Thursday, May 25, 2023

काहूरबुडीचे शिलालेख


हात तुझे अनावर
हळदीत ओल्या मळले
स्पर्शाचे निर्वाण दुःख
मनास असे मग कळले

हे कोण अंतरी ढळते
धुसर तुझी का छाया
मी दुर रानी बसूनी
त्यागत असता माया

शिलालेख काहुरबुडीचे 
मी ध्रुव दिशेस उभारे
सावल्यांच्या प्रदेशी कोण
पिटे मिलन नगारे?

वटवृक्ष हळूच हसतो
युग सरकता पुढे
फांदीवर कोणता पक्षी
घरट्यास बिलगुन रडे?

ईथे कोण उदासी
भरते रोज पाणी
मी निर्जन वाटेवरती
ठार उभा अनवाणी

निशब्द कविता माझी
मग खुलते मध्यराती
जणू प्रकाश उजळण्यासाठी
जळणा-या मंद वाती......

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२५.५.२०२३






Wednesday, May 24, 2023

निद्रोत्सूक ललाट


अस्तनभीची चांदणउधळण
अवकाशी कोण चकाकी
ढग जणू हा धारुन घेई
तुझी नयन लकाकी

दिगंत गाई आठवगाणे
थवा नभाला भिडतो
हृदयी बाण हाकेचा 
हात अनामिक खूडतो

सावली धिम्याने विरते
सांज ढवळते काया
मी जप आरंभे तूझा
विव्हल व्याकुळ व्हाया

पंखाच्या आतुर आशेला
गाव तुझा पुकारे
डोंगर दरीत विरती 
माझे मुक हाकारे

सांग नभाला माझ्या 
का रंग शामल भिनतो?
जिव किती हा वेडा
शोधत बोधत शिणतो

तुझ्या गावचे डोंगर
हरवती माझे थवे 
तुझ्या अंगणी उतरण्या
दे शुभ्र चांदणदुवे 

मी काढत माग येईन
तुडवत चांदणवाटा
आणिक चुंबून घेईन
निद्रोत्सूक तुझ्या ललाटा...

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२४.५.२०२३



 











Tuesday, May 23, 2023

चांदणबिंबी थवे.......


चंद्र राहिला मागे
मी पुढे निघालो सजने
रातदिव्याच्या वातीने
सोसत असता विझने

हे चांदणबिंबी थवे
दमून भागून निजले
तमात कसले अत्तर
चकाकणारे थिजले?

कुस हळू बदल तु 
चांदणे उगा थरकते
ध्रुवाचे अढळ काळीज
तुझ्या दिशेस सरकते

अंधाराच्या चिरेबंदीला
मी भेदत असता एकला
प्राण तुझ्या दिव्याचाही
बघ ! हळुवार थकला

नकोस घालू फुंकर 
वाहत असता हवा
या थकल्या पावलामागे
निघेल चांदणबिंबी थवा

होऊ दे रात अस्त
चांदण्या विझू दे
विझल्या वातीस या
काजळीत निजू दे

पुन्हा नव्याने रातीस
मग आर्त एक फुटेल
जळल्या वातीसाठी का 
दिव्याचे काळीज तुटेल??

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२३.५.२०२३







 
 



 


भ्रांत....


ते घड्याळाचे शहर
तु वेळे प्रमाणे पुढे
ही ओली घटिका कोणती
हृदयात माझ्या कुढे....???

ते एकट एकट तळे
आणी मन ओलावलेले
हुरहुरीची पाखरे उत्सुक
टिपण्या निरोप न आलेले

मी फिरतो आहे फकीर
शोधत माझा आत्मा
जणू अभंग आर्त निनादे
शोधत एक परमात्मा

येशील कधी का येथे
होवून आर्त व्याकुळ
मी अर्पून तुजला देईल
राधा हृदयी गोकुळ

दे खुण अशी काही
रुदन होईल शांत
मिटेल या हृदयाची
युगायुगाची भ्रांत....
やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२१.५.२०२३





Saturday, May 13, 2023

शिवसूतास नमन



स्वराज्याच्या महती साठी
झुकला ना हा नर छावा
हृदयात पेरतो आग हा
अन् नसानसात ल्हावा....

शिवप्रभूच्या छाव्यास मुजरा..!


やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१४.५.२०२३
 
  


निश्वासामागे......



पडले ना तुला कधी
येत्या हाकांचे कोडे
मी राखलेत अवशेष
वचनांचे तुझ्या थोडे

मी जतलेत अनंत शब्द
तुझ्या स्मरणासाठी
आणीक किती कविता
तुझ्या आठवा पाठी

स्पंद हृदयातले या
ढवळतात आत सारे
हवे तुझे असे काही
अंतर्यामी बहरणारे

मी असेच काही कल्पितो
तुझ्या माझ्या साठी
आणी मुक थांबतो
तु आखल्या परिघा काठी

दृष्टांत कधी का जाणवे
तुला एकांत घडीला?
मी हलकीच ओल धाडतो
तुझ्या नयनथडीला

दूरस्थ असे सारे
मागे न काही सोडले
जाऊन दुरदेशी
का आठवांस धाडले

मी आठवांचे रुदन
सांग किती जपावे?
आणीक निश्वासामागे
कितीदा मी लपावे?.....


やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१३.५.२०२३

















Monday, May 8, 2023

ओंजळ भरणे....


होते आहे एकट्यात
ढगांचे काळीज रिते
आणी तु म्हणताहे की
किती ! सुंदर ही पाऊसगीते!

कडाडते आहे विज
काही अंतरात आहे तुटते 
विजा अशाच कडाडती
तुला सहजी वाटते...

दुरदेशी कुठला ढग
दुःख भराने येतो?
खिडकीतल्या ओंजळीसाठी
थेंब साजिरा होतो

तुझा हसरा पाऊस म्हणजे
ढगांचे थेंब थेंब मरणे
आणी तरीही अलगद
अलवार ओंजळ भरणे....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
८.५.२०२३
 







Friday, May 5, 2023

तुझेच पांथस्त...


तु ध्यान लावले अद्भुत 
संथ निरंजने काठी
निघण्या सारे विश्व
अपार शांती पाठी...

कलिंग होते सम्यक
आम्रपाली शुध्द होते
अंगुलीमालाचे हृदय ही
या पथावर बुध्द होते 

असता सारे पेटले
तुझी आस दाटते
नतमस्तक होण्याजोगे
तुझे पाऊल वाटते

तु देतो सम्यक सारे
तु पेरत राहतो शांती
सारे तुझेच पांथस्त
इतर मार्गाअंती......

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
५.५.२०२३
 











 





 

उदक...


तु उदक सोड गं बाई!
या भयाण दुराव्या वरती
हे थवे हुरहुरीचे का
उगा नभी भिरभिरती?

कसले देवू अर्ध्य
वाहू कसले फुल?
माझ्या भावतळाला
तुझ्या आशेची हुल

तु दुर दिशेवर टाक
तुझी आभास छाया
मी धारुन घेईन मजवर
ती गर्द शामली माया

तु सजवून घे पंचारती
घे ओवाळून तुजला
पहा निरखून तो पदरही
कोणाच्या अश्रूत भिजला....?

नको उसासे घेऊ
फुटेल इकडे बांध
अंतरात जे तुटते
त्यास अलवार..सांध...

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
४.५.२०२३
 






 












 



Tuesday, May 2, 2023

बंदी


पारावर हल्ली कोणी नसते
पिंपळ उगाच कातर वेडा
गावमाळांच्या पाऊलवाटा
जिव तयांचा थोडा थोडा

जखमांचे गाव का हसते
वेशीस कसे टाळावे?
धुप अत्तरी हुंदक्याची
का आसवांस ढाळावे? 

गलबल्याची सांयप्रार्थना 
देवास भावत नाही
तो असा कसा सर्वज्ञ?
भक्तास पावत नाही

पाखरांनी नाव टाकले
दर्ग्यावर उरूस भरतो
आत्मा अवलियाचा
नभात बघ भिरभिरतो

नदी अशी कशी ही
पुढे निघाली दुर
डोळ्यात ठेवुन गर्त
एक हसरा पुर

हात कुण्या अज्ञाताचा
शब्दावर फिरत नाही
अव्यक्त कविता माझी
उगाच झुरत राही

माळावर शब्द फिरती
मनात अर्पण धुंदी
मी असा मुक मुक्याने
सोसत असता बंदी.....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
३.५.२०२३
 









 
 
 

अंतःकरणातील नाळ



मी उगाच फुलून येतो
झाड कवेला नसता
हे ओरखडे का हसती
अलवार दवास पुसता

काळोख असा का वाहे?
संथ नदीचे पाणी
घड्यास कसली तृष्णा
पडे अशी दिनवाणी?

रात बुडाली सये
ध्रुव राहीला मागे
जप कुण्या हाकेचा
नयनी अखंड जागे

सन्यांशी एकट तळे
उगाच मजवर हसते
पडले फुल अवनी
आभास नुसते नुसते

येतो का पाऊस तिकडे
का उगाच ढगांच्या राशी
विरेल हा ही आभास
कशास उदास होशी?

माझ्या सावलीला हल्ली 
अंधार सोसवत नाही
ही जखम असली कसली
उसवता उसवत नाही  

नकोस घालु फुंकर
एकटे जळू दे
मी युध्द पुकारले नाही
तुलाही कळू दे....

उगाच हतबल होऊन 
कोणी का करावा त्रागा?
अंतःकरणातील नाळेचा
अतुट असता धागा...... 

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२.५.२०२३
 




 




Monday, May 1, 2023

एकलव्याचं जंगल


मी....
कविता लिहीण्यासाठी
शब्दांकडे गेलो...
शब्दांनी होकार भरुन
विचारलं...
"भाव कुठुन आणशील?"

मी तडक पोहचलो
तुजकडे..आणी
तुझ्या दाराशी थांबुन
पसरली झोळी......
पण तु......
पसाभर दाण्यासाठी
"हंगाम नाही" म्हणतेय..... 

मी शोधतो आहे हल्ली
एकलव्याचं जंगल
मलाही साधावंसं वाटतंय
आता कवितेचं कसब......
तुझ्या मातीच्या पुतळ्याच्या साक्षीने
कधी तु मागशीलही 
त्या बदल्यात भावदक्षिणा
मी मात्र......
सा-या कविताच तुला
अर्पून टाकेन तत्क्षणी....
यत्किंचितही न कचरता......

मी अव्वल असेन का
बिनकवितेचा?
असा कुठलाच किंतू परंतू 
न बाळगता......

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१.५.२०२३
 




कोण्या कंठासाठी


हल्ली.....
तुला वेळ नसतो

वागण्यात...
मुळीच मेळ नसतो

जतने...
का खरेच अवघड?

प्रेम ....
तसाही खेळ नसतो.... 

मी लिहतो 
असे काहीबाही
आणी आपसूक 
खोडून टाकतो

हुंदक्याच्या प्रलयाचे
येतात अनेक घाले
आवर्त मी त्यांचे
अलवार मोडून टाकतो.... 

मी करतो कोरी पाटी
तुझ्या शब्दासाठी
कोणीही उरले नसता
माझ्या शब्दापाठी.....

मी उगाच कातर होतो
कोण्या कंठा साठी?
तु नाहीस भगवंत माझा
जो धावेल हाकेसाठी....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१.५.२०२३
 





सागर मागे सरता


काजव्या पाठीचा प्रकाश
का येतो हाती धरता?
लाटांची लाज न राखे
सागर मागे सरता....

बेवारस नग्न शिंपले
ओल्या वाळू वरती
कविता अखंड कोरडी
शोधत अनाम भरती

मी देवू कसले उधाण?
की आटुन घेवु सारे?
की जळात बुडवून देवु
हे शब्द तळमळणारे?

गाईल का कधी कोणी 
माझ्या तळाच्या लाटा?
की सागर पुसत असतो
वाळुत हरवल्या वाटा? 

निश्चल का सागर राही?
तळ तयाचा आटलेला
मी चंद्र पुनवेचा विझवे
भरतीस पेटलेला......

बुडवतो शब्द माझे
यत्नी पुष्पक येत नाही
देण्या परत गाथा
तुझे धाडसही होत नाही.....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१.५.२०२३
 









 



Friday, April 28, 2023

सांजार्त-पुरस्कार




                         *पसायदान राज्यस्तरीय काव्यपुरस्कार जाहीर*
*********************** 
यंदा *दशकपुर्ती साजरी करणार्या मु .पो. गुहागर .जि. रत्नागिरीच्या *पसायदान* राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.*२०१४वर्षापासून *पसायदान प्रतिष्ठान गुहागर* यांच्या वतीने महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण आणि सकस लेखन करणाऱ्या कवींना हा *पसायदान* *राज्यस्तरीय काव्य पुरस्कार दिला जातो .आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कवींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.(श्री  संतोष कांबळे, गीतेश शिंदे, सचिन गांगुर्डे, डी के शेख, संजय चौधरी,मांगीलाल राठोड,साईनाथ पाचारणे,अनिल पाटील,प्रमोदकुमार अणेराव ,रमजान मु्ल्ला,हबीब भंडारे आदि ते माधुरी मरकड, प्रतिभा सराफ) मागविलेल्या  प्रवेशिकांतून उत्कृष्ठ कवितासंग्रहासाठी हा सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.नुकतेच *वर्ष २०२२च्या काव्यसंग्रहांसाठीचे" पसायदान राज्यस्तरीय काव्यपुरस्कार "मान्यवर परीक्षकांकडून जाहीर करण्यात आले आहेत. यात *सुप्रसिद्ध कवी आबासाहेब  पाटील( मुनशी, बेळगाव )यांच्या "घामाची ओल धरून" , तसेच प्रसिद्ध लेखक, समीक्षक, बालसाहित्यिक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, डाँ श्रीकांत पाटील (कोल्हापुर, घुमकी ,)यांच्या "झाडोरा" आणि प्रशासकीय सेवेत असून साहित्यक्षेत्रात आपलं स्थान मिळविणारे, सावनेर तालुक्याचे तहसीलदार  व कवी प्रताप वाघमारे (नागपूर) यांच्या "सांजार्त" या कवितासंग्रहाला या कवितासंग्रहांना हा *पसायदान*राज्यस्तरिय  काव्यपुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  *रोख रक्कम तीन हजार ,शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.लवकरच  या पुरस्कारप्राप्त कवींना मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिकांच्या हस्ते चिपळूण येथे *जागर साहित्य संमेलनात या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असे *पसायदान प्रतिष्ठान* यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार प्राप्त सर्वांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

======================

Thursday, April 20, 2023

अत्तरगंध



गवगवा अत्तराचा
मुठ अशी का झाकतो?
लाज कुण्या फुलाची
तो रानावनात राखतो? 

होतो कधी कुठले
तो मुक निळे मन्वंतर 
कधी धावत वक्षी बिलगे
तोडत सारे अंतर

मागू कशास काही
गंध कधी का साठतो?
अनाहुत झुळूकीवरती
तो भास नव्याने वाटतो

तरीही कुपी होवुन 
जिव असा का बसतो?
तुझ्या निश्वासामधुनी
माझा अत्तरगंध हसतो.....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२०.४.२०२३
 


 












Sunday, April 16, 2023

मौनहाक


मौनावर हाक अंथरे
आठवांचा मखमली शालू
एक एकल्या माझ्याशी
दिर्घ किती मी बोलू? 

आणु कुठले शब्द 
वर्तुळ कसे संपावे?
अजान हाक नभाला
का मन कंपावे?

तुझ्या दिशेची सावली
लांबेल का जराशी?
उन्हे उभे बघ व्याकुळ 
बंद तुझ्या दाराशी

मी लिहतो आहे इकडे
संथावली बावर गाणी
सुर तुझ्या हुंदक्याचे
होताना आबादानी

स्वप्नात अशी का वाट
उगाच वेडी सुटते?
न पडणारे स्वप्न मग
तुझ्या मनात तुटते

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१७.४.२०२३
 




 
 

 

 

अद्वैती


साजन दुर गेला
ठेवुन मागे हाक
हाकेस त्या हंबराच्या
घुमारे लाखलाख

वनवास असा कसा हा
सितेस वन लागे
झाडांचे आत्मे गेले
मारिच पावला मागे

बेंबीच्या देठामधुनी
हाक अशी का फुटते?
कोण चांदणी वेडी
आभाळातून हमसून तुटते?

नागीण वळणी वाटा
वारुळ वेढत राहते
मनात या अनाम
कोण निरंतर वाहते?

हा कसला खंड पडला?
अखंड कसे व्हावे?
तुला भेटण्या व्याकुळ 
मनी दाटले धावे..

शोधु कसे कुठे
की वृक्षास अलिंगन देऊ?
की तुला खुण पटण्या
मी चुडामण होऊ?

कोणाशी युद्ध पुकारु?
की हसरा बुद्ध होऊ?
की तुझ्या अंतरी येवुन
अद्वैती सिद्ध होऊ?

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१६.४.२०२३
 


  




 


  



मिलनप्रकाशी ...


मी थिजलो आहे तेथे
जेथे वाटा फुटती
झाडांच्या काळजातल्या
जणु हिरव्या फांद्या तुटती

मी सजलो आहे तेथे
जेथे आसवे ढळती
आणी गर्द धुक्यातून 
पाने शुष्क गळती

मी निजलो आहे तेथे
जेथे बदक एकला राहतो
सजनीच्या पायरवाचा 
जिव अदमास घेतो

मी विझलो आहे तेथे
जेथे चंद्रमावळी दिशा
उगत्या दिशेस दिलीय ना?
तु मिलनप्रकाशी आशा....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१४.४.२०२३
 



देशांतर


होताहे देशांतर माझे
जणु मी खुद्द हरवतो
रित्या उदास फांद्यांवर 
मी भास जुने मिरवतो 

हे अनाम दुःख अनुत्सुक 
जेरबंद होऊन अडते
रित्या एकल्या खोप्यासाठी
मुळ तळात रडते

हसते झाड उशाला
डोक्यावर शिशिर येतो
अनाम बहर धारण्या
कसला उशीर होतो?

शहरातील घड्याळाचे
कसे थांबवू काटे?
मी मुक्या गतीने निघतो
टाळतो बोभाटे...
 
घेऊ तळे कुशीला?
की होऊ वाहते पाणी?
बदले कुस दुरावा
हो एकांत आबादानी

दुःख तुझे गोजिरे 
काळजात बघ हसले
मी बुडवून माझी गाथा
गाऊ अभंग कसले?

राहशील का तु असाच
भगवंत पावणारा?
शब्दांच्या गालखळीवर
तिट लावणारा 

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१३.४.२०२३












 


महासुर्य


नभात रंग ऊधळण 
अंधार हटवण्यासाठी
महासुर्या तुला वंदन 
माझे कोटी कोटी....

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१४.४.२०२३




परिघ

सहस्रके ओलांडून 
तु आलास
अभंगी शब्दांची 
मानवता पेरत...
निःशब्द जाणीवांना
तु दिलेस
अथांग आभाळ....
त्या आभाळाचा
प्रज्ञापाऊस..
वाहतो आहे 
रानाशिवारातुन...
मानवतेचे पिक
आता फोफावते आहे
मनामनात...
आणी आम्ही
तयारी करताहोत
सहस्रके ओलांडण्याची....
तुझे आभाळ 
ओलांडते आहे
आकाशगंगेचा परिघ.... 
"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१३.४.२०२३












Tuesday, April 11, 2023

वज्रधैर्य.....


चंदनाचे हात हे
गंध घरोघरी
अंधार सारणा-या
या तेजो प्रकाशसरी

'फुले' सुगंधलेणे
तेजोमय क्रांतीसुर्य
हुंदक्याना चेतवणारे
हे अपार वज्रधैर्य....

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
११.४.२०२३
क्रांतिरत्न बा ज्योती यांना नमन!



 









Friday, April 7, 2023

चैत्रावकाळी सर



मातीस ओला गंध
चैत्राच्या संध्याकाळी
कणास बिलगुन गेली
सर एक अवकाळी

शाम ढगाचा धावला
जणू राधा ही अवनी
एक एकली साळुंकी 
झाली फांदिची पाहुणी

रिमझिम सर मारे
अंधुक रेघोट्या
मातीतून उगवती
हेमकांती गारगोट्या

चेतलेल्या हवेमधे
आला शितल थंडावा
वारा उधाणुन करे
झाडपानांशी पुंडावा

ढगाच्या मनाला
कोण जाणे काय वाटे?
तो गरजतो मौन
माझ्या काळजाच्या वाटे

माझ्या मनातला ढग
निघे थेट तुझ्या गावा
तुझ्या मातीने धाडला
त्याला राधेचा सांगावा..... 

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७.४.२०२३



 



 








Thursday, April 6, 2023

चैत्र चांदवा


चैत्र चांदवा सखे!
तुजसम उगवून आला
तुझ्या दिशेला उडते
निद्रेची पक्षीमाला

सांग कुठे मी उजवू
पंखात साचली आभा?
खिडकीस तुझ्या उजळण्या 
देशील का तु मुभा?

किती दुर हा थवा
कापत निघतो अंतर
चकोर तुझ्या आसेचा
त्यास उडे समांतर 

दोहोनाही वाटे
चंद्र कवेस यावा
आस कुशीचा व्याकुळ 
हळवा चैत्र व्हावा!

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
६.४.२०२३










अंतरात...