Saturday, December 24, 2022

शिशिर चंदन


चंदनाचे हात माझे 
घेवू कसे माघारा?
गंधाचा कसा तुला
मग मिळेल धागादोरा?

या स्तबधी रातघडीला
कसले वाहते वारे?
शिशिर वाचवत असतो
पान पहा गळणारे!

केशर दिवे विझले
चंदेरी अंधार सजला
का भास तुझा कवटाळे
हमसून अवेळी मजला?

हे गर्दनिळे घनाचे थवे
अंधार भरून येता
रातीच्या वसंत सावलीला
शिशिर सांगतो कथा

पालवीच्या ॠचा हिरव्या
मग शोधती तुझा आसरा
कुशीसन्मूख आभास
चेह-याचा तुझ्या हसरा

अशा व्याकुळ वेळी 
कविता मला सुचते
एक कविता माझी
अनंत पानगळ वेचते....

○ प्रताप ○
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५.१२.२०२२


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...