रात प्राचीन प्रेमिका
चांद नभीचा साजण
चांदण्याच्या आत्म्यावर
हळू उमटते गोंदण..
डोंगराच्या माथ्यावर
चांद सारा सांडतो
रातीच्या प्राक्तनाशी
अंधार उगा भांडतो
आत्म्याच्या चोचीने
चकोर हळवे बोलतो
पिंपळवृक्ष सोनेरी
पट मनाचे खोलतो
मी मुका उभ्याने
घेवून हृदय पात्र
रेखत राहतो अंधारी
उजेडाचे चित्र
सुन्या माळावर अवघे
चांदणे झिरपत वाहते
चित्र जाते ओसरून
कविता शिल्लक राहते
मी शब्दाच्या आत्म्यात
शोधतो पावन क्षण
पहाटेच्या उजेडात
बहरते अंधाराचे बन
हा अंधार हा चंद्र
युगाचा लपंडाव
लागत नाही यांच्या
प्रितीचा प्राचीन ठाव...
(प्रताप)
11/4/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment