Friday, December 30, 2022

ओल्या चिमणीचे थवे



ओल्या चिमणीस रे!
द्या आसरा कोणी
मनी शांत खळाळता
भुगर्भातील पाणी

ओल्या हळदखुणांचे
ठसे कसे मोडावे ?
रातीच्या भुलवप्रहरी
स्वतःस कसे सोडावे?

शब्द थव्याचे गाणे
चांदण्याच्या कंठी फुटते
दुर उभ्या झाडाचे
फांदिवर काळीज तुटते

भग्न भिंतीस पाठमोरे
कोण उभे एकले?
माळावर कोणाचे डोळे
पाहुन वाट थकले?

फटफटेल पहाट म्हणूनी
तारे मंद का विझती?
शिणलेले काजवे कोठे
अनाथ एकले निजती?

मी विझता तारा घेवून
सकाळ पेटवून देतो
ओल्या चिमण्यांचे थवे
फांदिहून उठवून देतो...

प्रताप
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३०.१२.२०२२












No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...