातो
शिलगवत रातीचे दिवे
आकाश कवेत घेते
परतते पाखर थवे
गित सांजेचे बहरे
रातराणीच्या तनावर
तुझ्या गंधाचे ठसे उमटती
कवितेच्या पानावर
शिळ घुमते आभाळ
अलगद होते हंबर
रातीच्या हृदयावर लटके
शब्दचांदणी झुंबर
मी पेरत जातो शब्द
अंधार विझून जातो
शब्दांच्या कुशीत बहरून
चंद्र सजून येतो...
अंधाराच्या श्वासावर
अलगद उमलते शब्दफुल
माझ्या कवितेस पडते
नित्य तुझी... सांजभुल..
(Pr@t@p)
"रचनापर्व"
29/4/2020
prataprachana.blogspot.com














