Thursday, June 18, 2020

व्याकुळ झाल्या नभास.....


अवकाशाच्या मनात
हळव्या छटा घडल्या
ओला झाला रस्ता
काळीजसरी पडल्या

हे पाखरपंखी मन
चिंब ओले झाले
पावसाचे उधाण अबोल
विझत्या सांजेस बोले

फुलापानांचे सडे
रस्त्यावर कोसळून गेले
ढगांचे काळीज मातीच्या
हृदयात मिसळुन गेले

हे ओले नाते भारते
रातीच्या अंधारवेळा
मी माळत राहतो मनात
तुझ्या अस्तित्वाच्या माळा

मी रात जागल्या होतो
पाउस दिवा पेटतो
अनोळख्या पायवाटेला मग
ओला रस्ता भेटतो

सारेच ओघळताना
थेंब सडा नाचतो
ऊधाणफुटला पाऊस
मनात माझ्या साचतो

काही थेंब तु ही घे
बहरून येईल अंग
मातीच्या काळजाला
लगडेल हिरवा रंग

हा नसतो नुसता पाऊस
तो असतो काळीजगाणे
त्याच्या साध्या स्पर्शाने
बहरून येती पाने

मी चालत निघतो दुर
पाऊस मनावर झेलत
मुक मनास ढगांचे
काळीज असते बोलत

मी तुझे अत्तर शोधत
ओलांडतो अगणित सरी
तुझ्या ढगाचे पाऊस
येती दाटून माझ्या उरी

मी चिंब ओला होतो
तुझ्या स्पर्शाचा आभास
मी पाऊस ऊधार देतो
तुझ्या व्याकुळ झाल्या नभास......!
♡pr@t@p♡
" रचनापर्व "
18/06/2020
BLOG# prataprachana.blogspot.com

















No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...