Thursday, June 20, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 17: स्वतःला आकार देताना...


स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 17:  स्वतःला आकार देताना...


    जाहिरात आली!! लगबग सुरू झाली होती, खुप बाबी करायच्या होत्या. सगळ्यात पहिल्यांदा पब्लिकेशन कडे गेलो. चापेकर सरांना सांगितले, "सर! आता काम शक्य नाही. मला तयारी करायची आहे " सरांनी कुठलाही किंतु परंतू न ठेवता शुभेच्छा दिल्या, तयारी कर म्हणाले. मागे हटू नको आता, हे ही सांगितलं. पण शेळके सर नाराज झाले.त्यांनी इतर
दुस-याकडे भावना व्यक्त केली की, "कशाला हातचं सोडून पळत्याच्या मागे लागला आहे हा! एवढे सोपे असते तर मी कशाला पब्लिकेशन काढले असते!" मला वाईट नाही वाटले, उलट स्फुरण चढले. जिद्द जागी झाली. तयारी करताना अपयश येणार नाही याचा चंग बांधला.

       खुप कामे करायची होती! दुष्काळी कालखंडात जशी पाखरे दूरदेशी ऊडून जातात तशी आमच्या ग्रुप ची अवस्था झाली होती. सगळे विखुरले होते..पण आता एकत्र येण्याची लगबग सुरू होणार होती.कारण सगळे पिचले होते, त्रासले होते ,आता एकत्र येवून तयारी करणे हा एकमेव मार्ग शिल्लक होता आमच्या समोर .पण अभ्यासाला बसायचे कोठे? कशी तयारीची सुरूवात करायची? कोणकोण बसणार? काही सुचत नव्हते. तांदळे सर, अरूण भैय्या आणी मी तिन दिशेला तिन टोक ..पण आता ती एकत्र सांधने, या शिवाय पर्याय नव्हता. आम्ही तिघे भेटलो. काय करायचं आता? या वर गहन चर्चा झाली.पण मार्ग सुचत नव्हता..... पण तुमच्या स्वप्नात जिव असेल, त्यात चैतन्य असेल, आणी तुम्ही हॄदयाच्या तळापासुन तुमच्या स्वप्नांची आराधना करत असाल, आणि ते वास्तवात आणण्यासाठी मरेतो मेहनत करण्यास सिध्द असाल तर ...नियती स्वतः दोन पावले समोर येवून बंद दरवाजे सताड ऊघडत असते.....!! आणी एक किमयागार तुम्हाला मार्गस्थ होण्यास मदत करत असतो!!!( द अल्केमीस्ट पुस्तक खरं आहे!!!!)


         मा. विश्वास नांगरे पाटील सर!!!! एक महत्वाचं नाव!! (सरांना आज माहिती ही नसेल त्यांच्या एका पुढाकाराने तेथे धडपडणा-या आयुष्याला आधार मिळाला, फक्त त्याची एक झलक त्यांना 2018 साली सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच
ISO:9000 झालेले वळसंग पोलीस स्टेशन, त्याचे उद्घाटन करताना आमच्या पैकीच एका जिगरबाज ठाणेदारांनी त्यांना सन्मानपुर्वक करून दिली! त्या सहका-याचा संदर्भ येईलच) सर नुकतेच लातुरला पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले होते. त्यांना पोलीस कल्याणनिधीतुन पोलीस पाल्यासाठी स्पर्धापरिक्षा, पोलीस भरती अनुषंगाने भरीव काही करायचे होते. त्यांनी तसा मनोदय व्यक्त केला. अरूणभैय्याचे वडील पोलीस उपनिरीक्षक होते. अरूण भैय्या सरांना भेटले व त्यांनी सरांना विनंती केली. पोलीस पाल्यांना शिकवण्यासाठीची इच्छा दर्शवून त्यांनी ती जबाबदारी मिळवली. व त्यासाठी त्या पोलीस पाल्यांना शिकवणा-यांना पुर्वतयारी करण्यासाठी व पोलीस पाल्यासाठी पुस्तके लागतील व त्यांना बसण्यासाठी एक रूम व शिकवण्यासाठी हाॅल लागेल हे ही नमुद केले. सरांनी त्वरीत प्रतिसाद देत आवश्यक ती सारी पुस्तके ऊपलब्ध करून दिलीच पण त्या सोबतच एस पी ऑफिसच्या प्रांगणातच ऊपलब्ध एक रूम ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी तर मुख्य इमारतीत तळ मजल्यावर शिकण्यासाठी हाॅल ऊपलब्ध करून दिला. अत्यंत महत्वाची अडचण अशी अनाहूत दुर झाली...

       मला हुरूप मावत नव्हता. आम्ही एस पी ऑफिस मधे अभ्यासाला बसणार होतो. लातूर मधे अभ्यासीका नावाचा प्रकार नव्हता, त्या काळात अशी सुविधा मिळणे म्हणजे अप्रूपच!! आम्ही सगळे अर्थात मी, अरूण भैय्या, तांदळे सर, रोहिणी पोतदार( API) (अरूण पोतदार यांची बहीण जी ग्रुप मधे सगळ्यात अगोदर PSI पदी सिलेक्ट झाली) असे सगळेजण बसणार होतोआणी या ग्रुप मधे नंतर जाॅईन झाला संदिप जाधव (ASST. DESK OFFICER). बसण्याची व्यवस्था झाली होती. अभ्यासाला पुस्तके होती. आता फक्त अभ्यास करणे महत्त्वाचे होते.मी सर्व इतर बाबी सोडून अभ्यास करू पाहत होतो.आता कसलाही वेळ वाया घालायचा नाही असे ठरवून मी एक एक दिवस पाहत वेळापत्रक बनवले.सर्व अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून आपल्याला काय येतं काय येत नाही, याचे सखोल विश्लेषण केले. मागील प्रश्नपत्रिकेत पाहून कुठल्या विषयावर/ टाॅपिकवर किती व कसे प्रश्न विचारले आहेत याचा वस्तुनिष्ठ अंदाज घेतला. सगळ्या जुन्या नोट्स संदर्भास घेवून अत्यंत सचोटीने पहिल्या विषयापासुन नव्याने अभ्यासाला सुरूवात केली. तत्पुर्वी आम्ही सर्वांनी एकत्र बसून गहन चर्चा केली. त्यात अत्यंत तळमळीने ठरवले की खुप अभ्यास करायचा. आता कुठलीच कसर ठेवायची नाही. पुन्हा पुन्हा संधी येणे नाही. मला तर दुसरा चान्स घेणे परवडणारच नव्हते. मैदान दिसल्यावर जणू घोडा फुरफुरतो तशी अवस्था झाली होती. मी कुठल्याही अमिषाला, अडथळ्याला बळी पडायचे नाही, काहीही झाले तरी अभ्यासापासुन दुर जायचे नाही असे ठाम ठरवून टाकले, सामुहिक प्रतिबध्दता तर होतीच पण स्वतःशी इतकी घट्ट खुणगाठ बांधली होती की नशीबाने जरी ठरवले असते की मला तयारी करू द्यायची नाही तर मी नशीबालाच बदलायचे असे ठरवून सिध्द झालो होतो....

         रोज सकाळी 6.00 वा उठायचे. एसपी ऑफिसच्या लाएब्रेरीत जायचे.उपाशी पोटी अभ्यास होत नाही म्हणतात पण ते उपाशी पोटंच अभ्यासात जाज्वल्य आणायचे! दरम्यानच्या काळात जाहीरात आल्यास वडील येवून गेले होते.अभ्यास कर, कुठल्याही स्वरूपात वेळ वाया घालवू नको म्हणून सांगुन गेले. वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी सांगितले की गावाकडून टिफीन पाठवतो, त्या प्रमाणे ते गावाकडचा मिलिंद नावाचा मित्र ( गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करायचा), नितीन ( मामाचा मुलगा जो त्या काळात वेगळ्या गॅरेजवर काम करायचा पण नंतर एम एस डब्ल्यू करून तो आता जाॅब करतो) अथवा गावाकडून कोणी येत असेल तर त्याच्या जवळ पाठवायचे.तो टिफीन येणा-यावर अवलंबून असायचा. व शक्यतो तो कधी नितीन सोबत राजीव गांधी चौक(रूम व एस पी ऑफिस पासून साधारणतः 3 कि.मी. दुर ) तर कधी मिलिंद सोबत शाम नगर येथे यायचा. शाम नगर मधे आला तर तो लवकर भेटायचा. पण राजीव गांधी चौकात आला तर मात्र जायचा प्रश्न. मग दुपार उलटून गेली तर तो तसाच रहायचा कधी तरी भुकेची तिव्र जाणीव झाली तर मग कधी मित्राच्या गाडीवर, कधी सायकल तर कधी संदिप सोबत जाऊन आणी पर्याय नसल्यास चालत जाऊन तो आणला जायचा. दोन वेळचा डबा असायचा तोच दुपारी तोच रात्री. पण कुठलीच तक्रार नव्हती. असेल तर खा नाहीतर तसेच बसायचो..काही फरक पडत नव्हता. अभ्यासाचा एवढा ध्यास लागला होता की भुकेचे चोचले परवडत नव्हते.
        आधाराला हिमायत भाई चे छोटेखानी हाॅटेल सुरू झाले होते एस पी ऑफिस च्या कोप-यावर ..."कॅफे बरिश्ता"!!!!
( नजीकच्या भविष्यात ते एमपीएससी चे मुख्य केंद्रबिंदू झाले. लातूर मधील त्या काळात एमपीएससी करणारे जवळपास सर्वजणच तेथे भेटायला, चर्चेला यायचे...ते हाॅटेल अनेक सिलेक्शन आणी अनेक स्ट्रगल चे साक्षीदार आहे...हा पाॅईंट स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील महत्वाचा साक्षीदार आहे, तेथे आजही आमच्या मित्र परिवारातील विविध पदावर कार्यरत सर्व मित्र परिवार एकत्र भेटतो.. पण या हाॅटेलची ही स्थिती सुरूवात होते ती आमच्या ग्रुप पासून...बहुतेक मीच ती सुरूवात केली) जास्त भुक अनावर झाली तर हिमायत भाई कडे जाऊन चहा घ्यायचा..पुन्हा येवून बसायचे.. हिमायत भाई वेळ प्रसंगी ऊधार द्यायचे...आम्ही अभ्यासाचे ठिकाण सोडत नव्हतो, सकाळी 6 ते रात्री 12 अहोरात्र फक्त अभ्यास..! कोणाचे काय झाले..कोणाच्या घरी लग्न आहे, कार्यक्रम आहे, नविन मुव्ही आली, लातुरला कोणी सेलिब्रेटि येत आहे, सण आहे, मित्रांची पार्टी आहे कश्या कश्याचा मला फरक पडत नव्हता( आणी तो सुदैवाने सिलेक्शन होईतो पडलाही नाही! आणी तो न पडल्याने काही बिघडलेही नाही!!!)

    सुदैवाने आमचा ग्रुप अभ्यासाबद्दल फक्त गंभीरच नव्हता तर त्या सोबतच यात कठोर मेहनत करण्याची उर्मी पण होती, त्या सोबतच येथील प्रत्येक जण कुठल्याना कुठल्या विषयात विशेष कौशल्य बाळगून होता...सर्व जण अभ्यासाला असे भिडले होते..जणू उद्याच परिक्षा आहे. दररोज अभ्यास, नियमित गटचर्चा, सामुहिक वेळापत्रक, वैयक्तीक पाठपुरावा ..आवश्यकतेप्रमाणे एकमेकांना मदत..काही लपवाछपवी नाही..सर्व जण परस्परांना पुढे चालण्यास मदत करण्यास तत्पर.. चुकत असल्यास खडसावणे.. अभ्यासात कसूर झाल्यास जाणीव करून देणे की खुप दिवसानंतर जाहिरात आली आहे, महाराष्ट्रभर खुप मुलं अभ्यास करत आहेत...त्यामुळे स्वंयशिस्ती सोबतच सामुहिक शिस्त पण होती...हे सारे जण वेळोवेळी मदतीला सहकार्याला सोबत नसते तर...कदाचित काळाच्या रेट्यात मी पण अनामिक कथा बनून गेलो असतो...अनंत वेळा ठरवूनही आम्ही एकमेकाचे उतराई नाही होवू शकत....

        दररोज सोबतचे सहकारी नवनवीन पुस्तके वाचायला घ्यायचे..मला माहीत होते एवढी पुस्तके आपण घेवू शकत नाही त्या साठी मी सर्व ऊपलब्ध पुस्तकांचा संदर्भ घेवून झपाटल्याप्रमाणे माझ्या नोट्स काढायला सुरूवात केली..दरम्यानच्या काळात PSI/STI/ASST. ची पण जाहिरात आली..8मे 2005 ला ही पुर्व परिक्षा, 30 मे 2005 ला राज्यसेवा पुर्व परिक्षा अशा तारखा होत्या...ग्रुपमध्ये थोडी चलबिचल सुरू झाली. अगोदर 8 मे ची तयारी करू असा मानस व्यक्त केला गेला..मी त्यात सामील व्हायचे नाही असे ठरवले..मला राज्यसेवाच करायची होती मी त्या प्रस्तावास नकार दिला व तुम्ही करा हवे तर मी राज्यसेवाच करणार असे सांगितले.त्यावर प्रतिक्रिया पण आल्या, अगोदर PSI ची तयारी करू, राज्यसेवा खुप अवघड आहे तुलनेने, किमान एक तरी सिलेक्शन घेवू मग पुढची तयारी करता येईल... पण मी ठाम होतो...राज्यसेवा म्हणजे राज्यसेवाच !! पण तरी अनुभव येईल म्हणून मला सर्वांनी सल्ला दिला फाॅर्म भर. मी तो सल्ला महत्वाचा आहे हे समजून फार्म भरला. पण मी वेगळ्याने राज्यसेवा दुय्यम ठेवून त्याचा अभ्यास करणार नव्हतो.
काहीच पुर्वानुभव नसताना थेट राज्यसेवा, म्हणजे हे जरा खुपच अती होत आहे अशी माझ्या काही स्नेहयांची धारणा झाली होती...पण पर्याय नव्हता मी आता माझेही ऐकणार नव्हतो...कारण अंधारात स्वतःला झोकून देणे...स्वतःच्या स्वप्नांची तीव्रता अनुभवणे..आणी ती वास्तवात आणण्यासाठी स्वतःला शेवटच्या क्षणापर्यंत कसोटीला लावणे...माझी मानसिक तयारी झाली होती..संधी चालून आली होती...द्विधा मनस्थिती करून मला ती गमवायची नव्हती..

      दररोज आम्ही सगळे मिळून दिवसभर आपापला अभ्यास करायचो..सायंकाळी मला वगळता सर्वजण PSI च्या विषयाचे डिस्कशन करायला बसायचे..मी आपापला राज्यसेवेचा अभ्यास करत असायचो..दिवसेंदिवस अभ्यासाला खुप धार येत होती...मी न डगमगता चर्चेत सहभागी होत होतो, चर्चेत टिकतही होतो, आणि प्रचंड आत्मविश्वास त्यातुन मिळत असल्याने पुन्हा विषयांना अभ्यासण्यासाठी भिडत होतो...सगळेजण प्रचंड अभ्यास करत होतो..एकमेकांना मदत करत होतो..सगळेजण मला सिनीयर होते. मी पण माझी सिन्सिअरीटी जाणार नाही याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो..तिन महिने प्रचंड अभ्यासात कधी गेले कळले नाहीत..जवळपास सर्व विषयाच्या नोट्स तयार झाल्या होत्या..एम ए सेकंड ईअरची परिक्षा पण आली..एम ए चा अभ्यास ही सोबत सुरू केला. कारण मुख्य परिक्षेला 2 ऑप्शनल घ्यावे लागायचे...त्यातील एक विषय आत्ताच हातावेगळा होइल या दृष्टीने मी ती ही परिक्षा दिली...पेपर खुपच चांगले गेले..

    PSI ची पुर्व परिक्षा जवळ आली होती. सर्वजण खुप अभ्यास करत होते. मी राज्यसेवेची तयारी करत होतो... अभ्यास एवढा वाढला की, जवळपास सगळे विषय वाचून, समजून घेवून, नोट्स काढून, पाठांतर संपत आले होते..तो पर्यंत बाहेर सर्वांना अभ्यासाची पातळी समजली होती. त्यामुळे सोहम क्लासेस वर MPSC चे विषय शिकवण्यासाठी बोलावणे आले. सर्व मित्रांनी जायला सांगितले, त्याचा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढला पण त्या सोबतच जो मोबदला मिळायचा त्यातुन मासिके, झेराॅक्स, स्टेशनरी याचा थोडाफार खर्च भागणार होता..शिकवताना जाणवत रहायचे अभ्यास खुप चांगला झाला आहे फक्त तो टिकवून ठेवावा लागणार होता. आणी मी शिकवत होतो तर मला पास होणे अनिवार्य होते कारण लोकांना शिकवून मी नापास होणे हे परवडणारे नव्हते, सतत मनात एक सजगता होती..मी माझा अभ्यास अधिक सजगतेने करू लागलो...

         8 मे ची PSI पुर्वपरीक्षा आली. आम्ही सर्व जण परिक्षेला गेलो. मी ही गेलो, सिरीयसली पेपर सोडवला.. सगळेजण त्वरित परत आलो..आन्सर की काढली, आणि किती उत्तरे बरोबर आले ते तपासले. सगळेजण 150 पैकी 130+ !! मी 128 इतरापेक्षा कमी पण पास होण्यासाठी आवश्यक कटआॅफ च्या भरपुर पुढे!! आम्ही सगळेजण पास होणार याचा आत्मविश्वास आला , मला तर खुप आत्मविश्वास मिळाला होता कारण मी या परिक्षेचा नेमकेपणाने अभ्यास केला नव्हता मी राज्यसेवाकेंद्री अभ्यास केला होता पण तरीही मी ही परिक्षा अत्यंत गांभीर्याने दिली होती..(त्या गंभीरपणा सोबत घडलेली एक अतीशय गंमतीशीर बाब ,जी आजही आम्हा सगळ्यांना खळखळून हसायला भाग पाडते ती म्हणजे मला ग्रुपमध्ये एकट्यालाच गणितात पडलेले 20 पैकी 20 मार्क्स !! आमच्या ग्रुपमध्ये मला वगळता सर्वांचे गणित खुपच स्ट्रांग होते. आणी तांदळे सरांचे तर खुपच. तसे ते ही म्हणायचे, आणी त्यांना त्याचा खुप अभिमानही होता अर्थात आम्हा सगळ्यांना त्याचा आदर ही होता. मी दहावीला गणितात अगदी काठावर 52 मार्क्स घेवून पास झालेला त्यामुळे अधून मधून ग्रुपमध्ये माझी गणीतावरून टिंगल व्हायची..पण नंतर सगळे उलट झाले सगळ्या एक्सपर्टची मजा मी घेत असायचो अधून मधून आणी... संदिप विशेषतः तांदळे सरांची)

            गंमतीचा भाग वगळला तर या परिक्षेचा एक फायदा झाला. यामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षेला सामोरे जाण्याचा माझा आत्मविश्वास दुणावला. वडील आले त्यांनी परिक्षा कशी गेली विचारले, मी त्यांना पेपर चांगला गेला आहे हे सांगितल्यावर त्यांना खुप आनंद झाला. पुढच्या परिक्षेचा खुप चांगला अभ्यास करायला सांगुन ते गेले. दोन्ही भाऊ खुप सपोर्ट करत होते. मित्र सोबत राहून अभ्यास करत होते. संदिप जरा जास्त खुल्या मनाने वागायचा. एखादे नविन पुस्तक त्याने आणले तर त्याला माहीत असायचे की मला ते वाचण्याची जास्त इच्छा आहे. मी आपला अभ्यास करत असताना मुद्दाम ते पुस्तक जोरात समोर टाकायचा.आणि जोरात ओरडून म्हणायचा " ए! लवकर वाचून घेवून नोट्स काढून ठेव रे ! तु नोट्स काढ मी वाचेन नंतर निवांत" तो काळजी घ्यायचा की, इतर कोणाला सहज कळणार नाही की मला पुस्तक वाचायचे आहे पण मी ते आणू शकत नाही, आणी मला ही जाणवणार नाही की त्याला माझी अवस्था पाहून वाईट वाटत असते ! असा जिवलग आणी मन जपणारा मित्र भेटला हे नशीबच!! एखादा सण असताना स्वतः घरी जेवायला गेल्यावर स्वतःच्या आईला सांगून आग्रहाने माझ्यासाठी डबा घेवून येवून हक्काने , पण सहज आणले असा आव आणत "जेव ! बे! आईनेच पाठवला आहे डबा तुझ्यासाठी " असे म्हणत लहान भावाप्रमाणे जपणारा!!! स्वतःच्या दुःखद प्रसंगी हक्काने आवाज देणारा...
या सगळ्या दिलदार मित्रांच्या हातांनी मला कधीच मागे सुटू दिले नाही. आणी त्याची जाण ठेवत मीही त्या सर्वांचा आजही तेवढाच आदर करतो.

        परिक्षा जवळ येत चालली होती..झोप उडाली होती , रिव्हिजन सुरू होते, आमच्यातले काही जण घरीच बसून अभ्यास करू लागले. कधी कधी मला एकट्यालाच दिवस दिवस बसावे लागायचे, एकटा असताना स्वाभाविकपणे मलाही भिती वाटायची, कसे होईल आपले? हा प्रश्न छळत असायचा, मी स्वतःला धिर द्यायचो. मी कोसळू शकणा-या दरडीला भक्कमपणे पाठ लावण्याचा प्रयत्न करत होतो जणू. एका आत्मविश्वासाच्या व कष्टाच्या बळावर मी शिखर ही न दिसणा-या पहाडास अंगावर घेवू पाहत होतो. मला शिखर गाठायचे होते. मी पहाडाखाली दडपला जाणार नव्हतो...मी भिडणार होतो! (क्रमशः)

Friday, June 14, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 16: आभाळ चकाकले...

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 16: आभाळ चकाकले...


"काय नाव तुझं?" अंबेजोगाई या गावातील एका उच्चभ्रू वस्तीत पुस्तके विकताना एका सज्जन व्यक्तीने विचारले. मी त्यांना नाव सांगितले. त्यावर त्यांनी सांगितले, अरे! कशाला आयुष्य वाया घालत आहेस. अभ्यास कर, इतका वेळ पाहतो आहे काॅलनीत, तु सकाळ पासून फिरत आहेस. पुस्तके विकत आहेस.याने आयुष्य चालणार नाही. "कितवीला आहेस?" मी सांगितले " एम ए सेकंड इयर ची परीक्षा देणार आहे " "अरे मग काही चांगले कर ना! सेट नेट दे! एम पी एस सी कर!" गेल्या वर्षभरात मी किमान हजार घरे फिरलो असेन, पण मला पर्सनल होवून कोणी बोलले नव्हते. मी सकाळ पासून फिरत होतो. एक अस्वस्थता दाटून येत होती..मन लागत नव्हतं..आणी त्यात हे असे विचारणे..जखमांचे टाके ऊसवायला लागले..मी त्यांना सांगितले "सर ! एमपीएससी करणार आहे, पण जाहिरात येत नाहीय! मी दररोज वाचत असतो!" मी माझ्या बॅगेतून नोट्सचा गठ्ठा काढला त्यांना दाखवला. त्यांनी पाहीला. पाठ थोपटली..म्हणाले ग्रेट! पण हे सगळं करून तुला नाही जमणार! तु जास्त दिवस हे नको करू. "शर्यतीच्या घोड्यानी टांगा ओढणं बरं वाटत नाही!" काळजात कळ आली..डोळे भरून आले..मी मुका झालो...त्यांनी ओळखलं...प्यायला पाणी दिलं...आस्थेनं चौकशी केली..मार्क्स विचारले..मी त्यांना सांगितले..खुष झाले..म्हणाले " मी पण एमपीएससी साठी प्रयत्न केले. पण नाही झाले सिलेक्शन! पण त्या अभ्यासावर मी विस्तार अधिकारी झालो. एमपीएससी आयुष्य वाया जाऊ देत नाही. तु चांगला मुलगा वाटलास म्हणुन सांगितले. जास्त दिवस हे काम करू नको " मी त्यांचे आभार मानले...त्यांनी शुभेच्छा दिल्या.."तुझ्या सारख्या मुलांचा संघर्ष इतरांना प्रेरणादायी ठरावा " असे म्हटले.त्यांच्या बोलण्याने , सल्ल्याने काळजात हुरूप मावत नव्हता...गेल्या वर्षभरात मी एमए, एमपीएससीचे वाचन आणि पुस्तके विक्री या शिवाय काही केले नव्हते...त्यांच्या विचारपुस करण्याने मला हुरूप आला...बरे वाटले....एक चांगल्या सदिच्छा मिळाल्या होत्या...मी खुशीत लाॅजवर आलो ...किशोरला सांगितले " भाऊ , आता हे पब्लिकेशन सोडावे म्हणतो ! जे व्हायचे ते होवो...अभ्यास करतो" किशोर पण वैतागला होता पण त्याने मला समजावले...सध्या थांब काही दिवस करू...मग पाहू...तुला अभ्यास करायचा तर कर काही लागले तर पाहू आपण ..! मी वाटल्यास मदत करतो.....( मदतीचे हात पुढे यायला लागले....असे अनंत हात माझी वाट पाहत होते....नियती संकेत देत होती...!! फक्त ती परीक्षे अगोदर माझी सत्वपरीक्षा पाहत होती......) गमावण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते...अंधार दिसला की झोकून द्यायचे त्यात, एवढे मात्र ठाम शिकलो होतो!!!

लातुरला रूमवर परत आलो...मोठा भाऊ पण कळवळुन सांगायचा बस कर ! अभ्यासावर लक्ष दे! पण त्यालाही माहित होतं. हवेत अभ्यास करायला सांगु शकत नव्हता तो! पण त्याला माझ्या एम ए च्या अभ्यासाची कल्पना होती..एकदम थरार अभ्यास होता. वर्गात अभ्यासात एक नाव होतं माझं ..पुस्तक विकायचा आठवडा झाला की मी काॅलेजला जायचो..वर्गात शक्यतो कोणी नादी लागायचे नाही कारण चाललेला टाॅपिक अगोदरच मला ब-यापैकी माहिती असायचा..वर्गात माझा प्रतिसाद पाहून भिंगे सर खुष असायचे ...म्हणायचे...खुप चांगली समज आहे तुला विषयाची...नॅक ची टिम काॅलेजला आली...सरांनी 2 कमिटीचे काम माझ्याकडे दिले...ते संपवून मी इतरांना मदत केली...आमच्या सेक्शनचे चांगले नाव झाले...सर चांगलाच जिव लावायचे...अर्थात आजही त्यांचा तेवढाच जिव आहे.

एक अस्वस्थता मनात दाटली होती...खुप दिवस झाले MPSC ने जाहिराती टाकली नव्हती..त्या काळात वेबसाईट वगैरे काही नव्हती..तांदळे सर काॅलेज मधे असताना तेथे अभ्यास करायचे..तेथे त्यांचे सहकारी अतुल पाटील ऊर्फ बप्पा! ( अत्यंत दिलदार व दिलखुलास मित्र..सगळे जण त्यांच्यावर कोट्या करणार...तरीही अत्यंत दिलखुलासपणे पहाडी हास्य करत ते स्वीकारणारा...अगदी लहान वयापासूनच घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन लॅब टेक्निशीयन या पदावर काम करणारा...MPSC ने शेवटच्या अॅटेम्प्टलाही सिलेक्शन न दिलेला हा मित्र) अशोक मोहाळे (परभणी वरून आलेले, व त्याच शासकीय पाॅलिटेक्नीक काॅलेज मधे क्लार्क पदावर कार्यरत,ऊत्तम क्रिकेटर व अभ्यासू आणी अत्यंत सहकार्याची भावना असणारे मित्र ) हे ही तयारी करायला लागले होते. वेळ मिळेल तेंव्हा मी पाॅल्टेक्नीक काॅलेजला जायचो. तेथे अभ्यासा बदल चर्चा व्हायच्या. इतर ठिकाणी काय सुरू आहे, महाराष्ट्रात काय चर्चा सुरू आहेत या बाबत माहिती मिळायची. एक मात्र होते.असा एकही दिवस येत नव्हता ज्या दिवशी मी MPSC विसरलो असेन....हे सगळे जण चर्चा करायचे. तेथेही काही लोक त्यांना सहकार्य करायचे तर काहीजण टिकाटिप्पणी! रसायनशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आर्य मॅडम होत्या. त्या खुप प्रोत्साहन द्यायच्या. अधून मधून धुसर झालेल्या स्वप्नाला चकाकी मिळायची. मी Mpsc च्या आसपास राहण्याचा
प्रयत्न करायचो.


मी पुन्हा काॅलेज कडे वळलो होतो...सोबतचे मित्रमैत्रिणी गॅदरींग आणी इतर तत्सम कामात गुरफटले होते..काॅलेजने छोटेखानी ट्रिप काढली होती..मुड नव्हता,गेलो नाही... अशा छानछोकीच्या गोष्टी काही आकर्षीत करू शकत नव्हत्या मनाला..त्या पेक्षा मला कविता लिहिण्याचा असलेला छंद तगवत असायचा...ललित लिहायचो...वाचायचो.. त्यातील अगतिकता अनुभवायचो...पुन्हा वाटायचं..काही तरी करायला हवं आपण आयुष्यात ...भरीव...रेखीव..आखीव....!!!


इके (पाटील) भेटला ..एमपीएससी बद्दल बोलला...अतुल कुलकर्णी पण भेटला तोही बोलला..माळी सरांचे नाव ऐकून होतो..भेटलो नव्हतो..पण त्यांचे व भांबरे सर यांचे सातत्य ऐकत होतो..एके दिवशी मुक्रम भैय्या भेटले..."भाई कब आएगी रे अॅड?" म्हणून अस्वस्थ करून गेले..एक धुकं साचलं होतं..काॅलेजचे मित्रमैत्रिणी भेटायचे ..डिएड पुर्ण होवून ते
नोक-यांना लागले होते..मी चालत रस्त्याने फिरत असताना एखादी टुव्हिलर जवळ थांबायची.. त्यावरील शिक्षकमित्र हाक देवून थांबायचा...आस्थेने विचारायचा...थोडावेळ सोबत बोलायचा...फरक जाणवत असायचा दोघात....जिवाभावाचं बोलताबोलता काहीजण शिव्याही घालायचे...किती चांगली संधी घालवली मी डिएडची म्हणून झापायचे... काही जण रस्त्याच्या दुस-या बाजुने जात असतील तर हात दाखवायचे..थांबायचे...झाडाझडती घ्यायचे...चल निघतो भेटू म्हणून
निघून जायचे...मणामणाचे ओझे देवून...मी रिक्त मनाच्या पोकळीत स्वतःला काही आधार भेटेल म्हणून धुंडाळा घेत रहायचो ..चालत रहायचो...

गजा, जयपाल व इतर काही जण पुण्याला एमबीए ला गेले होते..अधून मधून ते यायचे...चर्चा व्हायची...बॅच मधले मुलं काही ना काही करत होते..गावाकडे जाण्या सारखं काही नव्हतं..कुढत फिरत होतो..पण.. .मळभ दाटून आलं की पाऊस पडतो...अंधार दाटून आला की पहाट होतेच...

मी एके सकाळी नित्यनेमाने आपापले काम उरकून बाहेर निघत होतो..डिसेंबरचा महीना होता..रूमवरील कामे संपली होती...मोठा भाऊ होता...तेवढ्यात रूमवर बातमी धडकली...एमपीएससी च्या राज्यसेवेची जाहिरात मुंबईत लागली होती काल...श्वास एकदम अडकला...अफवा असेल वाटले...गडबडीत धडपडत पेपर आणण्यासाठी निघालो..पाय-या उतरून खाली उतरलो..आणी एकदम लक्षात आले..बाजुला राहणा-या होके सरांकडे पेपर येतो...ते शाळेत गेले होते...गडबडीत त्यांचा पेपर उचलला...उघडला...पाहीले...आणी हर्षवायु झाल्यासारखे मी आरोळी ठोकली...आणी रूम मधे येवून जोरजोरात नाचू लागलो...भैय्याला कळत नव्हते काय झालं..."पागल झालास का? काय झालं ?" म्हणून त्यानं विचारलं...(कदाचीत अतिशयोक्ती वाटेल पण आजही जसंच्या तसं डोळ्यासमोर येतो तो क्षण!) मी ओरडंतंच त्याला सांगितलं "एमपीएससीची ॲड आली अॅड!!, हे घे पेपर बघ!" मी त्याच्याकडे पेपर फेकला...त्याने नीट पाहीले..तो ही खुष झाला..पण माझा उत्साह आवरता आवरत नाही पाहून त्याने एक वाक्य म्हटलं..." अरे फक्त जाहिरात आली आहे, सिलेक्शन नाही झाले..एवढे नाचतोस कशाला...पण कैफ चढला होता मला जणू....त्यातच माझा आत्मविश्वास होता की उत्साह, की नियती माझ्या तोंडून वदवून घेत होती...मी उत्तरलो..." होईल रे ,सिलेक्शन तर होईलच..ते झाल्याशिवाय मी मला सोडणार नाही तु बघ! ह्या अॅटेम्पटला मी सिलेक्ट होवून दाखवणारच!"

इतके दिवस एका काल्पनिक परिस्थितीत संघर्ष सुरू होता..आता प्रत्यक्ष युध्दभुमीवर येण्याची वेळ झाली होती. मी निघालो होतो...सुकर परिणामांची कल्पना करत....जिंकण्यासाठी !! (क्रमशः)











Monday, May 27, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 15 : ठोकर..ते शिखर....पावलांची सुरूवात...

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 15 : ठोकर..ते शिखर....पावलांची सुरूवात...

               व्हायचे तेच झाले..! लाॅ फर्स्ट सेमिस्टर क्लिअर होवूनही सेकंड सेमिस्टर मी दिले नाही...आयुष्यात पहिल्यांदा ओकंबोकं वाटत होतं...MPSC साठी कित्ती निगरगट्ट झालो होतो मी!! एवढे हाल असताना चक्क सेमिस्टर स्किप...! न परवडणारा शौक जडला होता...मग काय पुन्हा किर्तीत वाढ!! "पोरगं पुर्ण वाया गेलं!!"...एक बेफिकरी घेरू लागली...नैराश्य जास्त आक्रमक बनवत होतं..तांदळे सर व्यक्ती म्हणून खुप चांगले..पण स्पर्धक म्हणून खुप बेमुर्वत!! दिवसभर मी केलेल्या अभ्यासाचा सायंकाळी येवून चारपाच प्रश्नातच निकाल लावून टाकायचे...अक्षरशः गांगारून जाई पर्यंत प्रश्नाचा भडीमार...मी अक्षरशः दबून जायचो..मानसिकता उध्वस्त व्हायची...एखाद्या तगड्या पहिलवानानं नवशिक्याला पहिल्यां शड्डूतच चितपट करून आस्मान दाखवावं...तसंच काही माझ्या सोबत व्हायचं..जिव आक्रसून जायचा...मी धुमसत रहायचो..खुन्नस यायची...पण नुसती खुन्नस काही कामाची नाही हे लगेच दुस-या दिवशी जाणवायचं... कारण सर दुस-या दिवशी अभ्यासलेल्या विषयाच्या चर्चेत अक्षरशः झिंजाडून टाकायचे....मी यामुळे अभ्यासा बाबत खुप गंभीर होवू लागलो...मला जाणवायला लागलं..."दिल्ली बहोत दुर है।" नुसता अभ्यास नाही तर प्रचंड ताकदीचा अभ्यास करावा लागेल...मी गॅलरीत झोपलेला असताना निम्म्या रात्रीही दचकून ऊठून विषय आठवत रहायचो....!!

             वर्ष सरले, शिक्षणात खंड पडायला नको म्हणुन एम.ए. (लोकप्रशासन) साठी, दयानंद काॅलेज लातुर येथे प्रवेश घेतला. काॅलेज सुरू झाले. लातूर बाहेर राहत होतो...खर्चाला पैसे नाहीत. काय करणार...?? तांदळे सरांनी सल्ला दिला..काॅलनीतील मुलांचे ट्युशन घेता येईल गच्चीवर..!! त्यांनीच बिल्डींग मधे सांगीतले...मुलं ट्युशनला येवू लागली..थोडा फार खर्च भागु लागला..मग सकाळी काॅलेज, दुपारी घरी...अभ्यास...ट्युशन..चक्र सुरू झालं...तांदळे सर अधून मधून म्हणायचे "प्रतापराव! आयुष्यात काही मजा नाही, सोबतचे सगळे क्लास वन क्लास टू झाले..मी ईथे लॅब टेक्नीशीयन म्हणुन काम करत आहे, ही MPSC खुप छळत आहे! नशिबात सिलेक्शन आहे की नाही माहित नाही..पण मी सोडणार नाही MPSC ला सिलेक्शन घेतल्या शिवाय !!!!" "Selected but not recommended " या पातळीपर्यंत जाऊन आलेले सर!! खुप हळहळ वाटायची...भितीही वाटायची आपलं कसं होईल??? आपल्याकडे तर काहीच नाही..आपण तगणार कसे...सिलेक्शनला जास्त वेळ लागला तर आपण तर तगणारच नाही....मग पक्के ठरवायचो.. ..स्वतःला वारंवार बजावायचो..."एकाच सिरीयस अॅटेम्प्ट मधे आपण सिलेक्शन घेवून बाहेर पडायचे"...कारण सरांची परवड बघवत नसायची.....आणी तसं जास्त अॅटेम्प्ट देत बसणं मला परवडणार ही नव्हतं.....!!

                                  असेच एक झुंजारू व्यक्तिमत्व!! सन्माननीय प्रकाश कुलकर्णी सर ( सध्या Asst commissioner VAT/ GST)माझे शाहू काॅलेजचे सिनीयर...अंधाराचे अग्रप्रवासी...यांच्याही वाट्याला भोगच भोग , पण अत्यंत संयत पध्दतीने वागणारे.. काॅलेजच्या गॅदरींगमधे सुंदर आवाजात गाणे गाऊन बक्षिस जिंकणारे.. हस-या चेह-या आड दुःख झाकून टाकणारे ..तांदळे सर पण यांचा खुप रेस्पेक्ट करायचे...कारण अभ्यास!!!!! प्रकाश सरांनी बि एस सी नंतर MPSC करण्याचा निर्णय घेतला होता...लातुर मधे पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीचे क्लास सुधिर पोतदार सर (अरूण पोतदार यांचे नातेवाईक) यांनी आणले होते..तेथे प्रकाश सर असायचे..11 ऑगस्ट 2002 ची राज्यसेवा , फक्त 78 जागा..700 पैकी 590 मार्क्स घेवून उपअधीक्षक भुमीअभिलेख या पदावर निवडले गेले...(जर जागा असत्या तर या मार्कावर सहज डेप्युटी कलेक्टर मिळेल एवढे मार्क्स त्यांना ! पण या जाहिरातीत फक्त भुमीअभिलेख विभाच्याच जागा जास्त होत्या) "आलीया भोगासी, असावे सादर। " या ऊक्ती प्रमाणे कधी कधी जगावे लागते...पण 2004 च्या अॅटेम्प्टला सरांनी सध्याची पोस्ट मिळवून बरोबरी साधली...यांचा संदर्भ या साठी की तेही लातुर मधे असेच शुन्यातुन घडलेले.. आमच्या जडणघडणीच्या काळात सातत्याने प्रेरणा देणारे..रस्त्याने मी चालत जात असताना मधेच कुठेतरी चालत भेटणारे..स्वतःच्या व्यक्तीमत्वाने भारणारे...अभिप्रेरीत करणारे...त्यांचे सिलेक्शन माझ्या सारख्या अनेकांच्या स्व्प्नांना तारणारे ठरले...जवळचा माणुस एवढ्या कमी जागा असताना सिलेक्ट झाला...ही आत्मविश्वास वाढवणारी घटना....नकळत त्यांनी ऊभारी दिली मनाला...अशा अनमोल प्रसंगातून मी माझ्यासाठी आत्मबळाचे कण साठवत होतो...वाटायचे.. होईल आपलेही सिलेक्शन!! पण तो योग आला नव्हता अजुन...तो आणावा लागेलच हा निर्धार मनात वाढत मात्र होता....

                    हा 2002 चा अॅटेम्प्ट आला तसा गेला. त्या नंतर एक दीर्घ अवकाश....रिती पोकळी...निर्वात...!! महाराष्ट्रात कितीतरी मुलंमुली स्वप्न जपत तगत होती...जाहिरात यायचे नाव नाही...पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, कृषी विद्यापीठे..ही तगड्या ऊमेदवारांची ठिकाणे....शांतता काळातही आपल्या शस्त्रांना धार लावणारे दिग्गज स्पर्धक येथे असायचे ...असतात...मी थोडासा सजग झालो होतो...शहरात ज्ञानप्रबोधिनी आली होती...वाटायचे..जाऊ तेथे..क्लास लावू..पण फिस.....???? गुमान बसावे लागायचे....काय करावे सुचत नव्हते...तांबे सरांनी पण क्लास काढले होते....माझी अॅडमिशन घ्यायची ताकत नव्हती..वाटले आपण शहराबाहेर राहिलो तर प्रवाहा बाहेर पडू...नाही क्लास लावला तरी किमान क्लासच्या त्या पोरांच्या संपर्कात राहता येईल...तगमग वाढली...मोठ्या भावाला भेटलो...त्याला सगळं सांगीतलं...ठरलं...काहीतरी पार्टटाईम जाॅब करत करत अभ्यास करावा...तांदळे सरांना खुप वाईट वाटले...त्यांचा 2002 चा अॅटेम्प्ट निगेटिव्ह आला होता...आणी त्याच्या नंतर मीही निघत होतो तेथुन....पण मला पर्याय राहीला नव्हता....मला त्यांनी दिलेला आधार..मार्गदर्शन याची नक्की किंमत होती पण सगळा गाडाच चिखलात रुतून बसला होता. काहीच बदलत नव्हतं..माझा तुटलेला संपर्क मला खुणावत होता..मलाच काहीतरी धाडसी निर्णय घ्यावा वाटत होता...म्हणुन मी शहरात यायचं ठरवलं....सर पण शहरात काॅलेजला यायचेच..त्यांनाही भेटता येईल..तांबे सरांच्या क्लास जवळपास थांबता येईल...गावाकडून कोणी आले तर त्यांनाही सहज माझ्याकडे येता येईल..काॅलेज जवळ पडेल अशा ठिकाणी रूम करायची असे आम्ही दोघा भावांनी ठरवले....मग पुन्हा तेच...!! स्वस्तातील पण मोक्याची रूम शोधा...झोपडपट्टी पासुन सुरूवात ......विंचवाचे बि-हाड पाठीवर....!!

                       सात आठ भांडे..स्वंयपाकाचं सामान...त्याचं चित्रकलेचं साहित्य..माझी पुस्तकं...अंथरूण पांघरून...एका दिवसात मित्राची सायकल घेवून रूम शिफ्ट केली...अडगळीची असणारी पण मौक्यावरील जागेत रूम मिळाली...मी नववी पासून ज्या शाळेत होतो...त्या केशवराज शाळेजवळ....आयुष्य पुन्हा त्याच जागेकडं वळलं होतं...ज्या शाळेच्या कोप-यावर मी दहावीची परिक्षा फिस भरण्यासाठी तळमळत ऊभा होतो...व त्या जाणीव निर्माण केलेल्या क्षणाने मला आयुष्यात काहीतरी मोठ्ठं करण्याची जाणीव करून दिली होती व त्याच शाळेनं मला आयुष्याचं गोड स्वप्न दिलं होतं..!"द अल्केमीस्ट" पुस्तकातील सॅतिएगो प्रमाणे.......

         ठरल्याप्रमाणे जाॅब शोधत फिरत असताना मी काॅलेजच्या समोरच असणा-या "एकलव्य स्वाध्यायमाला" येथे गेलो...विनंती केली..त्यांनी जाॅब दिला...तेथे मुलांचे अॅडमीशन करून आणायचे ही जबाबदारी मिळाली...त्यासाठी एरीया वाटून दिला गेला...मी झुंजत होतो..गल्ली गल्लीत फिरत होतो...ठोकरा खात होतो...घरोघरी जात होतो...लोक कधी ऐकायचे..कधी ऊभेही करायचे नाहीत...अपमान व्हायचा..जिव्हारी लागायचा...मी बजावत रहायचो...स्वतःला.."हीच तुझी लायकी आहे..अभ्यास केला असता तर 2002 च्या अॅटेम्प्ट मधे पण सिलेक्शन होवू शकले असते...खा आता ठोकरा" वाटायचं आभाळ फाडून टाकावं...जिव कासावीस व्हायचा...पण पर्याय नव्हता तांदळे सरांकडून निघुन आलो होतो..रूमचे भाडे असायचे...तगुन रहायचं होतं...लातुरभर चालत फिरावं लागायचं...दमायला झाल्यावर...कुठेतरी थांबायचो..विचार करायचो...वर्गातल्या मुलामुलींचे , ओळखीचे घर टाळून पुढे जायचो...पण व्हायचाच कधितरी धोका आणी जिव आक्रसून जायचा..नेमकं ओळखीचंच कोणी तरी दरवाजा ऊघडायचे.....पण वाटायचं..नाही आपण काम करत आहोत..यात लाज कसली??? काम केल्याने थोडेच आपण लहान होतो?? स्वाभिमान वाढायचा...पण पुन्हा वाटायचं...अभ्यास करायलाच पाहिजे नाहीतर............. "आयुष्य जगण्याच्या संघर्षात ते घडवायचे राहून जाईल"(पण या बाबतीत मी खरंच सुदैवी आहे ज्यांनी ज्यांनी मला असं काम करताना पाहिलं..त्यांनी कधीच माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहचेल असं काही केलं नाही उलट त्यांनी जेथे जेथे शक्य आहे तेथे तेथे माझे कौतुकच केले)..मी एकलव्याच्या ठिकाणी चांगले काम करू लागलो.. मोठमोठी अॅडमीशन आणु लागलो...पगार भेटायचा...खर्च भागायचा.. पण MPSC........जाहीरातीची प्रतिक्षा फक्त....

                    तेथेही मला अत्यंत चांगले व दर्जेदार म्हणावी अशी माणसे भेटली...राजेंद्र चापेकर सर..(ज्यांनी माझ्या विचाराची दिशाच बदलली, मार्केटिंग क्षेत्रात खुप परफेक्ट असणारे सर त्याही पेक्षा माणसे वाचण्यात व त्यांना अभिप्रेरीत करण्यात जास्त परफेक्ट होते, मला त्यांनी मार्केटिंग मधेही चांगले करिअर आहे पण तु तुला आवडेल व ज्याचा ध्यास आहे तेच कर असा सतत सल्ला दिला व मनाला अत्यंत ऊभारी दिली...माझ्या क्षेत्राबाहेरील गुरू पैकी हे एक माझे गुरू!!) दुसरा मित्र नव्हे भाऊच ...किशोर गवळी, MSW झालेला पण परिस्थितीने तेथे आलेला...आजचा आमचा कुटुंबाचा सदस्य किशोर भाऊ!! सतत "भाऊ होतंय रे सलेक्शन! फक्त जाहिरात यायला पाहीजे" म्हणून माझ्यातील धुनी विझू न देणारा... अॅड. उध्दव रोहिणीकर...ज्यांनी नंतर शिकून एल एल बी केले...आज लातूर कोर्टात प्रॅक्टीस करतात.. ज्येष्ठ वयाचे पाटील सर, भागवत खंडापुरे...असे अनेकजण...आयुष्य शिकवणारे...घडवणारे...तगवणारे....

             मी अधुन मधुन काॅलेज पण करत होतो..M.A. फर्स्ट इयरची परिक्षा जवळ आली होती..अभ्यास करणे आवश्यक होते...परिक्षा आणी जाॅब..यात मी परिक्षेला प्राधान्य दिले..लाॅ चे एक वर्ष वाया गेले होते..आता पुन्हा शिक्षण सोडणे परवडणारे नव्हते...मी परीक्षेची तयारी केली...खुप चांगले पेपर लिहले...विभाग प्रमुख आदरणीय प्रा. सुभाष भिंगे सर , लोकप्रशासन विषयातील व समाजकारणातील आणी बहुजनवादी चळवळीतील महाराष्ट्रातील एक मोठे नाव..त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रशासन शिकणे म्हणजे पर्वणीच....सरांचा विषयातील वकूब फार मोठा...माझ्या सोबत वर्गात यशोदा सांडुर (लोकप्रशासन विषयातील महाराष्ट्रातील सध्याची लेखिका...युनिव्हर्सिटी टाॅपर) मनिषा गंपले (एम ए प्रथम वर्ष झाल्या बरोबरच लोकप्रशासनात नेट परिक्षा उत्तीर्ण करणारी...सोबतच MPSC करणारी पण नेट नंतर दिर्घ प्रयत्न करूनही जाॅब न लागल्याने MPSC मधुन नंतर Asst. Commissioner VAT/GST झालेली युनिव्हर्सिटी रॅकर) ह्या होत्या..भिंगे सर आम्हा सर्वांना खुप चांगल्या त-हेने शिकवायचे...समजुन घ्यायचे..मलाही खुप चांगले मार्क्स आले... मी MPSC करतो म्हणुन सर सतत प्रेरणा द्यायचे..विषय कसा लिहायचा यावर अखंड बोलायचे...

         सुट्ट्या लागल्या! परिक्षेनंतर जाॅब नव्हता चापेकर सरांना भेटलो..सरांनी प्रविण शेळके( MPSC चे जुने विद्यार्थी, माझ्या ग्रुप मधील सिनियर, बॅंकिंग व इंग्रजी या विषयात MPSC मधे कायम चांगले मार्क्स घेणारे पण सरतेशेवटी सिलेक्शन न झालेले) यांचे सोबत मिळून "क्वालीटी पब्लिकेशन" नावाचे पब्लिकेशन सुरू केले होते..त्यांची पुस्तके विकण्याचे काम मिळाले..एकलव्याचा जुना ग्रुप भेटला...ते ही तिथेच काम करत होते...माझे असे काम करणे म्हणजे निव्वळ मलमपट्टी होते..पण पर्याय नव्हता...निवांत बसून अभ्यास करण्याचे नशिब नव्हते...तांदळेसर भेटायचे..क्लासेसच्या टेस्टपेपर बद्दल बोलायचे...मी क्लास लावू शकत नव्हतो..क्लासच्या आसपास ही जाता यायचे नाही...कारण ती चैन परवडणारी नव्हती..जगण्याचे वांधे होते...जेवढे पुस्तके विकू तेवढे पैसे भेटायचे...मी आणी किशोर मिळून फिरायचो...एका पुस्तकामागे 15 रूपये...रूमचे भाडे..खर्च..सगळी जुळवाजुळव..मोठा भाऊही शिकत शिकत काम करायचा कधी पेजर कार्यालयात ऑपरेटर म्हणून ..तर कधी (चित्रकलेच्या ओढीने) स्टेज डेकोरेशन, पेंटींग, गणेश ऊत्सवावेळी थर्माकोलचे मखर बनवणे...

         अधुन मधुन गावाकडून वडील यायचे...इकडचे तिकडचे बोलायचे...तळमळ पहायचे...मनातल्या मनात तळतळ करायचे...आई बिचारी काही बाही पाठवत रहायची.....तीला भेटून कितीतरी दिवस झालेले असायचे....वाटायचं कधी संपेल हे सगळं...? कधी जातील हे असे विस्कळीत झालेले दिवस....या पुस्तके विकायच्या कामाला नाही म्हणन्या इतपत स्थिती व परिस्थिती आली नव्हती... वणवण फिरत होतो...लातुर शहर संपले फिरून..मग आम्ही इतर तालुक्याला जाऊन पुस्तके विकू लागलो...भेटणारे मित्र MPSC बद्दल बोलायचे..मुक्रम भैय्या, तांदळे सर, प्रदीप ईके(पाटील), अतुल कुलकर्णी ( कक्ष अधिकारी मंत्रालय) ...पण मी काही करू शकत नव्हतो...शांततेत बसुन अभ्यास करण्या इतपत नसणा-या परिस्थितीशी मी झगडत होतो...वाटायचं खुप अभ्यास करावा...मन लावून अभ्यास करावा...पटपट परीक्षा देवून टाकावी..प्रत्येक टप्प्यात पास व्हावं....मुक्त व्हावं या दडपणातुन.....त्यासाठी सगळं कालचक्र फिरवून टाकावं...पण..... " कालै तस्मै नमःl " ...फक्त त्यास सादर असणे एवढेच माझ्या हातात होते....

                एक दिशाहिनता घेरत असते...आभाळ विरळत असते....जिव कासाविस होत असतो...तुम्ही सर्वात असुनही एकटे असता... विविध तालुक्यात पुस्तके विकायला गेल्यावर आम्ही सगळे एखाद्या लाॅजवर थांबायचो....सकाळी तयार होवून निघायचो....एका एरियातुन दुस-या एरियात जाताना व घरनिहाय अपमान किंवा विक्री होताना... पडणा-या पावलासोबत मी माझ्याशीच मुका संवाद साधायचो...माझ्या गावाबाहेरच्या माळरानावरून एक अनामिक हुरहुर येत रहायची माझ्याकडे सतत...मला व्यापत रहायची... अपमानाने डोळे पाणावायचे...चेहरा उतरून जायचा...काय करतोय आपण? काय करायचे ठरवलंय आणी चाललंय काय??? मनात यक्ष प्रश्न नुसते....झुकल्या खांद्याने मुक होवून मनात आकांत चालायचा आक्रोश चालायचा....किशोरला बरोबर समजायचं...तो उत्साह बांधायचा" भाऊ! अॅडव्हरटाइज येवू दे! बघ तु होणार!!! हे काय रं काही दिवस करायचं आहे" त्याच्या शब्दांनी मन ऊभारी घ्यायचं...खुणगाठ बांधायचं.... सांगायचं स्वतःला...काळाने ही माझी कथा कितीही दडपण्याचा प्रयत्न चालवला तरी....मी नामशेष होणार नाही... काहीही होवो...मी संपणारही नाही ! मी त्याच्याखाली नष्ट न होता त्याला भिडणार ...माझी कथा मी लिहीणारच!!!! मग मला फुरफुरल्या सारखं व्हायचं...मन आभाळाला भिडायचं.....मन आकाश व्हायचं......कुठुन एवढा यज्ञ आत चेतला होता मला माहित नाही..कित्ती अनंत मर्यादा होत्या माझ्या समोर ....पुस्तके नाहीत..मार्गदर्शन नाही..क्लास नाही..ते लावायची ऐपत नाही... आपण इतरा सारखे पुणे, औरंगाबादला अभ्यासासाठी जाऊ शकत नाही.. इतर सगळे जण अभ्यास करत आहेत..आपण दररोज जगण्यासाठीच धडपडत आहोत ..... पण एवढ्या मर्यादा जरी होत्या तरी त्याही पेक्षा जास्त पटीने मला ठाम विश्वास होता!!! आपण होणार!!! होणार म्हणजे होणारच....!! ...कसे? कधी? काही माहित नाही...पण आतला आवाज सांगायचा...मी हुरूपाने चालू लागायचो...माझी पावले अनंत व्यापण्यासाठी झपाटून पडत रहायची..कधी ...ठोकर खात..कधी..स्वतःला रोवत....!!!
(क्रमशः)



Saturday, May 25, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 14: वाट ...न सापडणारी...

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 14: वाट ...न सापडणारी...



           बि ए फायनल झाले !! काॅलेज म्हणजे बाग समजुन फुलपाखरासम विहरणा-या विद्यार्थ्यांना बाहेरील वास्तविकतेशी जोडणारा हा टप्पा. एक सुरक्षित कोष फुटून खुल्या जगात येण्याचा व जागृत करणारा हा टप्पा. स्पर्धेचं निर्दयी वादळ घोंगावत असते बाहेर...आणी फुलपाखराच्या पंखाने वादळ चिरता येत नाही हे समजे समजे पर्यंत अनंत फुलपाखरे चिरडली जातात त्या वादळात असा हा टप्पा ! अशी वादळे चिरून, त्या वादळाच्या वर जाऊन जर ते दिमाखात पहायचे असेल तर पंखात गरूड बळ आणावे लागते. झुंजण्याचा सराव असावा लागतो..म्हणजे भिडता येते वादळाला थेट!! पण माझ्यासाठी ती बागच काटेरी असल्याने मला पंखाना धार लावण्याशिवाय पर्याय नव्हता. मी "काय करायचे आता ?" या पोटी व लवकर काही तरी करता येईल या साठी दयानंद लाॅ काॅलेजला प्रवेश घेतला. Mpsc करे पर्यंत अजून काही करता येईल ही धारणा तर होतीच पण ते काॅलेज सकाळी असल्याने व 12.00 वाजेपर्यंत ते संपत असल्याने दिवसभर अभ्यास करता येईल हा उद्देश पण समोर होता.
               लाॅ काॅलेजला सुर्यवंशी सर प्राचार्य होते, ते भारतीय राज्यघटना शिकवायचे. सकाळी काॅलेज सुरू झाले. पण ते शिकण्यात आता मन लागत नव्हते. एक उदासवाणी परिस्थिती होती. बिए झालो म्हणून आणी निवांत बसून रहायचे नाही म्हणून पुढे शिकायचे असं काहीसं ढकलगाडी सारखं उगीच चालत राहणं सुरू झालं..लाॅ काॅलेजला वेगवेगळ्या काॅलेज मधून व शाखेतुन मुलंमुली आलेली...त्यातील काहिना वकील व्हायचं होतं..काहींना जगापासून, बेकारी पासून आणी त्यांना कोरडेपणाने हिणवणा-या नजरांपासून लपायचं होतं त्यासाठी हे एक ठिकाण त्यांनी शोधलं होतं...मी पण त्यापैकी एक .....एक " अॅडेन्टिटी क्रायसीस" न थांबणारा...दिवसेंदिवस ओरखडे ओढणारा... आणी ते ओरखडे जास्त बेसूर दिसताहेत म्हणुन पुन्हा बोचकरणारा....रोज सकाळी काॅलेजला जायचं..आलो म्हणून बसायचं..लक्ष मात्र सगळं MPSC कडे लागलेलं.. ग्रुप मधे केलेला अभ्यास आठवायचा..हुरहूर वाटायची...पण Mpsc ची जाहिरात काही तिन महिन्याला येत नाही..ती कधी येइल माहिती नाही...तो काळही असा की जाहिरात येणं ही नशिबाचाच भाग!!(नेमक्या या चक्रात मी अडकणार होतो पुढील 3 वर्ष जाहिरातच येणार नव्हती!!! एक फक्त 78 पदाची -2002 हा एक अपवाद) मी काॅलेजला जात होतो त्यात काही राम नव्हता ! ऊगी स्वतःला कसंबसं थोपवणं होतं...फुटणा-या धरणाच्या भिंतीला पाठ लावून थोपवल्यासारखं.....वर्गात मुलंमुली चढाओढिनं शिकायची....आणी मी हरवत चाललो होतो....

            जमून आलेला MPSC चा सगळा ग्रुप विस्कटला होता. काही दिवसांनी दिलेल्या पुर्व परीक्षेचा निकाल आला...फक्त अरूण पोतदार हे क्लिअर!!!.या पुर्वी मुलाखती दिलेले तांदळे सर सह सगळे नापास....मी तर लिंबूटिंबूच...!!! अरूणभैय्या मेन्ससाठी पुर्वीच निघून गेलेले...नोकरीमुळे तांदळेसर लातुरात अडकून पडलेले...पराभवाचे दुःख एकट्याने पचवणारे...गावाकडे दुचाकीवर जायला निघून...दुःखाने ओघळणारे अश्रू ...गाडी चालवताना वारा लागल्याने आलेत असे वाटावे...अशा पध्दतीने गावाकडे जात जात मनसोक्त रडून घेणारे...सगळं मळंभ दाटून आल्यासारखं....मी सर्वच दृष्टीकोणातुन कटलेल्या पतंगासारखा झालो होतो...रूमवर ही सगळी उदासीच..मोठा भाऊही बिए झाला होता..त्याने एटिडी या कोर्सला अॅडमीशन घेतले होते..तो आपले चित्रकलेचे पॅशन घेवून चालला होता..तो एका आर्टिस्टकडे काम पण करू लागला...लहान भाऊ शाहू काॅलेज मधे वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा गाजवत होता..राज्यभर फिरायचा...बक्षिसं आणायचा..आणी परत आल्यावर पुन्हा गावाकडून ये जा करायचा...मी मात्र रद्दाड झालो होतो....वाळवंटात भर ऊन्हात कितीही चाला...हिरवळ दिसणारच नाही आणी दृश्य ही बदलणार नाही अशी अवस्था नुसती...
गावाकडे लातुरला येणा-या लोकांनी तिकडे गावात आमची अखंड किर्ती चालवली होती..."पोरं वाया गेली !!!"

                 कोणी विचारत नव्हतं....कोणाच्या लेखी आमचं काहीच अस्तित्व नव्हतं ..फक्त या फाटक्या काळात काही फाटके मित्र मात्र सतत आपले अस्तित्व राखुन होते...हरिकृष्ण कुलकर्णी , दिपक बाभुळसरे, गज्या अधुन मधुन येत रहायचे रूमवर...हरिकृष्ण आता सामाजिक व बॅकिंग क्षेत्रात एक मोठं नाव आहे नाशिक मधे.शाहू काॅलेजमधे काॅमर्स शाखा असणारा हा बहाद्दर..पण आम्हा तिन्ही भावाचा दोस्त!...राजकीय, सामाजिकदृष्ट्या स्वतंत्र व ठाम मते असणारा, वैचारीक विरोध करणारा पण त्या विरोधासह मैत्रीचे अस्तित्व जपणारा....हरिकृष्ण ऊर्फ ह-या...ऊर्फ हरीपंत!! तो आपल्या दर्दभ-या आवाजात जुनी गाणी म्हणायचा...रूमवर बसायचा..सुखदुःख वाटत रहायचा...सोबत जेवण करायचा...तो कसा जुडला गेला हे माहित नाही पण आज पण तेवढाच तिघा भावाशी जुडला गेला आहे...मनातुन.....तसाच अजुन एक जिवलग मित्र सतीश कागदे.. सर्वांचा लाडका "!!!"....अत्यंत कष्टाळू...अत्यंत संघर्ष करणारा तरीही दिलखुलास व सर्वांचा प्रिय..सबंध काॅलेजचा काळ शिक्षण, मित्र व जाॅब ..!! स्वतः कष्ट करून घर चालवणारा...आज एका फायनान्स कंपनीत मोठ्या हुद्दयावर आहे...आजही संघर्ष करणारा...लातुरला गेल्यास...भावा कधी भेटायचे...म्हणत आग्रही असणारा....

            काॅलेजमधे काही रस ऊरला नव्हता..रोजचे जगणे अवघड झाले...रूमचे भाडे प्रती महिना सहाशे रुपये ....पण तेही गेल्या सात महिन्याचे थकले होते..घरमालकीण आजी चांगली होती..पण तिलाही पैशाची गरज भासायची......सगळं जग दुरावल्या सारखं व महाग होवून आवाक्या बाहेर झालं होतं.....सगळी जगण्याची धुगधुगी थंडावलेली अवस्था.....पण स्पर्धा परिक्षा म्हणजे एक असा निखारा आहे जो कधी विझत नाही....विझु देत नाही....

             अचानक एके दिवशी तांदळेसर रूमवर आले..त्यांनी आमचे हाल पाहिले...आणी त्यांनी मला आग्रह केला.."मला शासकीय क्वार्टर मिळाले आहे,मी एकटाच राहीन..त्यापेक्षा आपण दोघे क्वार्टरवर राहू, रूम च्या भाड्याचे पैसे वाचतील,मी दिवसभर ऑफिसला जात जाईन, माझे पुस्तके घेवून अभ्यास करत जा दिवसभर, मी आल्यावर मग डिस्कशन करत जाऊ! रेशन भरण्याची आवश्यकता नाही,गावाकडून काही मागवायची आवश्यकता नाही " मी विचार केला रोज एकटेच निरंतर ऊदास होवून फिरण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.... पण ते क्वार्टर होते एकदम शहराबाहेर..शासकीय काॅलनीत...मी विचार केला शहरात राहून तर काय असे लक्षणीय करत आहोत, आणी काय तिर मारत आहोत आपण! त्या पेक्षा जाऊ , किमान अभ्यास तरी करता येईल.सर्व चंबू गबाळ आवरून मी निघालो..दिशा नाही दशा नाही..ऊगवता सुर्य नविन काही घेवून येत नव्हता...शहरात मित्र होते पण सर्वापासून तुटुन गेलो होतो..सारेच बिचारे गांजलेले...शिकायला शहरात यायचे... डिग्री झाली आईवडीलांना वाटायचे आता शिक्षण झाले काही चांगले होईल..आपला पोरगा काही मोठं काम करील.पण शिकणा-यांनाच माहिती नव्हतं काय करायचे....आयुष्य खरंच किती गुंतागुंत निर्माण करतं....त्यातील काही बिचारे आजही संघर्ष करत आहेत जगण्याचा ...तगण्याचा....

               MPSC साठी आवश्यक म्हणून मी एम एस सि आयटी चा क्लास लावला...रोज तांदळे सर त्यांच्या गाडीवर घेवून शहरात यायचे..मी क्लास करायचो...काॅलेज शक्यतो टाळून परत चालत निघायचो...येवून काही बाही वाचत रहायचो...दिवस कटायचा नाही..मन भिरभिर असायचं..आश्रित झालं होतं आयुष्य ...तांदळेसर काही जाणवू द्यायचे नाहीत..लहान भावा सारखे जपायचे...पण मन खात रहायचं....कुठलीही झुळुक नसणा-या स्थिर पाण्या सारखं आयुष्य झालं होतं...त्यावर नैराश्याचं शेवाळ जमा होणार नाही याची दक्षता घ्यायची होती....पण काळ थांबला होता...मी एम एस सी आय टी पास झालो..तेवढीच एक कमाई पण लाॅ साठी सेमीस्टर पध्दती असल्याने आणी त्याच्या ऐवजी एम पी एस सी चा अभ्यास करत असल्याने लाॅ आपण करू शकत नाही हे समजले व त्यात वेळ जाणे योग्य नाही हे मनात ठाम केले ...आणी वर्ष संपायची वाट पाहत राहीलो...अधूनमधून भाऊ भेटत रहायचे.एकमेकांशी भेटण्यासाठी मित्राकरवी निरोप द्यायचो..दिशा ओघळून गेल्या सारखा एक निर्वात अवकाश घेरत असायचा....एकाच शहरात आम्ही तिन टोकाला तिघे.......आणी परिस्थितीशी झुंजत व कधीतरी दिवस सरतील या आशेवर आमच्या पाठीशी ठाम ऊभे असलेले आईवडील.....

                 जिव कासावीस होऊन, तगमग असुन काही चालत नाही तो काळ यावा लागतो...तो क्षण यावा लागतो...मी माळावरचा दगड होवून निपचित पडलो होतो...ऊगवणारा हर दिवस अंगावर झेलत...मला माझे दगडपण झटकून द्यायचे होते....आणी घडायचे होते एक सुबक रूपात पण मुर्तीकार ही नव्हता....जडशिळ आयुष्याला प्रतिक्षा होती एका टाक हातोड्याची...मी भविष्याचा वेध घेत तगत होतो...एमपीएससीची जाहिरात नव्हती..ऊगी वाचत रहायचो...लिहीत रहायचो...नोट्स काढायचो...पण त्याला धार नव्हती...वादळ चिरत जाणा-या बाणासारखा वेधक अभ्यास होत नव्हता..काय करावं सुचत नव्हतं...एखाद्या किरर्र जंगलात वाट हरवावी...त्यात धो धो पाऊस कोसळत रहावा...रात्र व्हावी...तो तो आपण रस्ता सापडण्यासाठी आकांताने प्रयत्न करावेत...आणी सतत चालत रहावं...आणी अधुन मधुन आपल्याला जाणवत रहावं....आपण अजुन खोल जंगलात जातोय.......(क्रमशः)

Wednesday, March 27, 2019

जर....!

जर......
झाल्याच कधी माझ्या
वाटा निस्तेज न् धुसर
आणी जर अंधाराला
पडलाच चंद्राचा विसर.....

तर ....
तु द्यावेस मला
प्रकाशाचे ओंजळभर दान
आणि भांबावल्याच दिशा
तर तु द्यावेस मला भान...

मी ..
प्रकाशीत होण्यासाठी
कधी पेटवलेच शब्द
तर लिहावेस तु व्याकुळ होवून
माझ्या कवितेचे प्रारब्ध...

कधी...
ऊठलेच हाकारे विस्मरणाचे
तु ओळखावे माझे गीत
ऊमलून यावे वा-यामधूनी
अमिट सुरेल संगीत...

कधी...
निखळलाच तारा
तु आभाळ घ्यावे पेलून
फांदिवरून कोसळणारा
बहर घ्यावा झेलून.......!!!


(प्रताप)
"रचनापर्व"
28/3/2019

















Monday, March 25, 2019

आकाशाच्या आत खोलवर.....

शब्द पेटत्यावेळी
वात दिव्याची मंद
अंधाराच्या काळजाला
फुटे फुलांचा गंध

मी शब्दांची रचतो
पानोपानी रास
तमभारल्या वातीचे
भरून येती श्वास...

मी प्रकाश सावल्यांना
शब्दात नित्य गुंफले
काळजाच्या कुपीतील
अत्तर तुजवर शिंपले

हा गंधभारला क्षण..
टक्क जागी मध्यरात
शब्दांचा मुक पुकारा
मोहरे दिव्याची वात....

शब्द बांधत्या वेळी
रात्र सैल पडते
आकाशाच्या आत खोलवर
तुझे चांदणे दडते....

(प्रताप)
"रचनापर्व"
26/3/2019

























Saturday, March 23, 2019

घसरून जाते फुल.....

'चांद थबकती 'घडी
हळवा हळवा माळ
झडत्या पानांच्या पायी
समर्पणाचे चाळ

'हवेस 'लागते कोठून
तुझ्या तनुगंधाची हुल
फांदीच्या घट्ट मिठीतून
घसरून जाते फुल

पाणगळीची घटिका
पाचोळा हवेत ऊडतो
तुळशीच्या मंजिरीत
श्वास बावरा अडतो

प्रेमदग्ध काव्यकुळ माझे
शब्दांना न  दुभंग
गाभा-याच्या गर्त खोलवर
भरून वाहे अभंग

माझ्या शब्दझडीचा बहर
तुझ्या अंतरी खुलतो
आभाळाच्या कुशीत अलगद
चांदण बहर फुलतो

मी लिहितो महाकाव्य
मी गाथा नित्य रचतो
व्याकुळतेचा पट अनावर
मनात तुझ्या साचतो....

(प्रताप)
"रचनापर्व"
24/3/2019























Friday, March 22, 2019

आठव गीत .......

चंद्रचणीचे शब्द जडती
अवकाशाचे कोने
दवबिंदुंच्या हृदयाचे
ओले होते गाणे

ढग वितळती सुर बनूनी
बासरी भरून येते
पायरवाची हाक अनवाणी
माळ फिरून येते

हुरहुरीच्या सांयकाळी
मी पेटवून देतो शब्द
चंद्र बावरी रात भोगते
पुनव प्रकाशी प्रारब्ध!

मी आस भरल्या चांदण्यात
रेखाटतो भाव नक्षी
आकाशाच्या कुशीत झेपावे
एकला चकोर पक्षी

एक एकली वाट मुक्याने
माळरानी दुर जाते
चंद्राच्या आत्म्यातुन मीरा
कृष्णविरहीणी गाते...

निशीगंधाचे सांजसडे
गंधित होते हवा
मनात माझ्या दाटून येई
कृष्णसखीचा थवा...

मी "सिद्धार्थी" पावलांनी
दिशा तुडवत जातो.
यशोधरेचा मुक हुंदका
कंठात अडवत राहतो......

(प्रताप)
"रचनापर्व"
23/3/2019




























Thursday, March 21, 2019

...तारा....!!!!

"तुटणा-या ता-यास " पाहून
अनंत ईच्छा जागतात
"तो तुटला कोणापासून?"
विसरून मागणे मागतात...

भरल्या पुनव आभाळी
तो तुटतो, भरकटतो ,एकला शांत
का नाही जाणवत कोणास
त्याच्या समर्पणाचा आकांत..??

तो निखळून जातो स्वतः
पुनव खुलण्यासाठी
सैल होतात अनाहूत
बांधल्या मर्मगाठी

मी रूदन त्याचे शोषून
त्याला शब्दात पेरून घेतो
राखेतून त्याच्या बहूधा
माझ्या शब्दांचा जन्म होतो

चांदणे विझून जाताना पहाटे
सुर्य जागवत असतो
काल तुटला तारा" तो"
जणू नव्याने ऊगवत असतो...!!

तो बांधतो पदरी पुन्हा
एक सुर्यमुखीचे फुल
रातसांजवा येवून
त्याला देवून जातो भुल.

तो तुटतो, तो जुडतो
पुर्ण करतो प्रत्येकाची ईच्छा
तो उगवत राहो नित्य
माझ्या शब्दांची सदिच्छा!!!

(प्रताप)
"रचनापर्व"
22/3/2019





Wednesday, March 20, 2019

तुझ्या समवेत तुझाच माग.....!!

दोन जिवांची एक दिशा
अबोल, अनंत, अवकाश.....
सांज ऊगवती घडी अनावर
रवी झरतो सावकाश......

झाडाच्या हिरवाईस
व्यापतो सावळा रंग
अनंत बनून राधा
होई त्यात दंग...


प्रकाश शोषती पंख
तमात तगण्या राती
मिलन काहुरी गीत पक्षी
सांज प्रहरी गाती


सोनसावळा प्रकाश उजळे
काळ्या सावलीचा भाग
तुलाच समवेत आभासून
मी शोधतो तुझाच माग....

(प्रताप)
"रचनापर्व"
20/3/2019

Tuesday, March 19, 2019

चैत्रप्रहर.....

पर्ण समीधा देवून
शिशीर देई चैत्र फुल
वसंतांची हिरवळ भासे
कोवळी हिरवी भुल

मी पानगळीचे रुदन
दिगंतात टिपतो ओले
कृष्णधुनीचे स्वर लपेटून
फांदी हिरवळीस बोले

बहराचे इंद्रधनू ऊमटे
आसमंत भासे हिरवा
वैशाखाच्या ऊन्हात
तुझ्या आठवांचा गारवा

'शाल्मली' बहरते
फुलांचे दिर्घ निश्वास
गंध भरल्या अवकाशात
तुझ्या तनुगंधाचा आभास

तुझ्या चेह-याची छटा
माझ्या अंतरी बहर
हिरवळीचे गीत वसंती
बहरतो चैत्र प्रहर....

(प्रताप)
19/3/2019
"रचनापर्व"
http://prataprachana.blogspot.com















Sunday, March 17, 2019

पळस ...ग्रेसांच्या सावलीत...

पळस पेटला रानी
निळ्या आभाळाला झळा
वैशाखाच्या विरहात येती
सावलीला कळा

रंग निळ्या आभाळात
ऊष्ण केशरी लकाकी
पहाडाच्या माथ्याला
येते काजळी चकाकी

तुझ्या चिमण्यांचे थवे
माझ्या फांदिवर आले
ऊभ्या पळसाचे माझ्या
बहर सार्थ झाले...

दुर एकलाच राघु
मारी अवकाशाला फेरी
कोकीळेच्या गिताला
साज येई काहूरी.....

17/3/2019
(प्रताप)
"रचनापर्व"
http://prataprachana.bolgspot.com



Friday, March 15, 2019

चांदणे होते मुक्त....

काजळीढगांची छाया
रातकाल हा सजला
हुरहुरीचा चंद्र अचानक
चांदण फुलांत भिजला

चंद्र सांडला रानी
रान दवात झाले ओले
माळरानाचे गीत मुक्याने
गुज मनीचे बोले.

चकोर ऊडाला आकाशी
भेदून तमाचे रिंगण
रातराणीचे सडे अनावर
भरून जाते अंगण..

चंद्र सुगंधी होई
पहाट फुलून येते
स्वप्नांच्या गर्त कुशितुन
हाक कुणाची येते?

मी निद्रिस्त जागा होवून
चंद्राचे गातो सुक्त
चंद्रचकोराचे विव्हलमन
चांदणे होते मुक्त......

(प्रताप)
"रचनापर्व"
16/3/2019
http://prataprachana.blogspot.com





Wednesday, March 13, 2019

वळीवाचा पाऊस.....


वळीवाचा पाऊस
माती पुलकीत होई
थेंबओल्या फुलांची
मोहरते ऊमलघाई

गंधित गारवा ओला
ऊब पंंखात दाटून येते
ढगाआडून चांदणे
पुनवेचे गित गाते

थेंब अलगद पडतो
वेलीस शहारे येती
पाखरांचे विसावले थवे
गित हिरवे गाती..

वसंत चाहूल लागते
पानगळ हळुच सरते
बहर दाटले पाणी
मातीतून अबोल झरते

अवचित पाऊस असा
चिंब करून जातो
दूरवर कोसळून तो
मनात भरून जातो.

(प्रताप)
(रचनापर्व)
13/3/19









Tuesday, March 12, 2019

शब्दापल्याड....

अनामिक नात्याचे बंध
दुरवरून हाक ओली
हरीणीच्या डोळ्यातील आर्तता
दिशात झरून आली....

भेटल्या ना वाटा कधी
तरी प्रवास चाले
अव्यक्त भावविश्व सारे
गुज मनीचे खोले.

पुर्णचंद्र तु पुनवेचा
विश्वावर झरणारा
तु रानफुलाचा गंध
अवकाशी भरणारा..

तु पोकळी अनंत
रिक्तता भरणारी..
तु वेणूबासरी सुबक
राधेत हरणारी

शब्द धावती लगबग
मुकसंवादाचे पर्व
तु नाहीस कोणी बहुधा
तरीही तु व्यापते सर्व

अव्यक्त व्यक्तता तु
तु मैत्रीचा धागा
रमतो जिव जिथे
तु अशी ती जागा.

तुझे विश्वासाने चालणे
जशी सागराची खोली
ऊथळ तु पाणवठा
ज्याची गर्त खोली.

तु नात्यांची मर्यादा
तु अमर्याद नाते.
शब्दांच्याही पल्याड
ते भावार्थ नेते..

आसक्तीसम तु जरी
तुझी आस नाही
तुला विसरून जावे...
तु तसा भास नाही.

(प्रताप)
12/3/2019

"रचनापर्व"
(Search me on http://prataprachana.blogspot.com )

















Saturday, March 9, 2019

सांजवातीचा दिवा......

सुर्य झोपण्या वेळी
आकाश होई जागे
रातीच्या स्पर्शाचे
चंद्र चांदणे धागे

आभाळ पेटताना
रवी क्लांत शांत होतो
घरट्याच्या ओढीने
जिव आकांत होतो

हुरहुर पेरण्या सारी
सांज अलगद येते
रातीचे हळवे मन
हळूच भरून जाते

स्वर्णप्रकाशी वेळी
झाड काजळी होते
एक चांदणी ऊगवून
त्याला प्रकाशुन जाते...

मी सांजवातीचा दिवा
अलगद पेटवून देतो
अवकाशातील सारे चांदणे
सुबक नटवून जातो...

(प्रताप)
10/3/2019
( search me on
Prataprachana.blogspot.com)
Rachana parv 

Friday, March 8, 2019

अस्तित्व गोंदणे...

मी इंद्रधनुचे वितळून रंग
गीत लिहावे रंगीत
श्वास बाव-या रानातुन मग
वाहते तुझे संगीत...

चंद्र हाताला घेवून
मी तुडवत जाई रान
रानफुले ऊत्सुकतेने
विसरून जाती भान

गंध पेरती रात्र
रान सोनपिवळे होते
रातराणीची कळी बावरी
गीत काहूरी गाते

मी टिपून घ्यावे
अलगद पुनवेचे चांदणे
उमटून घ्यावे आयुष्यावर
तुझे अस्तित्व गोंदणे...

(प्रताप)
9/3/19



Wednesday, March 6, 2019

आठवणींचे धुके.....

तुझ्या धुक्याचा वेढा
हरवलेले मन
बहरून येते अवकाशी
आठवणींचे बन


मी दिशाहीन शोधे
तुझ्या अस्तित्वाची दिशा
धुक्याळल्या आसक्तीने
मोहरून येते निशा...

परतणारी पाखरे
माझ्याशी हितगुज करती
आठवणींच्या सांज धुक्यात
आर्त पुका-यास भरती


कापसी धुके हे हळवे
वात होवूनी जळते
ओथंबलेले अवकाश सारे
थेंब होवून गळते...
(प्रताप)
5/3/19

Monday, March 4, 2019

नभ पेटल्या तमगर्भातुन...

 नभ पेटल्या तमगर्भातुन
प्रकाशफुलांचे ऊमलून येणे
आकाशाच्या खोल मनावर
पेरत जावे मिलन गाणे...


कळ्या उगवत्या सायंकाळी
चांदण्याचे व्हावे...फुल
विहरणा-या चकोरास मग
पडून जावी हुरहुर भुल...

शांत एकल्या माळरानी
मिलन घडी जुळुन यावी
रान पेटल्या चांदण्याने
काळी रात्र ऊजळून जावी...

(प्रताप)
4/3/2019





Sunday, March 3, 2019

पहाट किरण....!!


पहाट किरण..!!

शिशीर.....!!! पानझडीचा ऋतु..पानगळ सजवतो..आणि पानगळीचा हा मुका उत्सव... झाडे रित्याने साजरे करतात....अवचित एक अनामिक पालवी बहरून येते ...अलगद विसावते मनी... आणि प्रितीचेवसंत कोकीळगाणे बनुन आकाशाच्या कवेत विरून जातात....आकाश ऊजळते आणी अंधाराला देते दान.... चांदणे पेरून...मी शब्दांचे ताटवे फुलवताना एक अनामिक गंध भारतो अलवार आणि ...दिशा धुंदावतात... मध्यरात्रीच्या अनंतातुन मन चालायला लागते तुझ्या दिशेने... तुझ्या अंतरआत्म्याचा धुंडाळा घेत...आणी कस्तुरीमृग पाहून स्वतःस समजावते... माझ्यात खोलवर आहेस तू रूजलेली....पण तरीही...तृष्णामय होवून नजरेचा आस... चांदणे पेरत...अवकाशाचा कानोसा घेत...फिरत राहतो...चकोर पंखातुन....

         चंद्राची दिवेलागणी...अनंत ऊजळताना...माझ्या आतील तुला भरते आणतो...आणि आठवांच्या लाटा ऊधाणुन टाकतात...माझ्या आतील संयत समुद्र...मी लाटा बनून वाहतो..तुझ्या किना-यावर येवून ठिक-या होतो...पुन्हा पुन्हा येतो...किनारे व्यापण्या....आणि तुषारांचे थवे.... कधी कविता... कधी ललित बनून कागदावर ओघळतात...मी ओल्या शब्दांची ही पुष्परास ..तुला अर्पण करतो...आणि माझ्या भावनांचे निर्माल्य जतन करून ठेवतो....

                  तुझे भास आभाळ पेटवतात...मी शब्द समिधा वाहतो...अर्पण करण्यासाठी .....मी मला शोधत राहतो युगांताच्या टप्प्यावर...तिथे एक मुरलीधुन जोजवत असते पालवीला....आणि त्या मुरलीच्या सुरावर... पानझड अलगद विरत असते पालवीत....ही पानझड आणी पालवी...परस्परात विलीन होवून.... राधेची आस पेरत असतात मनात...आणि मी त्यांचे एकात्मरूप पाहून.... या पानझडीच्या उत्सवाला एकांतात साजरा करतो....निःशब्द असणारे एक व्याकूळ महाकाव्य लिहून...कारण ...मनिचा ठाव घेणारे शब्द अजून जन्माला यायचेत.......


          मी चंद्राखाली..... जग उजळणे ...बंद डोळ्याने पाहतो....आणि मिटल्या अंधारात..?....... तुझा चांदण आभास.... अवकाशापल्याड पोहोचलेला पाहून ...निघतो परत...कारण रातराणीचा पडला सडा तुडवत..... तु येशील पहाट किरण बनून..... खिडकीत माझ्या..... हा विश्वास दरवळत असतो!!
(प्रताप)

4/3/19

Saturday, March 2, 2019

पुनवेचे मन....
.....
...
..
.




सांजझावळ्या फांद्या
चंद्रस्पर्शी पाने
रातव्याच्या गर्भात
चकोराचे गाणे..


पान झडल्या शब्दांचे ऋतू
तुझी पालवी मोहरे
ढगांच्या आरशात तुझ्या
पुनवेचे चेहरे..

मी प्रकाशधुंद चंद्र
लपेटून चाले
काळ्या रातीचे अंग
सोनपिवळे झाले.

तुझा गंध त्याला
रात बावरी होते...
पुनवेचे मन असे
विरह काहूरी होते.

मी चंद्र कुशीला घेतो
रान ऊधाणुन जाते
ओघळणारे फुल मुके
मुक्यामुक्याने गाते...

(प्रताप)
1/3/19


Thursday, February 28, 2019

पुनवेचे गीत..


पुनवेचे प्रतिबिंब
चंद्र सांडलेला
ओला पसारा सोनेरी
जळात मांडलेला...

गोकुळ धुन अशी
मुकी बिचारी वाहते
डोहाच्या तळातुन
राधा उजळून जाते..

निलकांती डोह स्थिर
चांदवा झरतो
पुनव जाते सरून
डोह एकला ऊरतो....

पहाट वाती विझवूनी
अलगद निघून जाते
डोहाच्या तळातुन राधा
पुनव गीत गाते.....

( प्रताप)








Sunday, February 24, 2019

बदली....एक अपरिहार्य अनासक्ति!!!

बदली....एक अपरिहार्य अनासक्ति!!!


प्रशासकीय सेवा....
बदली तिचा अपरिहार्य....भाग...
पण
पुर्वी अचानक वाट्याला आलेले एक क्षेत्र....
जेथे एक दीर्घ कालखंड सतत वेळ,घाम, व अहोरात्र सेवा देवून,
वेळ प्रसंगी स्वतःच्या घरचे सर्व कर्तव्य दुय्यम माणून,
कुठलेही पुर्वसंबंध नसणा-या जनतेशी व मातीशी स्वतःला जोडून...त्यांचे सुखदुःख स्वकुटुंबापेक्षाही प्राथम्याने मानून,
वेळ प्रसंगी सायंकाळी 4.00 वाजता करत असलेल्या सकाळच्या जेवणाचा पहिला घास बाजुला सारत आलेल्या कागदावर सही करून, प्रसंगी जेवणाचा डबा बहुतांश वेळा न उघडताच घरी परत नेवून...
भिरभिरत्या डोळ्यांनी व घाबरत्या पावलांनी कार्यालयात आलेल्यांना समोर बसवून...
कितीही गडबड असली...मिटींगला जायला उशिर होवून तिथे बोलणे ऐकायला मिळेल हे माहित असूनही त्याला शांतपणे ऐकून घेवून , व त्याला आश्वस्त करून...
कामाचे अनंत ढिगारे सदैव ऊपसताना...घरून आलेले फोन सदैव कापत वरिष्ठांचा व तालुक्यातील प्रत्येकाचा फोन घेवून....आणी घरी गेल्यास आपण कुटुंबासाठी काहीच वेळ देत नाही यावर क्षणीक चरफडून....घरी अपेक्षेने वाट पाहणा-या घरातील सदस्यांच्या विझल्या अपेक्षा गोंजारण्याचा अयशस्वी प्रयत्न करून...
अनेक पार्श्वभूमीतुन व संस्कारातुन आलेल्या कर्मचारी यांना सोबत घेवून..
स्वतःच्या कार्यशैलीत त्यांना बसवून....
गावाकडून आईवडीलांचा आलाच कधी फोन तर अर्ध्या तासात करतो म्हणून दिवसभर तर कधी दोन दोन दिवस तो करायला फुरसत न मिळून...
आपल्या हातून झालेच कधी कोणाचे काम तर त्यांच्या चेह-यावरील समाधानातच आपले समाधान मानून...
आणी क्षुल्लक कारणावरूनही नाराज होणा-याची मर्जी सांभाळून...
एक निरंतर कार्ययज्ञ मांडला जातो...अनेक वैयक्तिक समिधांची त्यात होळी होते..
वैचारीक द्वंद्व येते, कार्यात्मक संघर्ष होतो...काही चांगल्या तर काही वाईट लोकांशी संपर्क येतो...कधी कौतुक कधी टीका झेलावी लागते..तर कधी गाॅसिपींग.....
कार्यभाग नाही साधला कोणाचा तर त्यांनी या पुर्वी त्यांची अनेक कामे झाली आहेत हे सोयीस्करपणे विसरून केलेली टीका,आरोप आणी तक्रारींना तोंड द्यावे लागते..
कधी जुळते....तर कधी विस्कटते घडी...पुन्हापुन्हा ती सांधत...चालता चालता...एक घट्ट नाळ व नाते जुळून जाते त्या क्षेत्रातील मातीशी व जनतेशी....
काही जिवाभावाचे लोक भेटतात...तर काही जिव खाणारे....काही जण -हदयात स्थान देतात..तर काही तटस्थता...
जिव रमत जातो आणी रूळत जातो...नियोजन व्हायला लागते...आज, आत्ता,ताबडतोब...लगेच अशा जीवघेण्या अपेक्षांची पुर्ती करत...स्वतःच्या संस्कारांने, तळमळीने वेगवेगळी कामे काढली जातात...दिवस झपाट्याने सरतात,
कार्यालयीन कामकाजाचा वेळ आपोआप वाढत जातो..तो प्रसंगानुरूप मध्यरात्रीपर्यंत वाढतो...आणी झोपण्या अगोदर ऊद्याचे नियोजन झोप ऊडवायला लागते...काही कामे दृष्टीक्षेपात यायला लागतात...हळूहळू समजायला लागते....आणी अचानक...बदली येते...सगळं विस्कटते..अनेक धारणा,अनेक नियोजन बाधित होतात....गेले काही दिवस जेथे आपण नित्य काम केले...तेथे अचानक आपण अतिरीक्त ठरतो.....
असेच अचानक येवून पुर्वी लावलेले सामान...ऊचलताना...हुरहुर वाटायला लागते...शिल्लक राहिलेली कामे व ते घेवून आलेले लोक डोळ्यासमोर येतात...रोज सोबत काम करताना ज्यांच्याशी स्नेह निर्माण झाला तो अडखळायला भाग पाडतो.... ....कोणाचे पाणावले डोळे तर कोणाच्या सुटकेचे निश्वास सगळे सोबतच....

घर, माणसे,गावे,शहरे मागे पडत जातात...कोण कुठले आपण स्वतःच्या जगाशी अपरीचित होत...त्याच्यापासून तुटत...नविन ओळख निर्माण करण्यासाठी निघतो.....

पुन्हा एवढे कधी गुंतायचे नाही असे खोटे खोटे ठरवत जडावलेले पावले निघतात.....पुढील प्रवासाला.....आणी निम्म्या रात्री आपले आप्त सोडून सत्याच्या शोधात निघालेल्या बुध्दाच्या मनातील व कैकयीच्या हट्टासाठी वनवासाला निघालेल्या रामासोबत निघालेल्या लक्षमणाची होणारी घालमेल घेरून टाकते पुढील ठिकाणी सामान लावेपर्यंत.....आणी आपल्या आतील माणूसपणावर मात करत आपण ऐकत राहतो एक आवाज...."अनासक्त हो!!!!

( माझा प्रशासन नामा.........)
प्रताप वाघमारे.
तहसीलदार.
9422642842




Thursday, November 8, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 13 :बिन पावसाचा भरकटणारा ढग !!

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 13 :बिन पावसाचा भरकटणारा ढग !!



          आपण ध्येय ठरवतो, एकांताच्या अनंत पोकळीत व परिस्थितीच्या रेट्यात ते प्राप्त झाल्याचे स्वप्नही पाहतो, आणी मनोराज्य करून काही क्षणच ते स्वप्न जगतो, आणी नंतर विसरून जातो. परिस्थिती शरण होवून चालत राहतो, एवढ्या अल्प काळासाठी त्यांना जवळ करून जर आपल्याच स्व्प्नांना आपण पोरके केले तर ते जगतील कसे? त्यांना जोजवावे लागते, त्याचे लालनपोषण करावे लागते, त्यांना अस्तित्वात आणण्यासाठी त्यांचे पालकत्व घ्यावे लागते. संकटाच्या काळात त्यांना पाठीशी घेवून झुंज द्यावी लागते, करावे लागते युध्द पराभव अंताचे . भळभळणा-या जखमांना येथे स्वतःच दुरूस्त करून घ्यावे लागते, अन्यथा अपयशाच्या अरण्यात अश्वत्थाम्यासम अनाथ रुदन नशिबी येते. त्रास होतो स्वप्न अस्तित्वात येताना पण त्यांच्या पुर्तिचा आनंद शब्दात मांडता येत नाही.ती अनुभूतीच एवढी श्रेष्ठ आहे की सगळे दुःख, वेदना,यातना यांची क्षणात फुले होतात.पण ती फुले येण्यासाठी काटे जोजवावे लागतात अगोदर....

माझे बि ए तृतीय वर्ष सुरू झाले. मी काॅलेजला जाऊ लागलो. पण आता काॅलेज मधे मन लागेल असे काही ऊरले नव्हते. एकतर ते खुप दुर होते...आणी ते जास्तच दुर वाटेल अशा घटनांनी मला वेढले होते. पण तेथे उपस्थिती अनिवार्य असल्याने नाईलाजाने जावे लागत होते. सकाळी लवकर काॅलेज असल्याने काहीच न खातापिता काॅलेजला जाणे नित्याचे झाले. धावत पळत येवून, मोठ्या भावाने केलेला किंवा केला नसेल तर तो मिळून करून कसेबसे खाऊन धावत पळत अरूण भैय्याच्या रूमवर जात होतो. त्यांचा चाललेला अभ्यास पाहून मला ऊगीचच फुरफुरल्या सारखं व्हायचे. पण माझी लिंबूटिंबू सारखी अवस्था होती. माझी धावपळ पाहून माझा वर्गमित्र सचिन आडाणे(राष्ट्रीय ख्यातीचा बास्केटबॉल खेळाडू, सध्याच्या क्रिडा शिक्षक) याने त्याची जुनी एक सायकल वापरायला दिली. ती मी काही दिवस वापरली. थोडी वेळेची बचत होत होती. दिवस झपाट्याने चालले होते. तांदळे सर , अरूण पोतदार व प्रविण शेळके तेथे खुप अभ्यास करायचे. पण अत्यंत गांभीर्याने तो करताना तांदळेसर दिसायचे. ते गेलेल्या पुर्वीच्या अॅटेम्प्ट बद्दल फार कळवळून सांगायचे त्यांची तळमळ जास्त बेचैन करायची, वाटायचे किती अपार दुःख होते निकाल गेल्यावर..!! स्पर्धा परीक्षेचे तिन टप्पे, तुम्ही कुठल्याही टप्प्यावर नापास झाले की, पुन्हा पहिल्या पासून सुरूवात..सापशिडीचा खेळ नुसता..संपेल आत्ता हा टप्पा म्हणून थोडेही गाफील राहिले की अपयशाचा साप तोंड वासून ऊभाच असतो म्हणजे तुम्ही नव्याण्णव वरून थेट एकवर...!! त्या सर्व सिनियर मुळे "सदैव सज्जता" हे स्पर्धा परीक्षेचे ब्रीद मनात ठसले. अरूण पोतदार यांच्यामुळे संदर्भ साहित्याची माहिती मिळू लागली. पण हवे ते गांभीर्य अजून यायचे होते मला...

          आता हळूहळू गावाचा विसर पडत होता. तिकडे येणे जाणे ही कमी झाले होते. आईवडिल एकीकडे आम्ही एकीकडे असे झाले होते. त्यांची काय अवस्था होत असेल हा विचार येवून व आपण आज पर्यंत काहीच का नाही केले यावरून नुसता त्रागा व्हायचा, स्वतःलाच रागे भरून घ्यायचो, पण माझ्यातील मीच मला नाईलाजाने समजवायचो...डिग्री तर पुर्ण होऊ दे.... कारण स्वप्न माझे होते..त्याच्या वेदना मला सहन करायच्याच होत्या...हे असे ओझे होते की त्याचा भार मी माझ्या शिवाय कोणालाच देवू शकत नव्हतो. लहान भाऊही आता, त्याच काॅलेज मधे शिकत होता. वादविवाद स्पर्धेत महाराष्ट्रात महाविद्यालयाचे नाव वाढवत होता. त्याचा अभिमान वाटायचा, कारण दहावी पर्यंत तो बाजुच्या गावात शिकला होता. चालत जात असल्याने, त्याला एक जुनी सायकल घरच्यांनी घेतली होती, त्या वेळी इतर मुलभुत बाबीही मिळायची मारामार...आम्ही सारेच या शिक्षणामुळे खुप काही भोगत होतो.... गेल्या वर्षी काॅलेज मधे आम्हाला नविन दोन सर शिकवायला आले होते. दोघेही प्रचंड हुशार !! दहिफळे सर राज्यशास्त्र,तर बैनाडे सर लोकप्रशासन शिकवायचे.यांच्यापैकी बैनाडे सर औरंगाबाद वरून आले होते.त्यांना MPSC चे बैकग्राउंड होते. वर्गात ते MPSC चा संदर्भ देवून शिकवायचे, त्यामुळे MPSC ची धुगधुगी माझ्या मनात सतत मेंटेन होत होती. पण आता वर्गात ती दिसणार नाही असाच मी वागत होतो. पण चुकून एकदा माझ्या तोंडून ऊत्तर देताना जास्तीची माहिती निघालीच!! सरांनी तात्काळ मला क्राॅस केले, "बाकी जास्तीचे काही सांगु नको , मला माहित आहे" म्हटले...वर्गात खसखस पिकली. मी खाली मान घालून बसलो. अपमान जिव्हारी लागला. बैनाडे सरांनाही ते ठळकपणे जाणवले...त्यांना वाईट वाटले. त्यांनी ते ज्या हाॅस्टेलवर राहत होते तेथे भेटायला सांगितले, मी गेलो..सरांना भेटलो..अत्यंत अनौपचारिक पध्दतीने त्यांनी माझा उत्साह वाढवला..स्पर्धा परिक्षा हे करिअर हातातुन सुटत जाताना त्या कॅन्डिडेटला काय वाटते याचा प्रत्यय तेथे आला...त्यावरून क्षणीक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण दिर्घ दुःखी व्हायचे नाही असे मी ठरवले....मी एमपीएससी करण्यासाठी अजुन दृढ होत चाललो होतो...

                परिक्षा जवळ येत चालली होती. अभ्यास टिपेला पोहचला होता. सगळे सिनियर जिव तोडून अभ्यास करत होते. मला अभ्यासाचे गांभीर्य कळू लागले. परिक्षेचा दिवस उगवला.मी थर्ड इअर पुर्ण नसतानाही अनुभव म्हणून फाॅर्म भरला होता. प्रत्येकजण आपापल्या सेंटर वर गेले. तांबे सरांच्या क्लासवरील सिनीयर्स पण तेथे भेटले. सर्वजण गंभीर होते. सेंटर वर ज्यांना MPSC चा गंधही नव्हता ते जास्त काॅन्फिडन्स मधे दिसत होते.तर जे सिरीयस कॅन्डिडेट होते ते गंभीर!! वर्गात गेलो. पेपर पाहीला. त्यातील बहुतांश प्रश्न ओळखीचे वाटत होते. पण भरपूर प्रश्न असेही होते जे अभ्यासातील उणीव दाखवून देत होते. पेपर सोडवला. धावत पळत अरूण भैय्याच्या रूम वर आलो. आल्यावर पाहिले, सिनीयर्स उत्तरे शोधत होते.(तो काळच असा होता, त्यावेळी ना वेबसाईट, ना मोबाईल, ना यु ट्यूब, ना व्हाट्सअॅप,ना टेलिग्राम चॅनेल. जाहिरात पेपर मधे यायची, हाताने फार्म भरून पोस्टात टाकायचा, पोस्टाने हाॅलटिकीट येणार, पुर्वपरीक्षेचा निकाल कलेक्टर ऑफिसला फॅक्स रूपात यायचा. त्यामुळे आन्सर की पण स्वतःच शोधावी लागायची. जेवढे सापडले उत्तरे तेवढाच पेपर तपासून व्हायचा. मग न सापडलेल्या उत्तरासाठी आगामी "स्पर्धा परीक्षा " या मासिकाच्या अंकाची वाट पहायची नाहीतर पुणे, औरंगाबाद येथील क्लास किंवा कृषी विद्यापिठातील आन्सर की मिळवण्याची धडपड करायची. ती मिळाली की आन्सर की नुसार बरोबर आलेल्या उत्तरांची संख्या कमी जास्त व्हायची.निकाल लागेपर्यंत जिव टांगणीला रहायचा. तो कधी लागेल हे पण माहिती नसायचं) त्यावेळी 200 मार्क्स चा एकच पेपर राज्यसेवा पुर्व परिक्षेसाठी असायचा, व 170 च्या मागे पुढे कटऑफ असायचा. सगळ्याची उत्तरे तपासून झाली. सगळ्यात कमी माझे बिट होते. 132 फक्त!! मला निकाल नाही येणार या बद्दल वाईट वाटत होते.(तसा येऊन तरी मी थोडाच मुख्य परिक्षा देवू शकत होतो) पण माझ्या अभ्यासाची पातळी उंचावली आहे याचे आत्मभान मला त्यामुळे आले, मला अजून किती अभ्यास करायचा आहे याचा अंदाज आला.आणी आपण या परीक्षेला सामोरे जाऊ शकतो हे समजले.. लातूर मधे साधारणतः मुख्य परिक्षे साठी कुठलीच मुले थांबत नसत, ते सरळ पुणे किंवा औरंगाबादला जायचे . तांदळेसर व मी वगळता प्रत्येकाला लातूर सोडायला संधी होती. मी अधून मधून तांबे सरांच्या क्लास कडे पण जाऊन येत होतो. तेथे काय सुरू आहे हे ही पाहत होतो.सगळेजण अभ्यासासाठी परेशान असायचे....कोंडी मात्र फुटत नव्हती.जणू काळाचा गुंता झाला होता.पुर्वपरिक्षे नंतर अरूण भैय्या लातूर मधे थांबले नाहीत...तांदळेसर राहिले फक्त...सुगीचे दिवस सरल्यास पाखरांचे थवे निघून जातात आणी रानात एखादे बाभळीचे झाड एकटेच ऊभे रहावे अशी अवस्था झाली होती...माझी...

               रूमवर थांबत होतो. तेथे प्रदिप इके (सध्या महाराष्ट्र अकॅडमी चा संचालक, पुण्यातील सध्याचा नामांकित एमपीएससी मार्गदर्शक )हा रहायला आला. तो ही एकदम खेड्यातून आलेला होता. त्याच्या मागोमाग लहू भोसले व त्याचा चुलत भाऊ भुजंग भोसले हे ही रहायला आले. हे ज्युनिअर मुले पण स्वप्नाचं गाठोडं घेवून शहराकडे अपेक्षेने निघणा-या रांगेतील सहप्रवाशी...आम्ही सगळे एकमेकांशी जुळवून रहायचो..गावाकडील खबरबात कधीतरी मिळायची..सणासुदीला कोणाकडून तरी डबा यायचा..आलेच कधी घरून कोणी तर घरचं जेवण...कधिकधी हे सोबती त्यांच्या गावाकडे जावून यायचे..मी मात्र तेथेच पाण्याने वेढलेल्या बेटा सारखा..अनंत प्रवाह झेलत...!! आई बिचारी गावाकडे कुढायची..वडील झगडत रहायचे..आम्ही सगळेच परिस्थितीशी दोन हात करत होतो जेथे आहोत तेथे राहून! मी तिकडे अभ्यासासाठी मरमर फिरायचो.. तर गावात इकडे काही अर्धवट रावांनी पोरं बिघडले आहेत बि ए साठी कधी रूम करावी लागते का? मुलं आईबापाला मूर्खात काढत आहेत अशी बदनामी (की किर्ती) चालवली....वडील कधि बोलायचे नाहीत पण येवून अंदाज घ्यायचे आमचा....आणी चार सुज्ञपणाच्या गोष्टी सांगून अभ्यास करत रहा म्हणून आम्हाला सांगायचे... सहा सहा महिन्याचे रूमचे भाडे थकल्याने जिव मेटाकुटीस यायचा.

             परिक्षा झाली होती, गांभीर्याने अभ्यास करणारा ग्रुप जागेवर नव्हता. मी काॅलेजला जात होतो. पण मन सदैव बेचैन असायचे. काही नविन मित्र झाले. त्यापैकी एक म्हणजे दिपक बाभळसुरे. त्याचे इंटरनेट कॅफे काॅलेजच्या रोडवर होते व घर माझ्या रूम च्या रस्त्यावर. त्याची गजा मुळे ओळख झाली. मग ऊगीचच मी कॅफेवर जाऊन बसू लागलो. तो ही येता जाता रूमसमोर येवून आवाज द्यायचा. मी जात रहायचो.. रिती अवस्था नुसती..

          बि ए तृतीय वर्षाची परिक्षा जवळ आली..पुन्हा गजा रूमवर यायला सुरूवात झाली. मग तेच..नोट्स, झेराॅक्स, परिक्षा...इत्यादी.. मी अभ्यास करून परिक्षा दिली..आणी दुस-याच दिवसा पासून एमपीएससीच्या अभ्यासासाठी तगमग सुरू झाली...तांबे सरांनी आता व्यावसायिक स्तरावर क्लास सुरू केले होते...पण मी तेथे जाऊन काय करणार होतो...मी रूम च्या आसपास राहू लागलो..तिकडे तांबे सरांच्या क्लास मधे धनवंतकुमार माळी सर (पुर्विचे शिक्षक, अत्यंत जिद्दी स्पर्धक , दररोज नोकरी करून औसा या तालूक्याच्या ठिकाणी येवून मग नंतर क्लासला येणारे, तरीही क्लास मधे सर्वाधिक मार्क घेणारे, माझ्या अगोदर राज्यसेवेची परिक्षा दिलेले , पण माझ्या नंतरच्या अॅटेम्प्टला प्रथम नायब तहसीलदार व नंतर महाराष्ट्रात एमपीएससी च्या यादीत अव्वल क्रमांकाने पास होऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवड होऊन अभ्यास सातत्याने कसा करावा याचे व नोकरी करत करत अभ्यास कसा करावा याचे रोलमाॅडेल ठरलेले) ,लहान असुनही सचोटीने अभ्यास करून नंतर सिलेक्शनच्या यादीत आलेला अतुल कुलकर्णी ( एक उत्कृष्ट कवी, चांगला स्पर्धक व व्यक्ती, सध्या  कक्ष अधिकारी - मंत्रालय) यांची नावे समजली..इतर मुले ही अभ्यास करत होती. त्यात प्रकर्षाने माहिती झालेले नाव म्हणजे प्रकाश कुलकर्णी सर ( अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले, उत्कृष्ट गायक असणारे, अत्यंत सज्जन व्यक्ती ,माझे काॅलेजचे सिनियर , युपिएससी मधे धडपडणारे,नंतरच्या राज्यसेवेच्या अॅटेम्प्टला ऊपजिल्हाधिकारी संवर्गात सहज निवड होऊ शकेल इतपत उत्कृष्ट मार्क येवूनही निव्वळ त्या वर्षिच्या जाहिरातीत केवळ 78 एवढ्याच पोस्ट असल्याने त्या ऊपलब्ध पोस्ट पैकी उपअधिक्षक भुमि अभिलेख झालेले, मात्र नंतरच्या काळात सहा. आयुक्त (विक्रिकर) म्हणून निवड झालेले, एक अनुकरणीय व्यक्तीमत्व) यांची नावे कळायला सुरूवात झाली. ते चांगली तयारी करतात हे कानावर येवू लागले.लातूर मधे हळुहळु MPSC बाबत प्रयत्न सुरू झाले होते. माझी बि ए तृतीय वर्षाची परिक्षा संपल्याने मी रिकामा झालो होतो, लातूर मधेच थांबलो होतो.आणी जाण्यासारखं कोणतं ठिकाण तरी होतं मला? काही मुलंमुली आवश्यकते प्रमाणे पुण्याला क्रॅश कोर्स साठी जायचे. आणी परत येवून अभ्यास करायचे. पण माझ्या आर्थिक मर्यादा असल्याने मी कुठेच जाऊ शकत नव्हतो. माझी अवस्था चिखलात रूतलेल्या बैलगाडीसारखी झाली होती...जायचं आहे..धडपड ही सुरू आहे..पण जो जो निघावे.. तो तो रूतत जावे जास्त खोल अशी....

             त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी काय केले....???? जसा बिन पावसाचा ढग भर दुपारी आकाशात भरकटत असतो तसा भरकटत राहिलो...नाही म्हणायला तांदळेसरांना माझ्या परिस्थितीचा थोडा अंदाज आला होता. पण ते दररोज आपल्या नोकरीला जायचे..अरूण भैय्याही गेले निघून, तांबे सरांचे क्लास ही तेथुन निघुन गेले, ज्या काॅलेज मधे गेली पाच वर्ष शिकलो, आयुष्य घडवणा-या विविध घटना जगलो, ते काॅलेजही संपले...आता तिथेही बदल... रित्या क्षणांची दिर्घ मालिका..वेढलेल्या गर्दितही तळमळणारे एकाकीपण ......दिशाहीन प्रवास..जायची तळमळ खुप पण काहिच जुळून न येणारे...अवकाळी पाऊस तरी अचानक येतो, धांदल ऊडवतो पण तो येवून गेला की सुखद वाटते....तसं काही अवचित घडावं असं ही काही नाही..निरंतर तेच ते सुर्य उगवणे...मावळणे..रात्र होणे आणी उजाडणे.... मी मात्र आस घेवून त्या नवसुर्याची ..निःशब्द चालत होतो दिशाहीन कधी पावलांना टाकत तर कधी पावलांनी पुढे ओढल्याने...या सुट्ट्यात मी आत्मचिंतन केले, अनंत विचार केले...मनोराज्य केले..स्वप्न पाहीली, ते वास्तवात येत नाहीत म्हणून..त्यांना शिव्याही घातल्या..मुका मुका आकांत नुसता...काय करू काय नको नुसती तगमग नियती माझी सत्वपरीक्षा घेत होती जणू...आणी मी त्याच त्या अवस्थेला कंटाळलो असल्याने बदल माझी वाट पाहत दबा धरून बसला होता..तो योग्य वेळी माझ्यावर झडप घालणार होता ..आणी फरफटत नेणार होता मला....त्या क्षणा पर्यंत..ज्या क्षणाला मी टाचा रोवून थांबणार होतो, आणी बदलाला अंगावर झेलून त्यालाच भिडून, त्या बदलालाच बदलण्यासाठी निकराची झुंज देणार होतो...आणी त्यालाच फरफटत नेणार होतो स्वप्नपुर्तिच्या टप्प्यावर..युध्दाचे ढग जमु लागले होते... आणी येणारे दररोजचे सुर्य उजाडण्या अगोदरच शंखनाद करणार होते....आणी मीही लढायच्या आणी भिडायच्या टप्प्याकडे नकळत निघालो होतो....(क्रमशः)
(प्रताप)

Saturday, November 3, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 12 : दगडपण गळून पडताना.... !

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 12 : दगडपण गळून पडताना.... !!


           शाहू काॅलेजच्या क्लासेसला आम्ही सगळे जण बसत होतो. अनेक मुलंमुली नव्याने येत होते. काही काॅलेज बाहेरच्या मुलांना पण प्रवेश दिला गेला ...तेथे अत्यंत स्टायलीश पध्दतीने येणारे दोघे म्हणजे राजा आणी संदिप!! ( हे नंतरच्या काळात आयुष्य भराचे मित्र झाले, राजेंद्र ढाकणे(शालेय पोषण आहार अधिक्षक) ऊर्फ राजा...वयाने मोठा असुनही आम्हा सगळ्या लहानांना भावंडाप्रमाणे वागवणारा अत्यंत मॅच्युअर व धाडसी असणारा पण तसा न दिसणारा!!, महाराष्ट्रातील नामांकित बुध्दीमापण चाचणी शिकवणारा, ट्रेकिंगवेडा, आणी सगळ्यात अगोदर संदिपचा जिगरी दोस्त व त्यानंतर सगळ्याचा दोस्त असणारा मित्रवेडा मित्र!! .....आणी दुसरा माझ्यासाठी एकदम खास!! एकदमच जिगरी म्हणजे संदिप जाधव ! ऊर्फ ...त्याला मर्यादाच नाही...!! सध्याचा (असिस्टंट डेस्क ऑफिसर) पण त्या काळातील माझा सच्चा साथी..दिलदार मित्र आणी माझ्या पडत्या काळात मला सर्वस्तरीय व यथाशक्ती मदत करणारा, सणासुदीला मी सण सोडून उपाशी बसलो आहे हे माहित असल्याने घरून गुपचुप डबा आणनारा व तो खास कारणाने आणला आहे हे कळू न देण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा, दुःखाच्या प्रसंगी हक्काने बोलवणारा आणी दुस-याच्या दुःखात न सांगता येऊन आधार देणारा, यामाह वेडा, रायडर, अत्यंत मॅच्युअर व धाडसी दिसणारा पण मुळात तसा नसणारा!!! , स्पर्धापरिक्षा क्षेत्रात खुप काही पाहिलेला.. आणी आजही जसा होता तसाच संपर्कात असणारा अत्यंत हळवा, संवेदनशील असा मोठा भाऊच जणू !!) ते दोघंही अनुभवी स्पर्धक होते. ते आल्याने अजुन स्पर्धेत चुरस यायला लागली, मी मात्र खिंड लढवत होतो...न घाबरता भिडत होतो..थोडं दुर्लक्ष झाले की फटके बसायचे अक्कल ठिकाणावर यायची..अभ्यासाची रंगत वाढली होती..अवघड अवघड विषय डोकं जड करत असायचे...तरीही प्रयत्न करत असायचो...निसर्गरम्य ठिकाणी जायची ओढ असावी, फुरसतही असावी , मुबलक पैसा असावा..आपण निघावं..आवडती गाडी असावी..भरधाव वेगानं आपण निघावं...आणी अचानक रस्त्यात ट्रॅफिक जाम लागावा..तस्सच झालं. काॅलेजच्या वार्षिक परिक्षा जवळ आल्याने काॅलेजचे क्लास बंद झाले..शेवटी कितीही झालं तरी हा क्लास म्हणजे काॅलेजसाठी एक उपक्रमच होता..! जो काही चार पाच महिन्याचा काळ मला शिकायला भेटले ते अनमोल होते पण अपूर्णता जाणवत होती. जिव था-यावर नव्हता. ऐकून होतो परभणीला कृषिविद्यापिठात खुप मुलं तयारी करतात पण तेथे मी जाऊ शकत नव्हतो. औरंगाबादला क्लास चालतात हे ही माहित होतं पण क्लासची फिस मी भरूच शकत नव्हतो. तशी ऐपतच नव्हती (आयुष्यात मी पहिल्यांदाच औरंगाबाद पाहिले तेही मुळात राज्यसेवा मुख्यपरिक्षा द्यायला गेल्यावर!!) कालय तस्समैय नमः!!!!माझी वेळ आलीच नव्हती, ती आणावीच लागेल हे मात्र मला जाणवत होते..मांडलेला सारा डाव तुटत जाणे हे स्पर्धा परीक्षेचे वैशिष्ट्य आहे. आणी जिद्दीने पुनः वारंवार ऊभे राहणे हे सच्च्या स्पर्धकाचे लक्षण..!!

                जगद्गुरु तुकोबा म्हणतात "आलिया भोगासी असावे सादर" मी गुमान काॅलेजचा अभ्यास सुरू केला.डिग्री असल्याशिवाय आपल्याला परिक्षा देता येणार नाही हे स्वतःला बजावून मी वाचत होतो. रात्री बसायचो, नोट्स काढायचो, दुस-या दिवशी त्या नोट्सच्या अनेक झेराॅक्स निघायच्या! रात्री अभ्यास करण्यासाठी गज्या यायचा, सोबत बसायचा,इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या,   मोठा भाऊ अर्थात भैय्या ही क्लासमेट असल्याने तोही सोबत अभ्यास करायचा. भविष्यात काय करायचे चर्चा व्हायची..माझ्या मनातील जखमेची खपली निघायची,मी मुकामुका होवून कुढत कुढत अभ्यास करायचो, मी आत्ममग्न होऊन माझी जखम भळभळताना अनुभवायचो, उदास उदास वाटत रहायचं. आपण कधी MPSC करू शकू का? कसं होणार आपलं? पुस्तके नाहीत, पैसे नाहीत, मार्गदर्शन नाही, लातूर सारख्या ठिकाणी दहा पंधराजण कसेबसे एकत्र येवून तुटपुंजा प्रयत्न करत होते तर तो ही तडीस जात नाही....अनंत प्रश्न घेरत असायचे...वडील यायचे, काहीतरी खायला आणायचे..गावाकडले हाल सांगायचे, प्रयत्न करत रहा म्हणायचे..खिशात एक रुपया नसायचा..कुठे जायचेच असेल तर चालत फिरावं लागायचं...कोणी मित्र आलाच तर त्याच्या गाडीवर जायचो...शेवटी डिग्री शिवाय पर्याय नाही..पाहू अगोदर ती तरी करून घेवू हा विचार करून मी अभ्यास करत रहायचो. काॅलेजच्या लाएब्रेरी मधून क्रमिक पुस्तके घ्यायचे कुठल्या मित्राने गाईड आणले तर ते मागुन वापरायचं असं करत करत मी परिक्षा दिली. सुट्ट्या लागल्या, पण गावाकडे जाता येत नव्हतं, कारण गेलो तर मिळालेली रूम जाइल ही भिती ! आणी सुट्टयात लातुरात रहायचे तर कसे टिकायचे? काय करायचे? रूमचे भाडे कसे द्यायचे ही त्याहूनही जास्त भिती!! इकडे आड तिकडे विहीर!!!सुट्टयात MPSC चा अभ्यास करायचा तर माझ्याकडे फक्त दोनच पुस्तके , एक म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचा संच आणी दुसरं के'सागर चं सामान्य अध्ययन ,आणी तुटपुंज्या काही विषयाच्या नोट्स. ना काॅलेज,ना क्लास, ना गावाकडे,ना मित्राच्या घरी , जायचे तर कोठे आणी कसे? का? दर सुट्ट्यात काम करून शिकायचं नशिबी..वाटायचं या सुट्ट्यात कुठंतरी काम करावं..पण काही सुचत नव्हतं...सगळा अंधार....ठार अंधार......पण मनात होती आशा प्रकाशाची...वाटायचं येईल कधीतरी तो कवडसा...आपण फक्त टिकून रहायचं...तग धरायची...उगवेल कधी दिवस आपलाही..जातील हेही दिवस!बाजुच्या रूम मधे कैलास, त्याचा लहान भाऊ जयराम रहायला आले होते, खेड्यातून आलेले मुलं होते ओळखी झाल्या, तेही तगत होते. आम्ही ऊगीचच भरकटलेल्या पतंगाप्रमाणे काही बाही बोलत असायचो. दिवस काढत होतो पण मन MPSC च्या आभाळात गिरक्या घेत असायचं.......

      एके दिवशी मित्राने सांगितले नांदेड नाक्यावर(माझ्या रूम पासून आठ किलोमीटर अंदाजे) एक मुलगा राहतो तो दरवर्षी पुर्वपरिक्षा पास होतो, वाटले चला त्याला भेटून मार्गदर्शन घेऊ, त्याला विचारू, आणी मग मी सकाळी चालत निघालो, जाताना हातात अभ्यासाचे मुद्दे काढलेली छोटी डायरी होती..पाठ करत करत तेथे पोहचलो. त्याच्या घरी जाऊन विचारले. तो बाहेर आला त्याने मला बाहेरूनच चौकशी केली.आणी मग मी बि.ए. सेकंड ईअरची परिक्षा दिली आहे हे माहित झाल्याने त्याने मला डिग्री झाल्यावर भेटायला सांगितले. मी त्यांना विनंती केली की मी थोडासा अभ्यास करू शकेन जर त्यांनी मला काही मार्गदर्शन केले तर, त्यावर त्यांनी मला म्हटले," मित्रा तिन वर्ष मी MPSC मधे घासतो आहे, खुप अभ्यास करावा लागतो, तुला एका दिवसात काय सांगु?" मी निराश होऊन त्याचे आभार मानून निघालो. पुन्हा त्याला काय वाटले माहित नाही मला परत बोलाऊन त्यांनी मला एक फोन नंबर लिहून दिला.आणी सांगितले "हा नंबर ठेव, डिग्री झाल्यावर फोन कर, तो पर्यंत माझे सिलेक्शन झाले असेल, माझी पोस्टिंग कुठे झाली ते तुला कळेल, तु मला तेथे येवून भेट ,मी तुला सांगेन मग सगळं!" मी होय म्हटले. मी परत निघालो. त्या मित्राची चुक नव्हती, मी परिक्षे बद्दल किती गंभीर आहे हे कदाचित त्यांच्या पर्यंत पोहचले नव्हते. ऊन तापले होते. मी ही खुप तापलो होतो. माझ्या मनात नाना विचार येत होते. सरतेशेवटी माझ्या मनात विचार आला हे हात आता मदती साठी असे कधी पसरायचे नाहीत स्वतःच ईतके मजबूत व्हायचे की आपण दुस-याला मदत करायची.( माझे सिलेक्शन झाल्यावर तोच मित्र- एक ग्रुप लातूर मधे आख्खा सिलेक्ट झाला आहे हे समजल्याने भेटायला आला त्याचा शेवटचा अॅटेम्प्ट तरी त्याला जाऊ द्यायचा नव्हता म्हणून तो आला होता, तेथे मला पाहून त्याला आश्चर्य वाटले, मी त्याला दादा तुम्हीही होऊ शकता ,माझ्या सा-या नोट्स घेवून जा! असे म्हणून पुर्ण बंच झेराॅक्स करून दिला, मी त्यांना कुठलीच अट टाकली नाही, ते म्हणाले "मी तुला त्यावेळीच सिरीयस घेतले असते तर माझेही सिलेक्शन झाले असते,मी म्हणालो मग आता घ्या!व्हाल तुम्ही!! त्यांनी खुप वेळा आभार मानून माझी माफी मागितली, मी त्यांना आपल्या पेक्षा मी खुप लहान आहे कृपया माफी मागु नका, मी दुस-या नोट्स मिळाल्यास नक्कीच पाठवतो म्हणून मी त्यांना रवाना केले, दुर्दैवाने पुढे त्यांचे MPSC त सिलेक्शन झाले नाही ते आज प्रगतिशील शेती करतात,आणी अधुन मधुन स्वतः होवून मला फोन!!!)


     जसे पाणी आपला मार्ग शोधतेच, तसे स्वप्न ही आपला मार्ग शोधत असते. गरज असते ती त्यावर विश्वास ठेवण्याची आणी त्याला घट्ट पकडून स्वतः सोबत चालत ठेवण्याची, दृढ इच्छाशक्ती असेल व स्वप्नपूर्तीचा ध्यास असेल तर नियती काही मददगार स्वतः पेरते आयुष्यात! आश्चर्य वाटेल इतपत काही असंबंध व्यक्ती संपर्कात येवून आपल्या स्व्प्नांना आधार देतात.आणी पथदर्शी ठरतात.आणी प्रत्येक ध्येय्यवेड्या व्यक्तीचा हा अतिविशिष्ठ अनुभव असतोच.उन्हाळ्याच्या सुट्ट्या एकदम भकास पध्दतीने चालत होत्या, वैताग येत चालला होता, मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो. एकदा असाच एमपीएससीचे पुस्तक हातात घेऊन मी गल्लीतुन चालत जात होतो.अचानक बाजुच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून मला आवाज देणारा एक मुलगा दिसला.मी थांबलो..तो खाली उतरला. त्याने मला विचारले, तु MPSC चा अभ्यास करतोस का?, मी तुझ्या हातात पुस्तक बघितले म्हणून विचारले अशी पुस्ती त्याने जोडली. मी नुकताच सिनीयरला विचारायला जायच्या अनूभूतीने निराश होतो. मी त्यांना सांगितले "प्रयत्न करत आहे." त्यावर त्यांनी मला या अगोदर पुर्वपरिक्षा दिली का? कुठली तयारी करतो वगैरे सखोल चौकशी केली. मला तांबे सर मुळे किमान माहिती होतीच. मी त्यांना मला जे जे माहिती होते, व मी किती अभ्यास केला हे सगळं सांगितले. त्यावर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी अरूण पोतदार,(अत्यंत पॅशनअसणारा, कोमल मनाचा हा व्यक्ती, सगळ्यात असूनही आपले अस्तित्व जतन करणारा व MPSC या शब्दा खातर कोणावरही विश्वास ठेवून त्याला मदत करण्यास तत्पर असणारा हा व्यक्ती) राज्यसेवा पुर्वपरिक्षा या अगोदर पास झालो होतो. पण मुख्य परीक्षेची तयारी न झाल्याने मी ती दिली नाही.आता 2001 ची पुर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आलो आहे. तु माझ्या सोबत अभ्यासाला बसशील का? मला एकदम धक्का बसला. खुप आनंद ही झाला.मी त्यांना सांगितले की, मी इथेच बाजुला राहतो. मी बसत जाईन तुमच्या सोबत. पण माझ्याकडे जास्त पुस्तके नाहीत. त्यावर ते म्हणाले माझ्याकडे पुस्तके आहेत. तु माझ्या रूमवरच बसत जा. मला विश्वास बसत नव्हता की मी जिथे राहतो तेथेच आसपास एवढा सिरीयस आणी अनुभवी व्यक्ती भेटेल. म्हणून मला पुन्हा सांगावेसे वाटते. आपले स्वप्न जिवंत असेल तर नियती मदत करतेच!!.( पुढे अरूण पोतदार STI झाले आणी आता ते असिस्टंट कमिशनर व्हॅट म्हणून कार्यरत आहेत. त्याच अॅटेम्प्टला त्यांची छोटी बहीण रोहिणी ही PSI झाली आता ती API पदी कार्यरत आहे..आणी त्याच वर्षीच्या राज्यसेवेतुन माझेही सिलेक्शन आहे..पण तो अॅटेम्प्ट 2001 चा नव्हता!!!! अजून खुप खस्ता खाणे बाकी होते..आयुष्य शिकायला मिळायचे होते. नविन धक्के बसायचे होते!!)
माझ्या Mpsc च्या यशाचे अत्यंत महत्वाचे कारक म्हणजे अरूण भैय्या!! ज्यांनी विस्कटलेला आमचा ग्रुप एकत्रीत करून ही यशोगाथा लिहिण्याची संधी मला मिळवून दिली.

          मी अरूणभैय्याच्या रूमवर अभ्यासाला बसू लागलो. इतके दिवस माझा अभ्यास इतरांच्या साथीने सुरू होता.त्याला एक कोष होता. पण येथे तो कोष विरून गेला. जिव टांगणीला लागावा ईतके खुजेपण अभ्यासात जाणवू लागले. मी ते कमी व्हावे या साठी जिव तोडून अभ्यास करत होतो. तेथे त्यांचे अत्यंत अनूभवी व सिनियर असणारे मित्र प्रविण शेळके अभ्यासाला यायला लागले. राज्यसेवेची मुलाखत दिलेला हा माणूस (दुर्दैवाने त्यांचे सिलेक्शन नंतर झाले नाही) ते अभ्यास, चर्चा करत आणी मी विचारच करत रहायचो की हे दोघं जे बोलत आहेत त्याचे तर बेसिक नाॅलेज पण आपल्याला अजून आले नाही. त्यांनी माझी दखल घेण्याइतपत ना माझा अभ्यास होता ना माझे वय! त्यांच्या लेखी मी एक काॅलेजचा विद्यार्थी होतो. आणी हे खरे ही होते. त्यांनी त्या टप्प्यावर मला तेथे बसायला संधी दिली हिच मोठी गोष्ट होती. ते दोघं 2001 च्या पुर्व परिक्षे बद्दल गंभीर होवून अभ्यास करायचे. माझ्या अनुभवाची रुंदी वाढत होती..मी सारे काही टिपून घेत होतो..मला खुप दूरचा पल्ला गाठायचा होता. मी एक एक टप्पा पार करायचे ठरवले...हा पाया भरणीचा टप्पा होता.

           रूमवर जे ऊपलब्ध सामान असायचे त्यातुन आम्ही जमेल तसा स्वयंपाक करायचो, कधी तो व्हायचा, कधी तो व्हायचा नाही. तरीही दिवस ढकलत रहायचो. मोठा भाऊ चित्रकलेच्या छंदाने लातुरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जायचा,मी अभ्यासाला जायचो. अभ्यास करत होतो.खुप प्रयत्न करून चर्चेची तरी पातळी गाठावी हा उद्देश होता.परीक्षेला सामोरे जाताना अभ्यास कसा करायचा याचे धडे मिळत होते.पण अजुन एक कठोर समीक्षक, ज्येष्ठ बंधुसम असणारे, खंदे स्पर्धक, व जवळपास संपुष्टात आलेली व मृतप्राय झालेली संधी अक्षरशः जिवंत करून तिचे सोने करणारे, आम्हा सगळ्यांनाच ज्येष्ठ असणारे, अनुभवी असणारे, ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवेच्या मुलाखती देऊनही पराभवाचे विष पचवून लातुरला लॅब टेक्निशीयन पदावर नोकरी निमित्त आलेले सौदागर तांदळे सर (सध्या नायब तहसीलदार)यांचा नाट्यमय प्रवेश होणे बाकी होते( आमच्या ग्रुप मध्ये सर्वाधिक अॅटेम्प्ट देवूनही न थकता, न हारता,MPSC ने वारंवार पीछेहाट करूनही सरते शेवटी MPSC ला आपली जिगर दाखवून तिलाच धोबीपछाड देवून शब्दशः यश खेचून घेणारे हे सर! मला ज्यांनी अभ्यास कसा खुन्नस आणी जिगरने करायला पाहिजे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिकवले, आजही आम्ही आमच्या पदांची कुठलीही वरिष्ठता कनिष्ठता न ठेवता त्यांना सरच म्हणतो. अत्यंत मायाळू पण त्याहूनही जास्त कडवा स्पर्धक असणारा हा व्यक्ती यांनी मला जे सहकार्य केले ते कदाचित एखादा भाऊच करू शकला असता. माझ्या संघर्षाला यांनी टोकदार केले, यांच्या संघर्षाची कहाणी खुप उद्बोधक आहे.)

        अरूणभैय्या जेथे राहत होते. ती बिल्डींग मोठी होती,तेथे विद्यार्थी भाड्याने राहत होते. तेथे रूम पाहण्यासाठी तांदळे सर आले. ते मुळचे बिड जिल्हयातील पण लातुरच्या पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन शासकीय महाविद्यालय येथे पोस्टिंग मिळाल्याने ते रूम शोधत नेमके तेथेच आले आणी नेमके त्यांनी अरूण पोतदार यांच्या रूम बाहेरील चिकटवलेला " कृपया गोंधळ करू नये, येथे MPSC चा अभ्यास करणारी मुले राहतात" या आशयाचा कागद त्यांनी पाहिला.मग काय!! दारावर एक जेंटल नाॅक , रितसर प्रवेश, एकमेकांचा अंदाज घेणे, पहिलवान कुस्ती अगोदर एकमेकाला कसे जोखतात तसेच मला वाटत होते, ते दोघे बोलताना. त्यांचे बोलून झाले.सर म्हणाले मला अपेक्षाच नव्हती, लातुरात MPSC करणारे कोणी भेटेल!! आणी सरतेशेवटी तो एक प्रश्न, माझ्याकडे पाहून, " हा बारावीचा मुलगा येथे काय करत आहे?" माझी त्यांनी त्यावेळी घेतलेली ही दखल!! आणी माझे सिलेक्शन झाल्यानंतर त्या अॅटेम्पटला ते नसतानाही त्यांनी मला दिलेली दाद व आजही अत्यंत अभिमानाने त्यांचे माझ्या बद्दल बोलणे... सगळंच स्वप्नवत व आयुष्य नितीतत्वाने जगायला शिकवणारे....!! सरांनी त्या सायंकाळी आपले सामान बाजुच्या रूम मधे टाकले..आठवले तर हे योगायोग स्वप्न वाटतात निव्वळ! "स्वप्न आपला मार्ग शोधतेच शोधते!!"
सर रहायला आले मग काय अभ्यासाची रणधुमाळीच!!! पण मी मैदानात नसतानाही स्वतःचा कस वाढवत होतो.चर्चेत प्रश्नाचा भडिमार झेलत  होतो, पराभूत होवून पुन्हा पुन्हा भडिमाराला सामोरे जात होतो...टाकाचे घाव बसायला सुरूवात झाली होती.. माझे दगडपण गळून पडायला सुरूवात झाली होती......(क्रमशः )
(प्रताप )

अंतरात...