Thursday, June 4, 2020

....अलगद विझत होते


कळ्यांचे ॠतु जेंव्हा
फुलण्या आतुर होते
हंगाम अत्तराचे
बहुधा फितुर होते

ओंजळी आड जेंव्हा
दिव्यांचे किरण निजले होते
पाऊसढगाचे काजळ
अवकाशी सजले होते

मुक्या गिताची काळीजवेल
जेंव्हा ऊंच चढत होती
अंधारभरली पायवाट
माळरान सोडत होती

काजव्याची टिमटिम
जेंव्हा रात सजवत होती
कोरड्या किना-यास स्पर्शुन
नदी भिजवत होती

निज दाटले पक्षी
जेंव्हा पंख मिटत होते
फुलझडी सवे वेलीचे
काळीज तुटत होते

झोपेचे फुलपाखरू जेंव्हा
अवकाशी उडत होते
पंखाच्या त्याच्या अलगद
रंग झडत होते

रातसखीचा चेहरा
डोळ्यात साचत होता
मोर एकला रानी
मुक नाचत होता

काळ्या काळोखाच्या आड
आत्म्यांचे सौदे घडून गेले
झडले मोरपंख हवेस बिलगुन
रानोमाळ उडून गेले

दवबिंदूचे ओलस्पर्श जेंव्हा
गवतात रूजत होते
मी पाहिल्या चंद्राचे चांदपण
अलगद विझत होते.
♡Pr@t@p♡
4/6/2020
"रचनापर्व"
BLOG#prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...