Wednesday, March 31, 2021

दुःख एकटे जळे....

फुलांना मुठमाती
मोक्ष फांदीस मिळे
पापणीखाली बहरे
सूक्ष्म एक तळे

मनात तहानलेला
असतो एक चातक
भोगत असतो तुझ्या
तृष्णेचे घोर पातक

तळ्यात रूतल्या कळ्यांची
तटास वलये भिडती
या वर्तुळाच्या आत खोलवर
थेंबे खोल बुडती

मी तळ्याकाठचा तट
बुरूज होवून पाही
अर्ध्य दिल्या निर्माल्यातुन
देव कुणाचा वाही?

दुर उभी मधूकामीनी
भार कळ्यांचे झेले
गंधात बंधीत झालेले
गुज बोलती होले

मी अलवार परत निघता
पाऊल उचलून घेई
सांज दाटल्या राती
चांदण्यास चमकती घाई

मी दुर सारतो चांदणे
अंधार कुशीला घेतो
भास तुझ्या गोंदणाचा
कल्लोळ शहारे होतो

होवून मुक्या हाकांचे
तळे थिजून जाते
दुर पेटली समई
मंद विझून जाते

रात,तळे, समई
मी ही शांत मुका
फुलपाखरू टिपते
गंधफुलांच्या चुका

नकोनकोशे वाटे
हे दाटले एकट तळे
विझल्या समई शेजारी
दुःख एकटे जळे!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
31/3/2021







Tuesday, March 30, 2021

अत्तरी मोहरा...

दवाच्या थेंबा! अरे
पहाटेतील पहिल्या
नको पडू आता
शिळेत निजली अहिल्या..

अंधाराची भिंत 
काळी भिन्न उभी
ढगाला साधलेली
किरणांची खुबी

हळू पड रे दवा!
नको वाजवू पावले
पापणीचे दार तिने
आताशा लावले

थिजलेले आभाळ 
तिने घेतला उशीला
निशीगंधी सुगंध
तिच्या मिटल्या कुशिला

जागत्या चकोरा
नको गाऊ गाणे
हलत्या पिंपळा नको
सळाळु तु पाने

निज मोडेल रे तीची
दुखावेल रातराणी 
चांदण्याला फुटतील
का अंगाईची गाणी?

खिडकीला चुंबे
पहाटेची झाक
कळ्यांनो जरासा ठेवा
बहराचा धाक

झोपल्या चांदाला
पुनवेची आभा
कळीला स्पर्शिन्याची
सुगंधाला मुभा

युग साचलेले जणू
हा नितळ चेहरा!
मनाच्या कुपितली
जणू अत्तरी मोहरा!!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
30/3/2021

Monday, March 29, 2021

गोंदणाचे डंख......

अमिट खुणा सोडत 
सावल्या पुढे निघती
चाफ्याचे फुल अवकाशी
कळ्या ढगास बघती

सखे! येता पाखरे परतून
निर्मितीमग्न होई जंगल
सांजबाव-या धुनीत
सुर दाटती मंगल

ही तिरप्या उनाची भिंत
सांज त्यात मिसळे
झुळुकीच्या मुक निनादी
फांदी अलगद उसळे

प्रतिक्षारत बुरूजावर
अज्ञात हाताचे पाणी
चोचीने उचलून घेती
तृष्णाकींत व्याकुळ गाणी

बुबळाच्या खोल आतुन
चाहुलीचा अदमास
साचल्या हुंदक्याला हो
कडे कोसळल्याचा भास

पापणीत अडकला पक्षी
अवकाशास देई हाका
पोर्णीमेच्या उजेडात
चांदण्याच्या साऊलचुका

शरिराच्या थरथरीवर
गोंदण भरतीच्या लाटा
ओठांना बिलगून येती
कवितेच्या अनवट वाटा

सांज बोलते प्राचिन
मिलनाची संकेतबोली
एक शहारा उमटे
चंद्राच्या त्वचेखाली

तु उगवून ये अवकाशी 
सांजेचे आमंत्रण खुले
मी सजवून रानी देतो
फुलपाखरी स्पर्शफुले

पाखरांनी पुनव उचलावी
फैलावून आपले पंख
मी सजवून घ्यावेत ओंजळी
तुझ्या गोंदणाचे नाजुक डंख! 
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
29/3/2021

रचनापर्व

Sunday, March 28, 2021

हिरवा एक अभंग....

पक्षांचे हो देशांतर
दाटे निरोपाचे पर्व
पंख ठेवून मागे
कुठे निघाले सर्व?

तारकाचा तुकडा
नभातुन दिर्घ कोसळे
पंखझडत्या तिथीला
धुमकेतु भुगर्भी उसळे

ही रंगाची उधळण 
कुठे पेटले अंबर?
चंद्रास नभी लटकते 
आठवांचे निल झुंबर

त-हा फुलांची भोगे
तळव्याचे मेहंदी फुल
तुटत्या पिसात दाटे
शिशिर उसवती भुल

तुझ्या झाडाच्या फांदिला
पक्षांचा पडाव पडतो
झाडाखाली गोसावी
शोकगितातुन रडतो

पक्षांना सुटवत नाहीत
झाडात अडले सुर
झाडावर ओलाकंच
चांदण्याचा महापुर

झाडाला फुटते ओल
पक्षांना हिव बाधते
गोसाव्याच्या गिताला
पुनवेची रात साधते

पक्षांचा डेरा पडतो
झाडास फुलती फुले
पक्षी माझे बांधती
तुझ्या काळजाला झुले

तु वसंत त्याला म्हण
जरी रंग माझे असती
पानाच्या देठाखाली
शिशिराचे प्रहर हसती

जपून ठेव हा बहर
धारून घे हे रंग
कवितेला माझ्या फुटतो
मग हिरवा एक अभंग!!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
28/3/2021

Friday, March 26, 2021

कवी ग्रेस!!! साठोत्तरी मराठी कवितेची अनवट सुरावट...



कवी ग्रेस!!!
साठोत्तरी मराठी कवितेची अनवट सुरावट.....

" I AM ANCIENT MAN IN MODERN ERA " असं म्हणत आपल्याच नव्या उपमा,नव्या प्रतिमा आणत एक आत्ममग्नी व प्रतिमा व प्रतिकांचा संयोग करत ग्रेसांची कविता मराठी काव्य क्षेत्रात आली..खरंतर ही कविता म्हणजे मराठी कवितेच्या भाळावरली सुरेख गोंदणनक्षीच!!
कोणी दुर्बोध म्हणावे,कोणी आत्ममग्न कविता म्हणावे पण ग्रेसांची कविता कशासही फशी पडत नाही. ती अवकाशाचे किनारे शोधत, व्याकुळ संध्यासमयी चंद्रमाधवीचे प्रदेश साकारत अफाट बनत जाते. अणुच्या आतड्यावरही ती विसावते तर तीला प्रसरण होताना अनंत आकाशगंगाही अपु-या वाटतात...अल्पायुशी संध्याकालाच्या चिरोट्या जागेत ग्रेसांची कविता विश्व तोलून धरते ते ही स्वतःचेच! कोणाला खुश करण्यासाठी ही कविता यमक जुळवत बसत नाही ती स्वतःचे वृत्त घडवत निघते. वेदना आणी सायंकाळ या दोहोस अलिंगन देत ती सांगते...
"मी खरेच दुर निघालो,
तु येवू नको ना मागे
पाऊस कुठेतरी वाजे
हृदयाची तुटती धागे"

तरीही या कवितेचा पाठलाग सुटवत नाही, "माझ्या प्रतिमा,प्रतिके तुम्हाला समजत नाहीत म्हणून मी दुर्बोध ठरत नाही तो तुमचा प्रश्न आहे, मला माझी कविता सहज समजते" इतकं ठणकवून सांगत ती डौलात निघते सांध्यपर्वातील वैष्णवी बनत! झाडाची साउलवेळ टिपत हा दुःखाचा महाकवी निघतो...हाती आल्या दगडाचे फुल बनवतो आणी त्या फुलाचा कैफ वाचकांना चढतो!! अजब रसायन! गहजब कवी!!!

"मी महाकवी दुःखाचा
प्राचिन नदिपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फुल"

हे गारूड सुटवत नाही, उलगडत नाही, उमजत नाही तरीही ते भारतेच..!! सरांची कविता ही आपल्या विश्वातील कविता नाहीच मुळी ती त्यांच्याच विश्वातील एक स्वगत आहे...ते त्यांनाच बोलते..आपण फक्त जे आपल्या ओंजळीत सांडलं तेवढंच समाधान मानायचं..तरीही संपृक्त करणारी ही कविता आहे!! कधी तुकयाच्या हातामधला ती अभंग उचलत निघते तर कधी स्तनावरील गोंदणनक्षीत ती हरवते...गायकंठी हंबर हा तीचा मुलभाव! ती व्याकुळ करते,ती भारते,ती अलगद पसरत राहते निळे धुके बनत...! सांजप्रवाही अलगद वाहवत नेणारा हा कवी....सरांचे आज पुण्यस्मरण...!
सरांची कविता समजून घेण्याचा प्रयत्न करत तीचा अर्थ लावण्याची भुल न करता ती जशी आहे तशी स्विकारणेच सर्वोत्तम!! कारण ती समजून घ्यायला सरांच्या अनवट भावविश्वातच रममाण व्हावे लागते!!
"आकाश जसे दिसते
तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी

गाय जशी हंबरते
तसेच व्याकुळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही
अलगद भरूनी यावे"

सर आपली कविता माझ्या सारख्या अनंताना भारते!!
(Pr@t@p)
२६ मार्च २०२१
www.prataprachana.blogspot.com

Wednesday, March 24, 2021

मनसुबे!!!


कोसळत्या फुलांचे दुःख
बुलबुल घेवून आला
कालच बहुधा वसंत
झाडावर बरसून गेला

रंगीत बहर हे कसले
अफाट त्यांची छाया
सुकल्या झाडास मिळे
बहराची रंगीत काया

वाटे फुलास रंग
अनादी अनंत जगावा
झाडास लागे नित्य
बहरझडीचा सुगावा

आत्म्याची प्राचिन कळ
जाणून असते सारे
मी वाहत असतो शब्दांचे
रंगीत गंधपसारे

झाडाच्या तनावर
असतो एक चरा
ढोलीच्या हव्यासात
घाव का रे पाखरा?

तरी निनावी सय
झाडाला बिलगून राही
गंध दाटला वारा
फांद्यांना सलगून वाही

झाड घेते बांधून
स्वतःत एक ढोली
पक्षी खोदत राही
झाडाची आर्जवी खोली

पक्षी,फुले,पाने...
झाडावर त्यांची माया
निघून जाती सारे
झाडाची सोडून काया

मी झाड जणू शब्दांचे
कवितेचे बहर झेलणारे
भुगर्भातील जाणिवा
फांदीवरून बोलणारे

अनंत बहराचे जाणे
तरी झाड स्थिर उभे
मुळात त्याच्या रूजलेले
बहुधा वटवृक्षी मनसुबे...!!!
Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
25/3/2021





Monday, March 22, 2021

कळ्यांच्या फुलओटी....

ती फडताळातील वही
तो गुलाब सुकलेला
जणू घाव कुणाचा वर्मी
हृदयी बसलेला

पानात सुगंधी झरे
फुल जरी सुकलेले
सारेच बहर भेटती
वसंतास मुकलेले

फुल वहीत बंदिस्त
काटे कोण नेले?
ताटवे बहरलेले
उदास व्याकुळ झाले

फुल बोलते भाषा
मुके गुज दाटलेले
गझलांना सावरती माझ्या
ही पाने फाटलेले

सुकल्या पाकळ्यांनी
शब्दांना द्यावा रंग
तुझ्या पाउलदिशेला
माझ्या कवितेचे तरंग

फुल शिल्लक ठेवून
बहर निघून गेला
सुकल्या गुलाबाचा मग
जिव पाचोळा झाला

कवितेला घडण देण्या
हे फुल देई आत्मा 
जणू प्रकटून येई
निर्माल्यातुन परमात्मा

फुलत असतील ताटवे
तुझ्या बागेच्या पोटी
या शब्दांनीच तर भरल्या
त्या कळयांच्या फुलओटी

गंध कशाला नेऊ
बहर तुला जर दिले?
वहीत माझ्या असता
शब्दांची ब्रम्हफुले!

शब्द माझे अमृत!
वहीत गुलाब फुलतो
तुझा भरला वसंतही
या बहरांना भुलतो!
Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
22/3/2021

Sunday, March 21, 2021

भास दाटले अर्पण....

जातकुळी तुकयाची 
शब्दाला माझ्या लगडे
दगडाच्या मुर्तीचे 
दुःख अनामिक उघडे

राऊळी अबोल फुलांचे
निर्माल्य जाते वाया
भगवंत तरसतो धाराया
ओवीत दाटली माया

कवितेचे आकांत मुके
कोणाचे मन रडते?
गोसाव्याच्या झोळीला
शब्दांचे पातक घडते

अशी उदासवाणी 
ही कसली चाले भक्ती?
शब्दांच्या अवडंबरातुन
कवितेस मिळावी मुक्ती

मी चांदफुलीच्या नक्षी
नक्षत्रावर अलगद पेरे
चांद घालतो अवनीचे
अगणीत नित्य फेरे

फेरीत दाटे भाव
शब्दांचे चांदण ओले
तुझ्या प्रतिकांशी अगणित 
शब्दांचे सौदे झाले

दाटून येता तु
मनात होते गर्दी
लिहीता लिहता होती
शब्द तुझेच दर्दी!

हा कवितेचा पसारा
मी तुझ्यावर असा पसरे
मग वेचून घेई शब्दातुन
भाव अलगद हसरे

ती सुचते, ती रूजते
कधी होई ती पर्ण सडा
बिलोरी काचावरला ती
कधी भासे ओरखडा!

हे शब्दांचे लेणे
हे भावनांचे प्रतिक दर्पण
नसल्या राऊळी नित्य
हे भासदाटले अर्पण !
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
21/3/2021

Saturday, March 20, 2021

अंधार माझा सजतो

सांजेलाच का लागे
आठवांची झळ?
मी शोधत राही तुझ्या
अस्तित्वाचे तळ

झाडांच्या अबोल पानात
सळसळते शब्द पेरून
द्यावे झाड सारे तुझ्या 
आभासफुलांनी बहरून

कवितेचे अमरत्व मी
फांदिस बांधे झुला
फुलले बहर वाहतो
अनंत सारे तुला

दुर वारूळी मुंग्याचा
थवा करतो बांधणी
मी सजवून देतो अवकाशी 
एक स्फटिकी चांदणी

कबिर गातो दोहे
अनंताच्या पलीकडे 
कोणता देव तो
हुंदक्यातुन रडे?

सारेच बावर अवकाश
चंद्रास बाधते आभा
मी काळ्या ढगास देई
अंधार पेरती मुभा

दुर रानात पिक
प्रसवते अवघे मुके
कसले बहर रूजती
हे कसले आभासी धुके?

तुझ्या आठवणीचा प्रकोप
चांदण्याची धुळधाण
निपचीत निश्चल धुक्यात
बुडते तुझी आण

दुर रानात डोंगरकडी
झ-यांना देह फुटतो
भरल्या नक्षत्रात मग
एक तारा अलगद तुटतो

तो तुटता तारा घेवून
अंधार माझा सजतो
झाडांचा बहर मग
धरतीवर अलगद निजतो.
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
20/3/2021

Saturday, March 13, 2021

गावाच्या दुरवाटेला....


हवं तसं आभाळ 
रेखणे जमत नाही 
या बोटांच्या पेरांना 
अवकाश गमत नाही 

पिक कापणीच्या सुरात
रानाची वाट जळते
दुःखास लगडती जखमा
पक्षांची झुंबड छळते

शेकोटी भोवती चालती
लोकविलक्षण कथा
विस्तवात स्वाहा होती
प्राचिन मनाच्या व्यथा

वाटा निघुन जाती
दुःख पोहचे माहेरी
मायीचे हृदय जात्यात
दुःख दळे रामप्रहरी

हे वाट चुकले पाखरू
खिडीवर का बसले?
जड मनाच्या आत
दुःख दडवते कसले?

टाकून चारा पाणी 
बोलेल का ते काही?
गावाच्या दुरवाटेला ते
असे उदास का पाही?

कोणाचा निरोप त्याच्या
चोचीआड अडला?
गोकुळाच्या माळावर 
काल कृष्ण रडला!

गोठ्यात थबकती गायी
रान नकोसे वाटे
भर दुपारी वासरासाठी
कासेत पान्हा दाटे

गाव असा येई
जणू गायीचा हंबर
तेथल्या निपचीत वस्त्याना
जोडते विशाल अंबर

पेटल्या चुलीचे धुर
हवा इकडे आणते
पाराच्या चिंचेला प्रतिक्षेचे 
घरटे कोण विणते??
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
12/3/2021


चांदण्याची आण...


जळती रात हाती
चांद कुठे निघाला
चांदणीची आण मी 
दिली तुझ्या नभाला

वा-याच्या आत्म्यातुन
लहरीचा चाले दंगा
चकोर स्पर्शे चंद्र 
मनात तुझा पिंगा

मुक झुळुकी वाहती
कोणाचे नयन ओले?
हळदीच्या रंगाचे 
चंद्राचे हृदय झाले

मी दिल्या हाताचे आभास
हातात सजवून घेतो
तुझ्या हाताच्या रेषांना
तळव्यावर रूजवून घेतो

अनंताच्या वेदनेचे
मी चांदण झेलून घेई
मुक मनाच्या रातीशी
कितीदा बोलून होई 

यावी तुलाही आठवण
अशाच व्याकुळ वेळी 
निव्वळ दानाच्या आभासाने
भरून जाई झोळी

दुरून येतो इकडे 
आर्त हाकांचा ताफा
खुल्या चांदण्याखाली
झुरतो मुक चाफा

ओसरीत लावला दिवा
हलका, उदास, मंद
जळत्या वातीतुन प्रकटे
समर्पणाची धुंद

कसले असले रातीचे
उदास नदीचे पाणी 
सागराच्या दिशेचे
दुःख निघे अनवाणी 

मी त्यागुन देतो अलगद
स्वप्नांच्या मखमली राशी
खुण सोडतो माझी
ढगाआडच्या चंद्रा पाशी!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
12/3/2021

Wednesday, March 10, 2021

बहरास रंगउधाण....

येतो शिशिर म्हणून 
झाड मरत नाही 
उन्हाच्या मरणझळात
जमिनीत शिरत नाही 

यातनांचे सजवून सोहळे 
ते ठाम उभे राहते
म्हणून फुलल्या वसंताचे
युग रंगीत पाहते

कवितेने झाड व्हावे 
दुःख झडून जावे
शब्दांच्या वसंताचे
बहर अनेक यावे

झाडाने द्यावे स्वतःस
सावलीचे भरले दान
येत्या वसंतात येवो
बहरास  रंगउधाण....
     (प्रताप)
    "रचनापर्व"
 #visit www.prataprachana.blogspot.com

Monday, March 8, 2021

शिल्प तुझेच गहिरे...

गवतफुलांचे नशीब नसते
इतकेही बलवत्तर
होवून जावे कधी कुणाला
मोहवणारे अत्तर!

फकिराच्या झोळीचे
घेवून फाटके कोने
मी मागून घेतो शब्द
लिहीण्या तुझेच गाणे!

जिव असा का जडतो
नसता काही नाते
उगाच वेडे मनपाखरू
तुझ्याच दिशेस जाते!

नयन तुझे ओले
इकडे मनास भरती
चांदउगवत्या वेळी 
सांजप्रहर का झुरती?

उमगतात का तुला
माझ्या गझलांचे मतले
मी शब्द घेवूनी येता
शेर दोन फितले!

होवून जावे तुझे
नसलेच तसे काही
मी तुझ्याच बावर नजरेतुन
स्वतःस नव्याने पाही!

हे संकेतांचे आत्मे
शब्दात माझ्या फिरती
दुर निघाल्या वाटेवरती
फकिरांचे दुवे झुरती!

ही दुर टेकली नजर
तुलाच टिपून घेते
काल वाहीले फुल तुला ते
डोळ्यात फुलले होते!

स्वप्नजुडीच्या गालिच्यावर
सांडून जाते पाणी 
शब्दांना आणीक फुटते मग
आर्त हाकांची वाणी!

जाणते सारे गहिवर
तरी मन तुझे ते बहिरे
या शब्दांच्या आत खोलवर
शिल्प तुझेच गहिरे!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
8/3/2021


रचनापर्व

Saturday, March 6, 2021

तुझ्या ओसरी....

अशी लिहावी कविता
जणू रेखीव लेणी
भरून जावे मनात जणू 
सागराचे अथांग पाणी!

ओळखत जावे तुला
रोज पुन्हा नव्याने
घ्यावे झाड सजवून
तुझ्या पाखर थव्याने!

शब्दांना घडण द्यावी
जसे तुझे असणे
गझलांच्या काळजातील
मागावेत मतले उसने!

रेखावी तुझी प्रतिमा
जणू देखणी मुर्ती
चांद जसा पेरतो
सागर हृदयी भरती!

पेरावेत गहीरे भाव
तु व्हावे मिलन व्याकुळ 
राधेच्या काळजावर 
जणू गोंदले गोकुळ!

यमक असे जुळावेत
विरून जावेत शब्द
नादांच्या झंकारावर
व्हावे तु लुब्ध!

तु कोरून घ्यावेत शब्द
इतके सुबक लिहावे
जणू पुनवेच्या चंद्राला 
कुशीत घेवून पहावे!

हर शब्दातुन तुला
यानी गतजन्मीची हाक
तु सजवूनओंजळी घ्यावा
दौतीत बुडाला टाक!

वाटे शब्दसड्यातुन 
तुझाच बहर सांडावा
मनी दाटला वसंत
ओसाड फांदीवर मांडावा!

शब्दांच्या माळरानावर 
धुंद व्हावी एक बासरी
गवतफुलांचा सडा तुला नित्य
दिसावा तुझ्या ओसरी!!!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
6/3/2021

Friday, March 5, 2021

व्याकुळ चंद्र जागेल....

सखे! आज सांजवेळी 
दिवे वात चुकले
ज्योतीचे मनही मग
प्रकाशाला मुकले

ते काहुरी रस्ते 
आज मुक होते
त्यांना पुकारणेही
बहुधा चुक होते

हवेची झुळूकही
रित्या हाताने आली
जणू तुझ्या गंधाला
शिशिराची बाधा झाली

सावल्यांच्या झाडीत
अंधाराचे फुलले रस्ते
का कोण जाणे
ही रातही अबोल बसते

कसली फुटते ओवी
कसले हळवे सुर
माझ्या अवकाशाचा
चंद्र उगवतो दूर

ते नंदादिपही उजळ
फिक्या चांदणराती
कशास पातक घेते
अंधाराचे माथी?

तुझ्या व्याकुळ प्रहरी
हे कसले गीत नवे?
अशक्यतेच्या घटीकेतही
तुच तु संभवे

इथे अधून मधून पेरत रहा
तु असल्याचा भास
हे प्रतिक्षेचे पर्वही 
मग बनून जाईल खास

पापण्यावर स्वप्न दाटता
डोळ्यांना येईल भरते
रातराणीची वेलही 
जणू बहरासाठी झुरते

असू दे उशीला आभाळ !
झोप जर का लागेल
माझ्या बदली तुझ्या कुशीला
व्याकुळ चंद्र जागेल
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
5/3/2021

Wednesday, March 3, 2021

असल्याचा भास....

दिप पेटले असता
हा अंधार कसला साचे?
मनात उमटल्या गझला
कोण मुक्याने वाचे?

सखे! हे शब्दांचे नक्षत्र
तुझा अर्थ लागे
निज दाटल्या राती
नयन तुझे का जागे?

अजूनही रेंगाळती
तुझे स्पर्श धुसर
मोरपिसी रातीत हो
तुझा मखमली असर

नयन निःशब्द होवून
काव्य कसले अवतरे
ओथंबलेल्या ओठांना
समर्पणाचे मग झरे

तळव्यावर साचे अलगद
हुरहुरणारे तळे
दुर उगवला चांदवा
रातीत मंद जळे

निद्रिस्त मनाला माझ्या 
स्वप्नांचे गारूड भारे
मी अलगद उचलून घेई
तुला स्पर्शिले वारे

तु असता चांद फुलतो
नसता चांदणे रूसते
निद्रेच्या आर्त कुशीतुन
तु अवकाशी हसते

बहर फुलांचे घेवून
गंधित झाड होते
सडे प्राजक्ताचे चुंबती
तुझ्या घराचे जोते

निद्रेच्या खोल तळातुन
कोणाचे पैंजण वाजे?
तुझा आभास पेरे
गंध फुलांचे ताजे

असता सरत नाही 
तुझी मखमली आस
नसता दाटून असतो
तु असल्याचा भास....
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
3/3/2021

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...