अंधारयुगाचे लटकन...
-------------------------
मनातल्या ओघळफुलांनी
मी चितारे शिल्प
अंतरीच्या खोल दिव्याला
उसंत नसते अल्प
सांज आभाळी,बावर वेळी
दिपकलिका नमते
तमगंधी अवकाश कडेवर
किलबील सारी जमते
अवकाशी तगमग घेवून
अंधार प्रसवे संध्या
बहरून येती आठवफुलांच्या
गहि-या रंगीत फांद्या
फुले आभाळी फुलून येती
चांदणे पायदळी सांडते
अंधाराचे काळीज घेवून
सांज प्रकाश मांडते
अंतरीचा दिवा तेवतो
बंद डोळ्यात प्रकाश दाटे
ओळखीच्या पाउलवाटी
कोण पसरले काटे?
मनाचे गहिवर खोल
सांज दाटते चटकन
तेवत राही काळजावर
अंधार युगाचे लटकन..
चांदण्याचे अंबर वेडे
हर सांजेत डळमळे
भरून येते माळरानावर
एक हसरे तळे.......
(प्रताप)
"रचनापर्व"
15/4/2020
prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment