Thursday, April 16, 2020

फुलवातीचे बन.....


देऊळगिते,अजान
आणी अभंगाचे सुर
मनाच्या नदीला
सागरओढी पुर

फुलवातीचे बन
उजेडीगंध फुलतो
पायरवाचा रूनझुन नाद
मनात का खुलतो?

निर्माल्याचे गाणे
मनात दाटून येते
आभाळाच्या गर्ततेतुन
सांज फुटुन येते

हळदरंगी चांदणे
अंधार होई'हिरवा'
मेहंदी गंधाच्या हातचा
उडून येई पारवा

तगमगीच्या भिंतीवर
साचते एक अंधारवेळ
फुलपाखरी पंखाना
न लागे रंगीत मेळ

दिवा मनाचा जळतो
अंधाराला बिलगुन
वात उसवते एकटी
प्रकाशातुन विलगून

हुरहुरीच्या सायंकाळी
कोणाचे पैंजण वाजते?
उत्सुक,अनावर पाउलवाट
मोहरून का लाजते?
(प्रताप )
16 एप्रिल, 2020
"रचनापर्व "
prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...