Saturday, April 9, 2022

अपेक्षेची अक्षयझोळी....

हाक तरी का द्यावी
अशा काहूर घडी?
कुण्या काळोखात माझ्या
व्याकुळाची दडी?

येईल म्हणुनी कोणी
अंथरलेल्या वाटा
पुनवेत संकोचल्या
ओहोटीच्या ओल्या लाटा

प्राक्तनाचे वाहिले फुल
दगडास कधी का लागे?
देवळाच्या गाभा-याला
मुर्ती आसरा मागे

ढग असा का जळतो
त्वचेच्या रंध्राखाली?
अवकाश साजरा होऊन
गाठे नयनतळाची खोली

तु दिले अनाहूत वेळी
तुझ्या अस्तित्वाचे पिंजण
एकोप्याच्या बनात बहरे
आठवणीचे रंजन

हे झाड कुणाच्या बहराने
असे अवेळी वाकले?
तु न दिल्या फुलांनी मी
देऊळ सारे झाकले

होती वेळ अशी की
वेळ अशी ती नव्हती
मी नव्हतो तुझ्या अवती
अन् तु माझ्या भोवती

होते असे ते काही
जणू काहीच जसे नसते
ना माझे काही येथे
ना काही तुझे असते

तरीही असते आस
तु यावे अशा त्या वेळी
मागण्यापुर्वि ओसंडावी
अपेक्षेची अक्षयझोळी...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९ एप्रिल २०२२


















No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...