Friday, March 31, 2023

डाचणारी....



मी होतो आहे पाऊस
दुर कुठे पडणारा
हस-या गालासाठी
नयनतटी अडणारा... 

मी होतो आहे ढग
शामल पाऊसबंधी
शालीन कुळातली त्यागत 
अव्यक्त संयत धुंदी

मी भिजते झाड आहे
अंधारात एकले दुर 
भुरभुरणा-या थेंबाला
मी दाटून आला पूर 

मी ओलहवेची हाक
मी सर साचलेली
मी हळवी एक कविता
मनास डाचलेली.... 

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१.३.२०२३







अनावर ओली वाट


शिंपल्यात निद्रिस्त मोती
अखंड जागा सागर
किनारओढी लाटांचा
कसला चाले जागर?

रेतीत कोण रेखली
ओली रांगोळ खुण?
सागर तळात घुमते
मौन बोलकी धुन

शैवालतरुच्या ठायी
ओढ कुणाची खुलते?
अर्णवाच्या रंध्रामधुनी
मृगांक छटा का झुलते?

विराट एकांत वाहतो
एकेक लाट येते
ओल्या पाऊलखुणेची
अनावर वाट होते........


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१.३.२०२३






 
 









 













Sunday, March 26, 2023

बाभळीचे पांग



तु का उभी गं बाई!
काट्याच्या बाभळीखाली?
नुकतीच सिध्दार्थाने
उध्दारली आम्रपाली!

स्तूप उभा दुर तो
त्यावर संदेश कसला?
कोण मुनी गं ध्यानस्थ 
तुझ्या काळजात बसला?

हळदरंगी बाभूळफुलांची
आभा का तुझ्या मनाला?
तु कधी वाहिले सुर्य
ध्यानस्थ त्या मुनीला?

वाहशिल का दुःख त्याचे?
संपवशील का वेदना
हृदयास तुझ्या बिलगेल
त्याची हृदयस्त संवेदना 

एक हाकांचे आवर्त
दोहोंच्या आत उठेल
बाभळीचे बाई तुझ्या
मग पांग फिटेल.....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.३.२०२३













Saturday, March 25, 2023

स्मरणे...

शब्दासही गारुड पडावे अशा दुःखाच्या महाकवीस अभिवादन.......

राऊळाची आस


थवा घेऊन निघे
प्राचीन जिवाची आण
झाडाच्या खोडात रुतला
शिल्लक मागे बाण

हंबरकुळी दिगंत जणू 
प्राचीन मंत्रकळ्या
चांदण्याखाली पाखरे
चंदनफुली पाकळ्या 

फुलखुडीच्या जागी
नसते रक्तधार
नदीतिरावर विहरते
प्रेमदग्ध एक घार

फुले वेचताना बाई!
धर परडी तोलून 
थव्याच्या काळीजलयीला
घे मनातले बोलुन 

नदीवर पाऊल उमटे
राहतो कोरडा भास
शब्दार्ती प्रार्थनेस माझ्या
तुझ्या राऊळाची आस...

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.३.२०२३

 












फुल जंगल



शब्दास उमलण्या माझ्या
कवितेचे रंगीत फूल 
एकांत मनास पडते
तुझी वृक्ष भुल

तुझे झाड एकले 
नंतर जंगल होते
परस्परांच्या संगतीने
आमचे मंगल होते

सारे होते हिरवे
किर्र रान दाटते
एकेक फुल मग ....
घनदाट जंगल वाटते

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४.३.२०२३
















 


Wednesday, March 22, 2023

निद्रेच्या कुलीनघडीला....


रंग नभाला येती
नित्य चैत्रासारखे
रात एकली येवुन 
करते रंगपारखे 

मी काजवरंगी धुनीत
अंधार देतो बुडवून
तुझे ॠतु साधतो
एकेक शब्द घडवुन 
 
शब्दांच्या हृदयाला मी
देतो तुझा वसंत
निद्रेच्या कुलीनघडीला
स्वप्नांची तुझ्या उसंत......


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२.३.२०२३






 







Tuesday, March 21, 2023

अजाण छाया



चैत्र पालवी खाली
रात नितळ तु कालव
डोळ्यात बहर कशाचे
हृदयास कसली पालव?

चंद्र मुळातून तुटुनी 
झाडाचे फुल बनतो
त्याच्या गर्भतळाला
चांदणगंध भिनतो

फुलझडीच्या वेळी 
सडा आकाशी पडे
नभनक्षत्राच्या अंतरी
तुझ्या चणिचे खडे

नदी तळाचे पाणी
सागरा खेचून घेते
प्रतिबिंबाच्या सावलीला
आभाळ वेचून घेते

चिरे कातळा पडती
मी कोरत असता लेणी
टाक तुझा चुकवतो
घावांची व्याकुळ देणी

अद्भुत असे काही
चांदण्याखाली घडते
खोल मनाच्या पृष्ठावर 
अजाण छाया पडते....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.३.२०२३






 


समतेचा भिमजागर



सारखेच ना सा-यांच्या
नयनात दाटते पाणी?
का कुणी फिरावे मग
त्यासाठी दिनवाणी?

पाण्यासारखेच आपण
निरंगी सारे वाटते
रंग लागता धर्माचा
माणुसपण बाटते.

पुन्हा न व्हावे समर
होण्या 'चवदार' तळे
जतन करुया सारे
फुलत्या माणुसकीचे मळे

तुझ्या मनाचे पाणी
माझ्यातला व्हावा सागर
महाड गाईल युगायुगातुन
समतेचा भिम जागर....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.३.२०२३







समतेची ओंजळ


तृष्णा मानवतेची
चवदार तळ्यावर सरली
बा! भीमा रे माझ्या
तु समतेची ओंजळ भरली.....


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.३.२०२३


Thursday, March 16, 2023

वसंतभ्रम



मी अंथरतो फुलबगीच्या
घेण्या जगाचे काटे
कोणी हसत नाही
जतल्या फुलावाटे 

बहराचे देवुन रंग
मी रुजवता हाका
किरणांत तम उतरुन
करतो त्यास फिका

किती जपावी बाग
देवुन जिवाचे पाणी
विस्कटतो वादळवारा
ताटवा दिनवाणी

येईल कधी का कोणी
कवटाळण्या सृजन हात?
वसंत किती दारावर
उभे........भ्रमात....


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.३.२०२३



तारांगण वणवा


तुझ्या हाकांचा वणवा
आठवांचे जंगल जळते
बुडतीचा रंगीत अवकाश 
दुःख तयाला कळते

स्वर्गस्त सुर्य होई
उचलत मंद पावले 
रंग बिरंगी सांजेचे
अस्तर तमास लावले

तुळस मंजि-या वरती
सांजप्रकाश हळू सांडतो
सांजदिवा का तुझा
देव्हा-याशी भांडतो? 

चेततो नभावर चांद
चांदणे मुक शिलगते
वणव्यातली एक हाक
मग तारांगणा बिलगते

असे हाकांचे नंदादीप
अखंड त्यांची ज्योती
आठवांच्या भावकळांच्या
अनंत फुलवाती.....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१६.३.२०२३






 


  




 

 


Wednesday, March 15, 2023

कातळातले सृजन....



या हातांना साकारु दे
बेजोड शिल्प असे
मनातल्या कातळावर
अजिंठा उतरले जसे

दगडाच्या पत्थरदिली
हसावा पद्मपाणी 
कातळाचा रंगही भासो
मोहक आरस्पानी

तुझ्या माझ्या मनात
बुध्द असा बसावा
रंग त्या लेण्याठायी
आत्म्याचा असा दिसावा

मी कोरत पहाड जावे
सापडावा मला बुध्द 
कातळाचा आत्माही व्हावा
निर्मितीने रंगीत शुध्द.....

होतील अनंत प्रवाद
लावेल कोणी अन्वयार्थ 
सृजनाच्या गर्भतळातुन
पत्थरही होतील सार्थ...

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१ ५.३.२०२३








  

Tuesday, March 14, 2023

अनाहूतास...



झिलमिल ढगात रिमझिम 
रात कंच ओली
न लागे मनाचा तळ
धुंडाळता तुझी खोली

थेंब थेंब झरते
हाक माझी आसमंती
तमास आकंठ देते
रात निदृष्ट शांती

मी असे अनाहूत पाऊस 
रातीस एकले पाहतो
ढग असे हे उपरे
तुझ्या शहरावर वाहतो

घे तळहातावर तु
हे अनाम आर्त पडणे
दे वाहुन या अनाहुतास
तुझे मुक्याने रडणे...

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.३.२०२३





 

 







Monday, March 13, 2023

व्याकुळ बहर



जिवलगा रे तुटती
झाडांचे बहर सारे !
अवनी वरती रंगीत
जणु शब्द तगमगणारे

रंगीत वाटा काढत
येशील कधी का गावा?
हर शिशिरा नंतर 
मनात वसंत धावा!

होते सारे स्तब्ध 
झाड तरीही डोले
त्यांच्या खोल मुळाशी
माझे गीत ओले....

सुर भिरभिरे वारा
अवनी गाती गाणे
आठवांचे बहर व्याकुळ 
तुटती मग धीराने...

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३.३.२०२३























Saturday, March 11, 2023

आर्त दाटल्या ओठी


आस किती जन्माची
उभी तुझ्या वेशी?
निनाद तिच्या हाकांचे
तुझ्या काळजापाशी

पान वाळले गळते
तुझ्या परसदारी
कंप त्याचा नयनी
तुझ्या घनभारी

नदीतिरावर शमते
व्याकुळ गोरजधुळ
तुझ्या अंतःकरणी माझे
गलबलते गोकुळ 

दुरदेशी असते कोणी
तुझे राहिले मागे
ध्रुवाच्या ता-यासंगे
नयन तुझे का जागे?

मावळतीच्या अंगास
छटा गुलाबी फुटते
तिळतिळ अनामिक
अंतरात काय तुटते?

मी शब्दही मागत नाही
तरी कविता पडते झोळी
हे कसले अक्षयदान तु
रेखते एकांताच्या भाळी?

मी फकिरगतीने निघतो
तुझ्या शब्दापाठी......
हाक न उमटु देता
आर्त दाटल्या ओठी...

 "やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.३.२०२३












 




हसते शब्दशिल्प




उणीदुणी एकांताची
मी कशास काढु?
दुःखाच्या चेहऱ्यावरचे
स्मित कशास खोडू?

दिगंत रिते असता
मी कशास भरुन येवू?
भावरित्या अवकाशाचा
मी चांदवा कशास होवू?

मी का जपावी फुले
काटे खुडत असता?
आणीक वसंत रंग 
सृष्टीवर चढत नसता

मी कशास गावी गाणी
शब्द असता बावर?
का लिहावी कविता
नसता तुझा वावर ?
.......
.........
.........
.......?

मी का करावा त्रागा
काहीच हाती नसता?
कोरावीत शब्दशिल्पे
आठवत चेहरा हसता.....


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.३.२०२३

 


Thursday, March 9, 2023

अंतर


तु व्यापले असता
मी ऊरु कसा वेगळा?
हा बहर दाटला वसंत 
मुक..शांत...आगळा...

गर्द धुक्यातून दौडे
अश्व मनातला असा
उधळत अनाम ओढीचा
भरला रिता पसा

हिमशिखरांच्या वरती
वाहे ओली सारंगी धुन
प्रत्यंचावरला शर शोधतो
गर्द काळीज खुण 

पळस का पठारी
मांडतो अग्नीसडे?
कुठुन धुक्यातून कानी
मिलनाचे चौघडे?

दिशा अनावर होती
साचते कसले मन्वंतर?
दौड आजन्म चाले
लांघण्या दूरचे अंतर.....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९.३.२०२३









Wednesday, March 8, 2023

चांद उमाळा




किती युगाच्या नोॅदी
किती युगाच्या व्यथा?
सांजफुलीचा चांद
रेखे हळवी प्रेमकथा

कधी अनावर वसंत 
शिशिर कधी तो बुजरा
कितीदा मिटल्या डोळयातल्या
तो सोसतो व्याकुळ नजरा

अनंत घायाळ हृदयाचे 
तो अबोल मुके मन्वंतर 
कलेकलेने तो लांघतो
युगायुगाचे अंतर...

तो देश तुझा दूरवरचा
मुक्याने पाहुन घेतो
सागर ओल्या हाकातुन
स्वतःला वाहुन घेतो

तो मुकी लाट बनुनी
काठावरती फुटतो
तो काळीजवेळी हळव्या
अंतरात तिळतिळ तुटतो  

चांद मुक्याने गातो
ओठांचे गाणे भिजले
कोणजाणो कधीपासून
गीत तयाचे थिजले..?

एकेका आलापाची
तो पुनव आभाळा देतो
त्याच्या आर्त पुनवेचा
मनी उमाळा होतो....
"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.३.२०२३

  
 





Tuesday, March 7, 2023

वाटावरती झरते


रंग कोणता असा
आत्मा त्यात रंगतो?
निरभ्र अवकाश हा
अलगद का दुभंगतो?

शामरंग का राधा
की राधारंगी शाम?
तसेच काही हृदयी
उधळत ये अनाम 

पळस अग्नीफुलांचा
वसंत देतो शिलगुन 
तुझ्या गावदिशेचा 
मी वारा घेतो बिलगुन 

मावळतीस लगडते 
हुरहुरीची रंगीत हाक
एकट संध्यासमयाला
का येते तुझी झाक?

शहर तुझेही उत्सुक
रंगाची उधळण करते
तरंग गाणे रंगीत
तुझ्या वाटावरती झरते.....


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७.३.२०२३

  






 



Saturday, March 4, 2023

चांदण्याची कविता



निनाद कोण प्रार्थनेचा
सांजेला हवेत फिरतो
भरल्या सांजसमयी
हात रिता मग उरतो

रित्या हातास माझ्या
स्पर्शन्या कोणी नसते
गर्द तमाच्या खाली 
एक चांदणी हसते

ते हसणे होते गाणे
सांज हळू ढळताना
सुर्य मंद विझतो
रात तमा मिळताना

होवुन रात एकात्म 
चांदण्यास सजवून नटते
मग रित्या हातास माझ्या
चांदण्याची कविता फुटते.....
"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
४.३.२०२३

  












 


Thursday, March 2, 2023

अभिलाषा....



तुझ्या अनाम शब्दास
मी तोलनारी भाव रेषा
मुक्या तुझ्या हृदयातली
मी अव्यक्त अभिलाषा.....


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३.३.२०२३




Wednesday, March 1, 2023

जोगी....



दाटता वसंत हृदयी
होउ कसे मी रिते?
ठेव ऊशास माझ्या
तु भारली स्वप्नगीते

निज अशी का थिजे
भरल्या अंधार राती
तुझ्या दिव्यास व्याकुळ 
माझ्यातल्या फुलवाती

सांडु किती कवडसे?
ज्योत काहुरी थरथरे
दुर तमात विरघळती  
उदास एकाकी घरे

या वाटा जरी निघाल्या
पावलांवर करत सक्ती
मी दूरच्या दिपमाळेतुन
मांडतो गाभारी भक्ती

ये तु ही कधी भेटण्या
जसा विठु चंद्रभागी आला
आणीक भक्तांसाठी राणा
स्वतः जोगी झाला..... 

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२.३.२०२३






 







राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...