Wednesday, March 8, 2023

चांद उमाळा




किती युगाच्या नोॅदी
किती युगाच्या व्यथा?
सांजफुलीचा चांद
रेखे हळवी प्रेमकथा

कधी अनावर वसंत 
शिशिर कधी तो बुजरा
कितीदा मिटल्या डोळयातल्या
तो सोसतो व्याकुळ नजरा

अनंत घायाळ हृदयाचे 
तो अबोल मुके मन्वंतर 
कलेकलेने तो लांघतो
युगायुगाचे अंतर...

तो देश तुझा दूरवरचा
मुक्याने पाहुन घेतो
सागर ओल्या हाकातुन
स्वतःला वाहुन घेतो

तो मुकी लाट बनुनी
काठावरती फुटतो
तो काळीजवेळी हळव्या
अंतरात तिळतिळ तुटतो  

चांद मुक्याने गातो
ओठांचे गाणे भिजले
कोणजाणो कधीपासून
गीत तयाचे थिजले..?

एकेका आलापाची
तो पुनव आभाळा देतो
त्याच्या आर्त पुनवेचा
मनी उमाळा होतो....
"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.३.२०२३

  
 





No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...