Thursday, December 31, 2020

वसंत भारली माती...

या प्राजक्त फुलांची 
ही कसली गर्दी?
सकाळ देते अलवार
गंधबहराची वर्दी

सांडल्या किरणांचे
भरून येती थवे
उगवत्या सुर्याचे
स्पर्श भासती नवे

काल रातीचे मळभ
आपसुक दुर सरले
दाटून गेल्या धुक्याचे
अस्तर अलबत विरले

दुरच्या गर्द जंगलाला
बहराची सय दाटली
पहाटेच्या काळजाला 
कसली खुण पटली?

दिवे विझुन गेले
आकाशी लामणदिवा
दुर भरारी मारे
स्वप्नदाटला थवा

बोटांच्या पेरांना सुचे
बटांचे गर्द गाणे
शिशीराला भारून देती
मोहरली दोन पाने

वाट उत्सुक वाटे
पावलांना गती सुचे
दुरच्या माळरानी
पक्षाची जोडी नाचे

भिंतींना लागे रंग 
हा कसला उत्सव दाटे?
वेशीस तुझ्या शहराच्या
मन घालते खेटे

रानात फुलांची गर्दी
मातीस भरते येते
शिशीराच्या मध्यावरती
हिरवळीची गीते

येत्या पानगळीची
कशास धरावी भिती?
ओंजळ भरून देईल
वसंत भारली माती...
(प्रताप)
"रचनापर्व"
1/1/2021
prataprachana.blogspot.com

Saturday, December 26, 2020

दारात फुलांची दाटी..

एक ढगाचे 
दोन तुकडे
मनात त्यांच्या 
समान दुखडे

हवा संन्यासी
वैरागमुखी चांदणे 
कुणाच्या काळजावर
उमटे कुणाचे गोंदणे

चंद्र नभीचा गातो
चकोरआलापी गाणे
मोग-याच्या वेलीला
आठवणीचे पान्हे

तु दर्ददुव्याची वाणी 
कवितेस माझ्या देते
चंद्र पुरवतो तुला
चकोरभयाची गीते

दुरदेशी चांदणउजेड
गाव उसासे भरतो
मोरपिसा-यावर मी
ओंजळ काहूरी धरतो

दिव्याच्या अंतःकरणी 
सजतो वातीचा सण
संबंध जाळुन घेणे
साधण्या प्रकाशसाजरा क्षण

या आभासाच्या अस्तरात
कोणाचा शोध चाले?
मुकशब्दाआडून मन
गुज कुणाचे खोले?

उसास्याची विण घट्ट 
गंधबहराची आरास
रातीच्या कुशीत चांद
उमलून ये भरास

मंद दिव्याच्या ठायी
हा चेतव जागर चाले
रातसजणीच्या कानी
वारा काय बोले?

सारेच काळीजक्षण
रातराणीच्या ओटी
बहराच्या पहिल्याप्रहरी
दारात फुलांची दाटी...
(प्रताप)
"रचनापर्व"
27/12/2020
prataprachana.blogspot.com

Tuesday, December 22, 2020

स्वप्नपडीचा मुहूर्त....

स्वप्नपडीचा मुहूर्त
वेशीत उभे आभास
लगडून जातो जिव
चांदण्याच्या नभास

कोण कुठला दरवेशी
नजरबंदीचा खेळ 
ओळखीच्या खिडकीशी
रेंगाळे सांजवेळ 

पापण्यांचा मुहुर्त 
नजरेला साधत नाही 
दरवेशाची जादू
काजळाने बाधत नाही 

हवेला नजीकचे जंगल
कसला सांगावा धाडे?
तटबंदीच्या भिंतीचे
अस्तर भारी जाडे

झुळुकीला दडवत नेती
पारव्याचे पंख
त्वचेच्या रंध्राखाली गोंदले
विंचवाचे डंख

दारास कसले तोरण
हा कसला उत्सव चाले
काढत चालत जावे
काळजात घुसले भाले

हाक कुणाची येते
शहराला काळीज फुटते
दाराच्या अडसराचे
भान अचानक सुटते

खिडकीला येतो बहर
दारास झुळुक भेटे
पारव्यांच्या पंखाचे
नशीब घालते खेटे

चांद बहरून येतो
प्रतिबिंब तुझे सांडे
दुरदेशी निघती चालत
तुझ्या प्रकाशाचे तांडे

गाव अंधारात बुडता
एक खिडकीत दिवा जळतो
शिखरास जोडल्या हाताचा
अर्थ मला मग कळतो....
(प्रताप)
"रचनापर्व"
23/12/2020
prataprachana.blogspot.com

Sunday, December 20, 2020

सांजपारवा...

तुझ्या शहराला बरकत आहे
तेथे माझ्या मनाचा प्राचिन ठेवा
तिथल्या जळत्या दिव्यांचा
न माझ्या अंधारास हेवा

वेदनेचे वारस शब्द घेवून
मी गझलांचे रस्ते आखतो
शब्दांचे ठसे आभासी
मुसाफिर कोण थकतो?

हे वाटा चुकवणारे वाटाडे
देतात उजाड वस्त्यांचे पत्ते
मी गिरवत जातो तुझ्या
दिर्घ आठवणींचे कित्ते

तुझ्या चेह-यासम दिसता ढग
घराहून माझ्या जातो
हा सांजपारवा धुकेरी
आर्त कसले गीत गातो?

माझ्या पुर्वजांच्या दुव्यांना
मी कवटाळुन उरास चाले
कोणाची चाहूल पूर्वजन्मीची
जखमांचे टाके खोले?

अजब अत्तर आहे तुझे
मनात दाटता दरवळ
आभाळाला जाचत राहते
चंद्रचणीची हिरवळ

देवदुतांच्या हाताचे
कंपन करती बोटे
चालत राहते गझल
काळोखास ठरवत खोटे

तुझ्या शहराला हा कसला
अंधाराचा सोस?
फकिराच्या कटो-यात तो
ओसंडे भरघोस

मी अंधाराच्या धाग्यातुन
प्रकाश विणत राहतो
जिव कुणाचा भिंतीत
कोण चिनत राहतो?

त्या शहराच्या मध्यभागी 
तो उभा मनोरा कसला?
सांजपारवा माझा
त्याच्या माथ्यावर बसला...दिसला....
(प्रताप)
"रचनापर्व"
20/12/2020
prataprachana.blogspot.com

Thursday, December 17, 2020

गवतफुलांची जुडी...

गवतफुलाची रास
ही निर्जन वाट
नि:शब्द सागर हृदयी
उचंबळून ये लाट

मौनातुन मी देई
तुला आलिंगन आतुर
कवितेला बिलगुन माझ्या
शब्द होती फितुर 

काजव्यांना स्वप्न पडे
कळ्यावर पडे गारूड
अवकाशाच्या उधाण कडेवर
उत्सुक चांदणे हो आरूढ

नजरेची बिलगभाषा 
कटाक्षाचा स्पर्श 
आभास नुसता तुझा
पेरून जातो हर्ष

एक चांदवा आपला
दोघास दुर पाहतो
परस्परांच्या दिशेस दोघे
निःश्वास पोरके वाहतो

तु रमल्या गोकुळी
धुन कसली उचलून घेशी?
मी उधळून देतो अलबत
आर्त सुरांच्या कृष्णराशी

पाताळाच्या खोल तळातुन
हा कसला बहर फुलतो
फांदीच्या काळजावर 
गंध कुणाचा झुलतो?

ही कसली गारूडभाषा
नजरेला तुझ्या फुटते?
राधेची काळीजखुण
बासरीला हलकेच पटते

हसत्या ओठांचा बहर
दोन दवबिंदूचा भास
नितळ..सुंदर तुझा
मृदगंधी सुवास

आभासाचा जागर नुसता
कल्पनेची आतुर घडी
मी उचलून हृदयाशी घेतो
गवतफुलाची जुडी....
(प्रताप)
"रचनापर्व"
17/12/2020
prataprachana.blogspot.com

Tuesday, December 15, 2020

झुळुकीच्या स्पर्शाला...

नसताना तु शिलगे
मनात एक पणती
कशी करावी सांडल्या
प्रकाशकणाची गिणती?

अनोळखी अंधाराला
पाचोळ्याचा भार
नदीच्या अंतःकरणातुन
वाहे सलग सांजरी धार

काळ वश होत नाही
फुटे अंधाराला विलाप
त्वचेच्या रंध्राआड
तुझ्या आभासाचा मिलाफ

रस्ताभर फुलांचा बाजार
वेलीचे काळीज तुटते
निजेला झपाटे जागेपण
रातीस पहाट फुटते

आठवणीच्या हनूवटीवर
कल्पनेचा असर
उघड्या टक्क डोळ्यात
तुच तु धुसर

नक्षत्र उगवतीच्या घटकेला
द्यावी कसली आण?
सागर पडे शांत
ये माळरानास उधाण

तुझ्या आसक्तीचा प्रहर
दिव्याला हवा ओवाळे
मी तुडवत निघतो दिगंती
निसरड्या स्वप्नाचे शेवाळे

तु असताना चांद
जागचा हलत नाही
झुळुकीच्या स्पर्शाला
प्राजक्त भुलत नाही

तु आत दाटला आवेग
तु अपूर्ण राहीले काव्य
कृष्णाच्या बासरीला
पैंजण कुणाचे श्राव्य?

तु तिथे असता रिक्त
मला साद द्यावी
सादेस तुझ्या अनवाणी
माझ्या कवितेने दाद द्यावी....
(प्रताप)
"रचनापर्व"
15/12/2020
prataprachana.blogspot.com














Sunday, December 13, 2020

तळहाताची भुल.....

ओथंबलेले उधाण 
सागर अपार खिन्न
चंद्राच्या काळजावर
भरतीचे ओले चिन्ह 

गवतात विखुरलेले
हे हलके दव मुके
कोणाची साद अन् स्पंदन
कुणाच्या काळजाचे चुके

ही रातसांज केसाची
चेह-यावर हो आभास
कोणाचीच ना चाहूल
तरी बावर बावर श्वास 

तु आल्याचा हृदयप्रहर
अजूनही त्यांचे ठसे
रात उगवे मावळत्या प्रहरी
हे रातीचे असे...!

तुझ्या गंधाचा दरवळ
प्राजक्त फुलण्या विसरे
नजरेच्या समीप माझ्या
तुझे नयन आभासी हसरे

दगडाला फुटते काया
तुझ्या नजरेचा टाक
चंद्र दिला मी ओंजळी
तु रातीस अलबत राख

हृदयाची समिधा वाहून
हा यज्ञ करावा साकार
मी अंधाराला कितीदा
देतो तुझा आकार

मी यावे मनात उमलून
सोडत अलवार गाठी
मी उचलून घ्यावा नि:श्वास 
तुझ्या सुस्का-या पाठी

वहिवाट मिलनाची
प्राचिन हा ठेवा
बेधुंद आळवी धुन
वृंदावनात पावा

तळहाताच्या तळ्यात 
मी धारण करावे फुल
चेह-याला तुझ्या पडावी
माझ्या तळहाताची भुल.....
(प्रताप)
"रचनापर्व"
13/12/2020
prataprachana.blogspot.com

Saturday, December 12, 2020

निद्रानाशाचे फुल...


मनास सांजेच्या पडे
धुक्याची अस्पर्शी भुल
मी उचलून घेई अलगद
निद्रानाशाचे फुल

दोन ढगांचा मिलनबिंदू
तेथून हो पाठलाग
दुर अंधारात दिसे
पेटल्या नंदादिपाची आग

तुझ्या उशिला सुचते
सुस्का-याची गझल
मी चालत जाई शब्दबनातुन
मजल....दरमजल

रित्या क्षणांना कवेत
अंधार हळू घेतो
चंद्र ही मग अधिर
चांदणीचा होवून जातो

दुरदेशी टेकडीला
हवेचा ये इशारा
मी पायथडीला आवरे
झुळुकींचा पसारा

ओल्या गवताला येती
फुलांच्या काळीज हाका
रात पेटल्या वेळी 
चंद्र होई शांत ....मुका

हा दुराव्याचा खंजीर
कोणास हे ओरखडे?
पहाडाचे काळीज हळवे
होई थोडे थोडे

रातीच्या गर्भगुहेतुन
कोणाची साद घुमते?
रातराणीची कळी
झुळुकीच्या ठायी रमते

तु बहर कशाला द्यावे
आठवणीचे सारे?
मी मोजून घेतो अगणित 
रातदाटले तारे....

या हवेला तु गंध
मिलनघडीचा द्यावा
वासरकंठी उत्सुक
मुरलीचा रूजतो धावा...
(प्रताप‍‍‍‍)
"रचनापर्व"
12/12/2020
prataprachana.blogspot.com

 

Thursday, December 10, 2020

धुकेरी ढगांच्या अस्तरी....


 
सावलीचे जमिनीशी
असले कसे नाते?
सुर्याची हुलकावणी
ती दुर जाते, समीप येते

टाकत्या पावलांना
किरणाची लगडे आण
पाऊल वाटा न सरती
त्यास असे ना भान

मी अंधारघडीच्या राती
सावलीस पाहून घ्यावे
जे नसते कोणी आपले
त्याचे होवून जावे

तु दिव्यांच्या काळजाला
कशास वात द्यावी?
मनातल्या सावलीला
अंधारी मात द्यावी

मी सांजघडीचे अस्तर
चांदण्यास वाहून देतो
गाय गळ्याची घंटा
हंबराला वाहून घेतो

चांद सरकत नाही
रात थांबत नाही
प्राक्तन चांदण्याचे
दिर्घ लांबत नाही

तु न आल्याचा सुगावा
चंद्रास कुठुन लागे?
रातराणीच्या फुलात
मग संशयकल्लोळ जागे

मी गंध पेरत नाही
तुझ्या तनुचा कस्तुरी
भाव मनाचे दडती
धुकेरी ढगांच्या अस्तरी

मी सांधून घेतो काळोखाच्या
दडलेल्या रात घडी
तु असते उभी प्रतिक्षारत
बंद जाहल्या नयनथडी

तुझ्या आभासाचे सोने
उगवतीला पसरत असते
मिलनबिलगी सरती रात
अंधार विसरत असते
(प्रताप)
"रचनापर्व"
11/12/2020
prataprachana.blogspot.com











Wednesday, December 9, 2020

बंद डोळ्यांना ग्वाही....


हाताशी आभाळ घेवून
चांदणे गुंफावे
सांजेच्या धुकेरी क्षणांना
स्वप्नास जुंपावे

मिटत्या सावलीचे ठसे
अंधार सजवून घेतो
धरतीचा मावळ कोना
सुर्य रूजवून घेतो

हा कसला नित्य उगवणे
आणी मावळतीचा फेरा
मी नित्य पाहतो अवकाशी 
एक लुकलुकणारा तारा

ही पुरातन ओढ 
ही प्राचीन आस
या कळ्यांना दे!
बहराचा बकुळ भास

या धुक्याच्या अंतःकरणी 
माझ्या हाकेच्या नक्षी
मनाच्या मुक सादेला
तुझे मन बावरे साक्षी

नजरेचे स्पर्श
नजरेला होई बाधा
रातीच्या कृष्ण रंगात
चमकून उठते राधा

तु आर्जवी पुजा
मी मनात मांडलेली
उचलून घे स्पर्शफुले
ओटीत सांडलेली

बोटांना सुचली कविता 
बटावर ती उमले
तुझ्या तनुच्या भूर्जपत्री
शब्दांचे कोमल इमले 

गहिवर तुटवत नाही 
रान भरून येते
तु गेल्यापाठी आठवण
लगेच फिरून येते

तु , तुझा आभास
मी रिक्त नाही 
तुझी जागती नजर
माझ्या बंद डोळ्यांना ग्वाही!!
(प्रताप)
"रचनापर्व"
09/12/2020
prataprachana.blogspot.com

 

Tuesday, December 8, 2020

प्रतिक्षेचा सडा.....

कल्पनेला स्पर्श फुटावा
विचारांना गंध
मनात दरवळत राही
तुझा आभासी सुगंध 

कंठ मनाला फुटावा
नजरेला यावी भाषा
मी होवून जावे तुझ्या 
तळहाताची ठळक रेषा

दाटल्या हंबरवेळी 
आस दाटून यावी
पावलांनी माझ्या तुझ्या
पावलांची गती गाठून घ्यावी

दिर्घ नि:श्वासांना तुझ्या
माझ्या उसाशांची आण
का थरारे फांदिवर एकले
कंच हिरवे हिरवे पान?

अंधाराला उजेडाचे
लागावे काळीज पिसे
दुर अवकाशी अंधूक
कोणती चांदणी हसे?

चांद उगवी उशीरा
समईची वात विझे
कोणाच्या कुशित मिटल्या
कोणाचे स्वप्न निजे?

नितळ स्वच्छ कांती
अंधार झाकत नाही 
लुटुन जाई काफिला
तुझी नजर राखत नाही 

मनाला मनाचा 
अपूर्व ध्यास बिलगे
वा-याची अनवाणी झुळुक 
देह फुलांचा विलगे

रातीला कसले अजाण
पडते गुढ कोडे लाघवी
नजर कुणाची ओली
नजरेस कुणाच्या जागवी?

प्राजक्ताचे बहर क्षण
स्वतःस जाती विसरून
कोणाच्या प्रतिक्षेचा सडा
असतो फुलात पसरून?
(प्रताप)
"रचनापर्व"
08/12/2020
prataprachana.blogspot.com

Saturday, December 5, 2020

ओंजळडोह....

चंद्र कवेला असता
आभाळ सजून जाते
कोणाच्या ओंजळडोहात
चांदणे भिजून जाते?

का उठवून देतेस सांजेला
मिलनघडीची हुल?
उगाच मोहरून जाते
फांदिवरती गोंदणफुल

तु सोनघडीच्या नक्षित
पेरून देतेस रंग
मोहरून जाते नभाचे
चांदणरंगी अंग

रानास होतो भुलवा
झाड मुके होते
एकट रातघडीला
चांदण्याचे धुके होते

मी धुक्याच्या सावलीवर
रेखाटतो शब्दमाला
चंद्र दाटल्या अवकाशावर
ढग घालते घाला

पाखरांची दिशा चुकते
हवा धुंद होते
प्रतिक्षारत दिव्याची
वात मंद होते

तु सोबत नसता इकडे
चंद्र नभात रूसतो
खिडकीच्या तुझ्या तावदानावर
उगा उदास बसतो

जिव काहूरी होतो
चंद्र हलत नाही
बोलावे किती तुज आभासाशी
तो शब्द बोलत नाही 

हर रातीला असा
चाले प्रतिक्षा खेळ 
तुझ्या नजरेच्या डोहात
ओली होते सांजवेळ 

रातसजणीचे पैंजण 
वाटेस प्रश्न पडतो
गोकुळाचा जिव मग
वृंदावनात अडतो...
(प्रताप)
"रचनापर्व"
05/12/2020
prataprachana.blogspot.com


Tuesday, December 1, 2020

चंद्रचाहूली प्रहर....

चंद्रचाहूली प्रहर
ते दुर पसरले धुके
घरट्यातल्या उबेतुन
गीत बहरते मुके

ही पैंजणी भैरवी
हा समर्पणी आलाप
जात्या पाउलवाटेचा
तळ्याकाठास हो मिलाफ

पाण्यात उतरते चांदणे
ही सोनेरी आभा
गंगेच्या काठावर हा
कोण भगिरथ उभा?

रानफुलांना गंध
फुलती कळ्यांचे श्वास 
डोळ्यांचा माझ्या चाले
तुझ्या डोळ्याकडे प्रवास

खुण कसली प्राचिन
नयनात तुझ्या दाटे?
कुठल्या जन्मीचे झाड
कुठल्या जन्मात फाटे

तळव्यात चांद बंदिस्त
मिटल्या पापण्यांना चांदणे
अंधारात चकाकून उठते
तुझ्या तनावरील गोंदणे

हे भारले पाणी
तळ्यास तहान लागे
चांदण्याच्या उजेडात
हे पक्षी का जागे?

हवेला ही कसली
निरोपाची भाषा फुटते?
तुझे आभासी चांदणे
वाण प्रकाशी लुटते

नभीचा चांद देतो
दिव्याला वातीचा संग
रातीच्या अंधारात उमटतो
इंद्रधनुचा रंग

नकोस बोलू काही 
शब्द अधुरे राहू दे
कवितेच्या गवाक्षातुन मला
पुनव तुझी पाहू दे...
(प्रताप)
"रचनापर्व"
01/12/2020
prataprachana.blogspot.com

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...