मैफिली सुन्या
तु नभी वसंत पेरावा
कवितेला स्पर्शावे तु
शब्दास रोमांच घेरावा
तुझ्या घडणावळीची अक्षरे
काव्य बांधत न्यावे
उसवत्या मनाच्या धाग्यांनी
मखमलीतुन सांधत यावे
लिहावी तुझ्या आत्म्यावर
कविता अमीट अमर
झेलून घ्यावेत हृदयी
सारे भावहिंदोळी समर
गायहंबरी भाव
ओळीतुन दाटून यावा
शब्दांच्या काळजाला
पान्हा फुटून यावा
पाषाणानेही कोरून घ्यावे
मखमली शब्दांचे गोंदण
गंध यावा कवितेला
जसे लेपले चंदन
खिडकीच्या तावदानातुन
बहरावी शब्दफुलाची फांदी
चकोराच्या पंखाने द्यावी
आर्त आठवणींची नांदी
चांदण्याच्या रंगाने
मी लिहीत जावे गाणे
चैत्राच्या हृदयाला लगडो
वसंत कोवळी पाने.....
(प्रताप)
24/4/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment