Saturday, March 11, 2023

आर्त दाटल्या ओठी


आस किती जन्माची
उभी तुझ्या वेशी?
निनाद तिच्या हाकांचे
तुझ्या काळजापाशी

पान वाळले गळते
तुझ्या परसदारी
कंप त्याचा नयनी
तुझ्या घनभारी

नदीतिरावर शमते
व्याकुळ गोरजधुळ
तुझ्या अंतःकरणी माझे
गलबलते गोकुळ 

दुरदेशी असते कोणी
तुझे राहिले मागे
ध्रुवाच्या ता-यासंगे
नयन तुझे का जागे?

मावळतीच्या अंगास
छटा गुलाबी फुटते
तिळतिळ अनामिक
अंतरात काय तुटते?

मी शब्दही मागत नाही
तरी कविता पडते झोळी
हे कसले अक्षयदान तु
रेखते एकांताच्या भाळी?

मी फकिरगतीने निघतो
तुझ्या शब्दापाठी......
हाक न उमटु देता
आर्त दाटल्या ओठी...

 "やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.३.२०२३












 




No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...