आभाळ ऊंची नायका!
तु तळपता प्रज्ञासुर्य!
वंचित दुबळ्या मनाचे
तु अफाट झुंजार धैर्य..
तमात पिचल्या पिढ्यांचे
तु तममुक्तीचे पर्व
तु आमची सुरूवात
तुच आमचे सर्व..!
तु 'मानवमुक्तीचे सुक्त'
आमच्या आत्म्यावर कोरलेले
उगवू आम्ही उद्याचे सुर्य
तु धमन्यात पेरलेले..
तुझ्या प्रकाशी पावलांनी
झोपडीचे महाल झाले
थोतांड धर्ममार्तंडाचे
जगणे बवाल झाले...
तु शोधून दिला बुध्द
तु दिलेस संविधान
भारताच्या आत्म्याला तु
दिलेस समता-भान
तुला अर्पून सारे माझे
समर्पणाची आस मिटत नाही
माझ्या कवितेलाही समर्पक
शब्द फुटत नाही!
तरीही ही शब्दफुले
मी तुला मनातुन वाहतो
हे शब्दधनही तुझेच देणे!
ॠणात तुझ्या राहतो..
(प्रताप)
14/4/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com
मानवमुक्तीच्या दात्यास ही शब्द वंदना!
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटीकोटी अभिवादन!
महामानवाने दिलेले संविधान व दिलेला मार्ग अनुसरत सर्व चालो!
मानवमुक्तीच्या लढ्यास बळ मिळो!

No comments:
Post a Comment