Thursday, April 21, 2022

रानकावा....

तुझ्या नयनातील
ही प्राचिन हाक...?
तुझ्या माझ्या अस्तित्वाचा
हा आदिम गोंजर....
जंगलाच्या तळामुळात
होणारी एक आर्जवी सळसळ..

या भावविभोर मुहूर्तावर मग..
गळतात काही पानं
झडतात काही फुलं
मी बावर ओंजळीत
जमवतो हा हळवा रानकावा..

पाहतो त्यास कधी
दुरून कधी श्वासांच्या
अंतरावरून...
स्वतःला हरवून..मग..
मला आतुन घुमारे फुटतात

मी त्यांना तुझे भावरंग देतो
आणी बदल्यात मिळवतो..
एक भावगर्भी कविता..
तुझ्या हरवल्या दिशेला
अर्ध्य देण्यासाठी....

तुझ्या या हाकांचे
ऋतु येतात बेमोसमी
देतात फुलवे..पानझड
आणी माझे मन ..
कधी वसंत..कधी शिशिर
बनून व्यापते..
तुझ्या आभासाचे जंगल..
(Pr@t@p)
"रचनापर्व"
गझलांचे स्पंदन -मुक्तछंद
www.prataprachana.blogspot.com
२२ एप्रिल २०२२



No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...