Monday, June 29, 2020

चंदेरी धुके होते.....



या अंधारवाटाना कोण
असे सुने मन देते
फकिराच्या सारंगीला
अजब धुन देते

या काजळछटेचा अंधार
सुबक कोण रेखला
अंधारास बिलगे रातराणीचा
वेल बहरून एकला

ही कसली आलापधुन
ही कसली अभिलाषा
मुक्या मनास भारे तुझ्या
मुक्या मनाची भाषा

डोंगरकड्याच्या कपारी
चांद किरणानी भिजलेल्या
तुझ्या काजळी बटा
फुलगंधानी सजलेल्या

झाडाच्या अंतःकरणाला
फुटते बहराची वाणी
तुझ्या मनोहर बिंबाने
निर्मळ होते पाणी

चांद बुडून जातो
अंधार काळाभिन्न
उमटत असते वाटेवर
तूझे बावर पदचिन्ह

मी धाव वासरी घेई
तूझा ठाव मिळत नाही
हसत्या माळरानाला माझी
तगमग कळत नाही

नित्य पेटवतो अंधारात
तुझ्या प्रतिक्षेचे दिवे
मी निघतो माळरानाकडे
तेंव्हा परतत असतात थवे....

गाव निजेला जातो
माळ मुके होते
तुझ्या आठवणीचे मग
चंदेरी धुके होते.....
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
29/6/2020
BLOG#prataprachana.blogspot.com















Sunday, June 28, 2020

गीत अमर व्हावे......


या सुन्या आभाळाला
पावसाचा रंग द्यावा
काहिलीच्या मृदेला
तुषाराचा संग द्यावा

व्हावे ओथंब थेंब
गाव तुझे पाहण्या
आतुर पाऊस व्हावे
कोसळून वाहण्या

खिडकीच्या तावदानाला
थेंब होऊन बिलगावे
तुझ्या पाउल आभासाने
वात होवून शिलगावे

वेलीला स्पर्श करावा
फुलांना ओंजारावे
तुझ्या आभासाला
मुक नयनाने गोंजारावे

रित्या मनाचा गाभारा
तुझ्या आठवणीने भरावा
अभंगाचा आर्त नाद
हृदयात खोल झरावा

मी तुजे गाव व्हावे
सारे शिवार बनून यावे
तुझ्या पायवाटेला धुंडाळत
काजवे शिणून जावे

ढग काळे सरून सारे
आभाळ रंगीत व्हावे
तुझ्या स्मितांचे
नादमधुर संगीत व्हावे

मी शोधत रहावे तुला
जणू गाव दाटून यावा
माझ्या मनातला मुक आवाज
तुझ्या कंठात साठून यावा

मी ढगांच्या काळजावर
रंग सारे पेरून द्यावे
तुझ्या बंद नयनांनी ते
गुपीत हेरून घ्यावे

तुझ्या मनातही कधी माझ्या
आठवांचे समर व्हावे
तु नाव लिहावे माझे;
माझे गीत अमर व्हावे...
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
28/6/2020
BLOG#prataprachana.blogspot.com




Saturday, June 27, 2020

व्याकुळ चांदणे साक्षी....


माझ्या शब्दांना शहारे
तु कविता वाचताना
मातीच्या हृदयास भासे
जसे पाऊस नाचताना

कवितेच्या शब्दात उमलते
तुझ्या नजरेचे फुल
कवितेस पडते मग
तुझी काळीज भूल

नजर भाव टिपून घेते
शब्द राहती मागे
मी उकलत राहतो मुक
तुझे अस्तित्व धागे

तु प्रतिमेत लुप्त
कविता शब्दात चाचपडे
माझ्या कवितेला तु दिले
प्रतिक्षेचे धडे

मी शब्दागणिक शोधे
तुझी गोंदण नक्षी
ठेवत रातीच्या आत्म्याला
व्याकुळ  चांदणे साक्षी

तुझ्या नजरेच्या रानभुलीचा
कंच हिरवा बहर
शब्दाच्या काळजाला फुटे
समर्पणाचा स्वर

मी शब्द पेरत जातो
त्यास बिलगे तुझा छंद
कवितेच्या आत्म्याला येई
मग तुझा मंद सुगंध..
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
27/6/2020
BLOG#prataprachana.blogspot.com






Saturday, June 20, 2020

चांद डोळे मिटताना.....



झांजरल्या सांजेस
हरखुन जाती लोक
प्रकाशाच्या आत्म्याला
अंधाराचा शोक
                         आठवणीच्या फुलामागुन
                 चंद्र येतो उगवून
                   मी ही घेतो माझ्या
                        अंधार पळांना सजवून
मी चांद रोशन होतो
मन संदल होवून जळते
आळवणीच्या आर्ततेने
पायवाट पण वळते
                             जळत्या संदलाची महेक
                    आभाळ धुंद होते
                                तुझ्या रेशमी अंमलाखाली
                 रात मंद होते
मी ऐकत असतो तुझ्या
आठवणीची गाणी
मनात फुटते खळ्ळकण
गुलाब अत्तरदाणी
                         बटा व्यापत राहती
                         चांदणकांती चेहरा
                          मी उलगडत राहतो
                               त्या सुंदर स्वर्णमोहरा...
माझे हात दुव्याचे होती
तुझ्या अस्तित्वास बोलताना
ये निशीगंधी महेक हातांना
ओंजळ खोलताना
                              मी रात जागवत असतो
                               तुझ्या अस्तित्वाचा जोगी
                                  आणाभाकाच्या कळसावर
                           आसक्ती असते जागी
तु अंतरी असुनही
तुझीच उणीव भासे
का लागते चंद्रसाक्षीने
मनास तुझे पिसे...?
                                मी पाहतो रातराणीचे
                                    फुल फांदिवरून गळताना
                               वाटे पुन्हा तुज पहावे
                            तु नव्याने कळताना
दिसतो एक आशिषी तारा
उधाणुन तुटताना
व्याकुळ होते रात
चांद निजेने डोळे मिटताना...
♡pr@t@p♡
" रचनापर्व "
20/06/2020
BLOG# prataprachana.blogspot.com







Thursday, June 18, 2020

आभासाने बहरले फुल....


त्या बाभळी, त्या बोरी
ती फोफावणारी शेती
तो चिखल, ते पाणी
ती आसुस झालेली माती

ते पाखर थवे, ते आभाळ
ते पसरले पंख ,ती झेप
शेताच्या पायवटेवरील
ती बैलगाडीची घुंगर खेप

ते हाकारे,ती गोफण
ते जपले जाणारे बहर हिरवे
घराच्या आड्यावर मऊशार
घरटे विणणारे पारवे

सारेच तुला आठवतात
ते रस्ते, ती पाऊलवाट
तु असतानाचा तो
फुलबहराचा गंधित थाट

ये निघुन तुझे बहर ईथे
फुलण्यासाठी आतुर
दाटून येत्या सांजेला
अंधार ही हो फितुर

तो वितळणारा चांद
ते बावर होते चांदणे
ते श्वासाच्या आभासाने
मोहरून उठणारे गोंदणे

ती आर्त सायंकाळ
ती घुमती पाखरशिळ
हात आतुर उलगडण्या
बटास पडला पिळ...

हे आठवणीचे साखरदाणे
ही गोडव्याची पेरणी
या सांजेस तुझा सहवास
ती लागावी सत्कारणी....

तुझ्या गेल्या पावलांना
पडावी माझ्या वाटेची भुल
तुझ्या निव्वळ आभासाने पहा
फांदिवर बहरून आले फुल
♡pr@t@p♡
" रचनापर्व "
19/06/2020
BLOG# prataprachana.blogspot.com 

व्याकुळ झाल्या नभास.....


अवकाशाच्या मनात
हळव्या छटा घडल्या
ओला झाला रस्ता
काळीजसरी पडल्या

हे पाखरपंखी मन
चिंब ओले झाले
पावसाचे उधाण अबोल
विझत्या सांजेस बोले

फुलापानांचे सडे
रस्त्यावर कोसळून गेले
ढगांचे काळीज मातीच्या
हृदयात मिसळुन गेले

हे ओले नाते भारते
रातीच्या अंधारवेळा
मी माळत राहतो मनात
तुझ्या अस्तित्वाच्या माळा

मी रात जागल्या होतो
पाउस दिवा पेटतो
अनोळख्या पायवाटेला मग
ओला रस्ता भेटतो

सारेच ओघळताना
थेंब सडा नाचतो
ऊधाणफुटला पाऊस
मनात माझ्या साचतो

काही थेंब तु ही घे
बहरून येईल अंग
मातीच्या काळजाला
लगडेल हिरवा रंग

हा नसतो नुसता पाऊस
तो असतो काळीजगाणे
त्याच्या साध्या स्पर्शाने
बहरून येती पाने

मी चालत निघतो दुर
पाऊस मनावर झेलत
मुक मनास ढगांचे
काळीज असते बोलत

मी तुझे अत्तर शोधत
ओलांडतो अगणित सरी
तुझ्या ढगाचे पाऊस
येती दाटून माझ्या उरी

मी चिंब ओला होतो
तुझ्या स्पर्शाचा आभास
मी पाऊस ऊधार देतो
तुझ्या व्याकुळ झाल्या नभास......!
♡pr@t@p♡
" रचनापर्व "
18/06/2020
BLOG# prataprachana.blogspot.com

















Monday, June 15, 2020

मातीच्या हृदयात भरते....


सखे! तुझा पाऊस!
सारेच कंच ओले
ढगाचे मन बावरे
मातीस मुक बोले

कोसळत्या थेंबासवे
वाहून जाते माती
उगवून येती हिरवी
घट्ट ओली नाती

सर अनाहुत येते
सजते हिरवे रान
नदीच्या काळजाला
ये गुलाबी उधाण

मी तुझा पाऊस
मनात सजवत राहतो
मातीच्या हृदयावर
हिरवाई रूजवत राहतो

तु पाऊस शिवारी पडता
अन् अंगणी नाचणारा
माझ्या मनाचा ओथंब
बंद नयनाने वाचणारा

गरजते आभाळ कधी
कधी वाहतो उधाण वारा
वाटून घेवू आपल्या
अलगद झरती धारा

ओल हृदयास फुटते
तु थेंब मनात रूजलेला
तु नित्यनियमीत पाउस
माझ्या खिडकीत सजलेला

तुझ्या पावसाचे सोहळे
आभाळ सारे झरते
थेंबाचे असलेपण
मातीच्या हृदयात भरते..
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
15/6/2020
BLOG#prataprachana.blogspot.com












Thursday, June 11, 2020

पैंजणाचा नादभैरवी....


तुझ्या आभासी स्वप्नांची
जागत्या रातीस साद यावी
स्वतःत हरवल्या अस्तित्वाची
अशी गहरी याद यावी

या स्वप्नांच्या हृदयाला
ही कसली डागणी
मी मुकपणे पुरी करावी
तुझ्या वेदनेची मागणी

तु ढवळून अंतरंग
तुलाच शोधून घ्यावे
आत्म्याचे खोल अस्तर
सापडेतो खोदून घ्यावे

तु आणि तुच
दुसरे कोण राहील
नदीचे पाणी हरयुगी
सागरओढीने वाहिल

तु नसल्या घटीकेत
मी अनाथ रातीशी बोलतो
तु दिल्या जखमांचे
पट नित्य खोलतो

वेठीस धरला वसंत आता
फुलणे विसरून गेला
अवकाशाच्या काळजातुन
चांद घसरून गेला

अंधार गलबलून येतो
रात कसली चाहूल टिपते
पैंजणांचा नादभैरवी
मन बावरे जपते

पण नदीने सोडले पात्र म्हणून
शेत सोडता येत नाही
कोणाची नसली साथ म्हणून
वाट मोडता येत नाही
♡pr@t@p♡
"रचनापर्व "
11/6/2020
BLOG# prataprachana.blogspot.com


Wednesday, June 10, 2020

पाऊस पडून जाईल...


या ढगांना आत्मा द्यावा
की हवेस द्यावा रंग
अवकाशाची रिक्तता
का सांजेत होई दंग

तु नसल्या पावसाचे
हे कसले थेंब पडती
काजळाच्या तिटेतुन
मी रात चोरतो चढती

तु गेल्या बहराच्या जखमा
अजून हिरव्या ओल्या
गंधाळल्या फुलझडीने
भरून गेल्या खोल्या

ही परकी आग कसली
मनात जाते धुमसून
परसातला निशीगंध
रडतो का हमसून?

नाहीच कोणी आपले
म्हणून पायवाट थांबत नाही
आहे कुट्ट काळी म्हणून रातीचे
आयुष्य लांबत नाही

थवे गेले उडून म्हणून
झाड रडत नाही
करते आकांत माती म्हणून
पाऊस पडत नाही

थोडे ढग इकडेही पाठव
पाऊस पडून जाईल
थेंबाच्या स्पर्शातुन तोकडी
भेट आपली घडून येईल
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
10/06/2020
BLOG#prataprachana.blogspot.com



Sunday, June 7, 2020

शब्दांना 'बरकत'आहे...


सुचेल एखादी 'नायाब गझल'
प्रतिक्षेस काय हरकत आहे?
तु नाहीस .....तरीही इथे
माझ्या शब्दांना 'बरकत'आहे !

तु नसल्याने खिडकीत
दिवे लागत नाहीत
माझे शब्दही मग तुला
कविता मागत नाहीत

दिव्याऐवजी मी शब्द पेटवतो
देत स्वतःस उजेडाचे दान
बहरून येते कंचहिरवे
मग एकट माळरान

माझ्या शब्दांचे 'मुसाफिर'येतात
आतुर होतात तुझे दिवे
फकिराच्या झोळीतुन ओघळतात
मग खैरातीचे 'दुवे'

बहि-या मनास का द्यावी
मी गहि-या आर्जवाची आण?
मुकशब्द ही टिपायला
लागती आर्त उत्सुक कान

म्हणतात तुटण्यापुर्वी ताराही
अवकाशात बांधतो एक 'समा'
मी तुटल्याता-यांचे अवशेष करतो
कवितेत अलगद जमा

कधी लागलेच तुझ्या शहरास कोळिष्टके
तर मला ऋतु पेरावे लागतील...
आणलेत काही बहर मी ..जाणुन
तुझ्या कळ्या गंध उधार मागतील...
♡Pr@t@p♡
"रचनापर्व"
(गझलेचे काही शब्द...)
7 जुन 2020
BLOG# prataprachana.blogspot.com





Saturday, June 6, 2020

मुकशब्दास वाचणारा....


खिडकीच्या तावदानावर ओघळे
थेंबांची व्याकुळ....नक्षी
या ओथंबप्रहरास मी...
आणी माझे शुन्यभाव साक्षी

तेही मुके..मीही अबोल...
दोघेही साचतो स्तब्ध..
अव्यक्त कवितेचे जणु
ओथंबलेले प्रारब्ध

अंधार पावसात साचे
थेंबाचा देह निळा 
तिमीरवैरागी मनास लागे
सांजबावरा लळा..

या ओल्या पाऊसवेळा
मनास पाझर फुटतो
कोसळणा-या थेंबासाठी
मातीचा जिव तुटतो..

निर्जीव काचावर उमटते
तुझी सांजरंगी छाया
ओथंब कवितेस माझ्या
मिळते ओली शब्द काया

मी थेंबाना ठेवून साक्षी
झंकारतो तुझे गीत 
हरशब्दातुन वाहती
हाका ओल्या अगणीत..

अंधार गडद होतो
थेंब निजुन जाती..
दिवेलागणी वेळी 
मग हिरमुसतात वाती..

मी अंधारात पाउस पाहतो
खिडकीखाली साचणारा..
मी आठवतो तो कटाक्ष 
माझ्या मुकशब्दास वाचणारा.....
♡pr@t@p♡
☆06/06/2020☆
"रचनापर्व"
BLOG# prataprachana.blogspot.com

Friday, June 5, 2020

न्याहाळत्या नभाचा .....


जन्मांतराचे धागे
युगा-युगाची बांधणी
नात्याच्या अवकाशातील
जणू ध्रुव चांदणी

हे अंतरीचे नाते
जणू उमलता फुलोरा
माझ्या नभावर उगवता
तु चंद्र हळवा बिलोरा

तु चांदण्याच्या प्रकाशात
लहरते व्याकुळ सुक्त
तु दाटल्या मनाचे
आभाळ निळे मुक्त

तु पाखराच्या चोचीतली
आर्त हळवी साद
तु हृदयात झंकारला
समर्पणाचा नाद

तुझ्या छायेच्या मेहंदीत
चंद्र जावा मंद रंगत
तुझ्या पदरास लाभो
पुनवचांदण्याची संगत

मुकशब्दाने चालवा
एक दिर्घ संवाद
मिटून जावेत रातीसम
दुराव्याचे प्रवाद

तुझ्या अथांग मनाचा
मी थांग घ्यावा
तु न्याहाळत्या नभाचा
मी चांद व्हावा
♡Pr@t@p♡
"रचना"
6/5/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

Thursday, June 4, 2020

....अलगद विझत होते


कळ्यांचे ॠतु जेंव्हा
फुलण्या आतुर होते
हंगाम अत्तराचे
बहुधा फितुर होते

ओंजळी आड जेंव्हा
दिव्यांचे किरण निजले होते
पाऊसढगाचे काजळ
अवकाशी सजले होते

मुक्या गिताची काळीजवेल
जेंव्हा ऊंच चढत होती
अंधारभरली पायवाट
माळरान सोडत होती

काजव्याची टिमटिम
जेंव्हा रात सजवत होती
कोरड्या किना-यास स्पर्शुन
नदी भिजवत होती

निज दाटले पक्षी
जेंव्हा पंख मिटत होते
फुलझडी सवे वेलीचे
काळीज तुटत होते

झोपेचे फुलपाखरू जेंव्हा
अवकाशी उडत होते
पंखाच्या त्याच्या अलगद
रंग झडत होते

रातसखीचा चेहरा
डोळ्यात साचत होता
मोर एकला रानी
मुक नाचत होता

काळ्या काळोखाच्या आड
आत्म्यांचे सौदे घडून गेले
झडले मोरपंख हवेस बिलगुन
रानोमाळ उडून गेले

दवबिंदूचे ओलस्पर्श जेंव्हा
गवतात रूजत होते
मी पाहिल्या चंद्राचे चांदपण
अलगद विझत होते.
♡Pr@t@p♡
4/6/2020
"रचनापर्व"
BLOG#prataprachana.blogspot.com

Wednesday, June 3, 2020

ओली तरंगभुल....


ढग आले
सरी आल्या
भिजल्या गायी
घरी आल्या

ही ओली तरंगभुल
भरून गेला अवकाश
व्यापते मनाला
सांजवेळ सावकाश

सगळे भिजले
ओल सजले
मातीच्या गर्त कुशीत
अलगद हळवे थेंब निजले

वैराण माळावर रूजते
अंगाई ओली ओली
मी मोजुन घेतो अलगद
मृदगंधांची खोली

हे अत्तराचे थेंब
कोण केला शिडकावा?
या ओल्याक्षणी का दाटतो
मातीत तृष्ण धावा

प्राषुण सारे थेंब
ही कसली पोकळी?
दाटल्या ढगातुन का
झरे सर ही मोकळी

हे नभाचे बन
तु ही पाहून घे
नेत्र नभाच्या सरीतुन
धो धो वाहून घे

असा पाउस येतोच दाटून
एक कळ झुळुक बनते
कोसळणा-या थेंबाचे
ओले वस्त्र बनते

अशा सांजओल्यावेळी
झुरती फुलांचे आत्मे
झडत्या थेंब बहराचे
रेखीत मनावर महात्म्य!
(♡pr@t@p♡)
"रचनापर्व"
3/6/2020
BLOG# prataprachana.blogspot.com




Monday, June 1, 2020

पहिल्या पावसाचा सुवास....


सांजेच्या कवेत
हे शब्दांचे मंथन
मनाच्या अंतरी दाटे
आठवांचे चिंतन

तुझ्या पायरवाने सजतो
माझ्या प्रतिमेचा भाल
हे युगाचे गित अंतरी
निनादे चिरकाल

ही प्रकाश विलयी सांज
सांडते अंगणओसरी
अव्हेर नसे ओठांना
बिलगे प्रतिक्षारत बासरी

हे अतर्क्य सुर
मनी आठवणींचे दिपन
प्रदिप्त सांजवेळी लागे
तनुगंधाचे लिपन

बेसुमार प्रलय चाले
वास्तव पुसट होते
अंधारातल्या पायवाटेशी
डोळ्यांची घसट होते

माळरानावर मी उभा
हा कसला बंदिवास?
अवचीत येत्या झुळुकीस
पहिल्या पावसाचा सुवास...

बहुधा निघालेत इकडेच
हळुवार पावसाचे ढग
पाहुयात किती धरेल
ही विरह घटिका तग.....

(♡pr@t@p♡)
"रचनापर्व"
01/06/2020
BLOG# prataprachana.blogspot.com





राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...