Saturday, April 16, 2022

बहरप्रश्न....

मी निघालो खरा तेथून
मग मागे कोण राहिले?
पाषाणाच्या आत खोलवर
मी गंध फुलांचे पाहीले

ते झाड आता ही फुलते?
की त्याचेही बहर गेले?
की पक्षांनी मोडली वस्ती
अन् त्याचेही पाषाण झाले?

उतरायला हवे होते तु ही
कदाचित गर्तता कळली असती
एक लाट माझी संथ
तुझ्या लाटेस मिळली असती

हे सागरी मौन घेवून
आता मी नदीस काय बोलू?
नुकताच थेंब धारला
हा शिंपला कशास खोलू?

तु पाषाणातील फुल जप
जरी फांदीचा त्यास सोस
बहराचा काय भरोसा!
तो फुलेलही भरघोस!!

नसेल फांदी,नसेल झाड
तो येईल ना नेहमी सारखा
मी ही नसेन,नसशील तुही..
तर होईल ना तो पारखा

असो! येईल तो नव्याने
त्यास एक फुल माग
नाही पुकारले तुला मी..
का यावी तुला मग जाग?

मी बहराचे सारे पाश
केंव्हाच सोडले मागे
तरीही नयन तुझे बघ जागे
ध्यास कसला त्यांना लागे?

नकोस पाठवू हाक
हा रस्ता वळत नाही
काय करू तुझ्या बहराचे?
मग...मलाही कळत नाही.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७ एप्रिल २०२२





















1 comment:

  1. हा खरच एक बहरप्रश्न वाटला.
    दगडा मधील बहर, संथ लाट आणि न वळणारे रस्ते
    हे सगळ एक व्यथा विद्रोह भासतो..
    अक्षय शिंदे

    ReplyDelete

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...