Thursday, May 19, 2022

परिक्रमणातील प्रार्थनालये....

तो म्हणाला,
"तुझं प्रार्थनालय
माझ्या अगोदर नव्हतं"
मग तोही म्हणाला
"तुमचंही...!!"
हमरीतुमरीने दमून
दोघांनीही मग
पृथ्वीची साक्ष
काढायचं ठरवलं....

पृथ्वी शांतपणे उत्तरली..
"दर हजार पाच हजार वर्षांनी
उद्भवतात असेच
थोर पणाचे झगडे...
झगडणा-यांचे अनेक
धर्म,प्रार्थनालये व ते खुद्द...
पहुडलेत शांतपणे माझ्या उदरात
किती संस्कृती,किती धर्म
आले गेलेत माझ्या
हयातीत...
सारेच थोर म्हणवून
पिटतात आपापले ढोल...
"तुमचे युग आहे तो
झगडून घ्या...बाबांनो!
शेवटी तुम्हीही येणारच
आहात विसाव्याला माझ्याकडे..."

ते दोघेही मग गुमान
निघाले आपापल्या
प्रार्थनालयाकडे
...आणि पृथ्वी आपल्या
नियमीत परिक्रमेसाठी....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९ मे २०२२








No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...