Sunday, April 19, 2020

पेटे वैशाखाचे रान.....


मनाच्या माळावर पडे
शब्दांचे देवधान
कवितेच्या पळसाने पेटे
वैशाखाचे रान

फुलांची झडती
लागे कवितेची रास
माझ्या श्वासाला
ओंजारतो बासरीचा भास

पेटत्या शब्दांना दे
तुझ्या स्पर्शाची फुंकर
शब्दाना लगडो माझ्या
तुझे पैंजणी झंकार

अंधार झोंबतो
मनी रंगाची उल्का
निनादतो पायरव
दुर वाटेवर हलका

शब्दापार कविता
आभाळाला भिडते
व्याकुळ अभंग
तार वेणूशी जुडते

ओघळतो कृष्ण
राधा ओंजळ पसरे
सावडून घेई मी
गोकुळ हसरे

काळीजझोंबी सुर
आकाशी झरतो
शब्दापार कवितेचा
मी हंगाम धरतो
(प्रताप)
19/4/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...