प्राजक्त बनाच्या मनावर
रूतती आठवणीच्या टाचा
झाकल्या ओंजळीस सुगंधी
फुटून येई वाचा
डोळ्यात अगणीत प्रतिक्षा
काहूराचे बहर सांडले
हिरव्याकंच फांदिवर
हृदय जणू हे मांडले
रस्त्याच्या कडेवर
ही कसली छाया
का आतुरतो रातवा
पेरत चांदण्यावर माया
हे फुलबनाचे काफीले
हे आठवणींचे भास
बहराच्या आभासानेही
फुलांना ये सुवास
टेकडाच्या माथ्यावर
हवा गित गाते
स्पर्शून मनाचा गाभारा
का तुझ्या दिशेस वाहते?
हे आभाळ चैत्राचे
सारे खुले अवकाश
चांदव्याला सोनेरी रंग
चढतो सावकाश
उष्णमातीत अनवाणी पावले
कसली रेखतात रांगोळी
का पेटतो अवघा अवकाश
मुक, शांत, सांजवेळी?
(प्रताप)
"रचनापर्व "
21/4/2020
prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment