एकांताची निरव पोकळी , मनाची सृजन घालमेल...निर्मिती आसक्त मी ...आणी हृदयात भावनांचे बहर....अभिव्यक्त होण्याच्या तळमळीचे हे पर्व.... माझ्या भावअस्तित्वाचा हा दर्पण.... एक रम्यगूढ हाक आणी वास्तव याच्या धूसर सिमारेषेवरील ही शब्दनक्षी...त्या नक्षीदार शब्दांचे हे रूप..साजिरे...गोजिरे..... लिहावे ऐसे अक्षर, जणू मनाची रेघ सांधून जावी ज्याने, काळजातली भेग.... काळीजभेग सांधणारी ही शब्दकळा...आणी काळीजकोरी ही कविता..... आणी ढवळून निघणारी आपली...प्रतिबिंबे....
Sunday, March 30, 2025
Saturday, January 20, 2024
भूपाळी
ही वेळ अशी का रिती?
चांद नभात ढळतो
हरणांचा रथ कुठे हा
अज्ञात दिशेला वळतो
राजकन्या कुठली वेडी
शोधण्या कुणाला निघते?
वैभव चांदण्याचे
निळे निळे ती बघते
ती का अनाहूत थबके?
कोण जिव्हारी लागे?
ती अखंड अवकाश शोधे
स्थिर ध्रुवा मागे
मी ही अढळ उधळतो
प्रतिक्षा खुल्या आभाळी
अन् श्वास उमटवून देतो
तिच्या आभास भाळी
ती हळूहळू धुसरते
कोण दिशेला जाते?
हरणांच्या पदध्वनिची
आर्त भूपाळी होते...
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
२० .१.२०२४
Thursday, January 18, 2024
अक्षरे
वाजती का अंतरी
आठवांचे चौघडे?
खोल उसासे दडपून
इथे काळजाला तडे
वणवण फिरती येथे
भूगर्भातील झरे
उगवून पृष्ठी येती
कवितेतली अक्षरे
घे ओटीस ही फुले
नकोस खचवू माती
झाक पदराखाली
हे व्याकुळ शब्दमोती
का कुशीला उगवे?
तुझ्या आसेचे चांदणे
कायेवर सजून येते
अस्पर्शी हिरवे गोंदणे...
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
१८ .१.२०२४
Friday, January 12, 2024
नामी दवा
दुःख अनाम अगतीक
त्याचा ना गवगवा
कोण फकीर कोठून
देईल नामी दवा?
सुजाण वेदना उभी
असते दारापाशी
तरीही हाक उमलते
होवून माहेरवाशी
अस्तविहीन चांदणे
देतसे मनाला धिर
कवने गात फिरतो
एक अवलिया पिर
नित्य घडीस हवा
कावर बावर होते
शब्दांचे संयत हृदय
वेदनेचे माहेर होते
दुर गावची सजनी
शब्द माहेरी रमते
मंद उसासे तिचे
एकाकीपण गमते....
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
१३ .१.२०२४
रेशमी उखाणे
देठ नको ना तोडू!
संपतील उगवत्या वेदना
दिठीस बिलगुन घे तू
झाडाच्या संवेदना!
झड भले ही येवो
तु राखून ठेव चैत्र
मी निभवून नेईन एकला
शिशिर झडीचे मैत्र
चल उगवून येवू दोघे
दगडाची भेग सांधू
अंधार वेलीवरती
चांदण्याचे फूल बांधू
येवू दे स्फटिक गंध
रात उजेडा नेऊ
मी रम्य पहाटवेळी
तुझी भूपाळी होऊ?
साजि-या तुझ्या वाणीने
तु गाऊन घे ना गाणे
मी लिहून घेईन ईकडे
रेशमी तुझे उखाणे......
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
१२ .१.२०२४
Thursday, January 11, 2024
राई राई
थिजते रान उभ्याने
होई हाकेचा गुंता
सांज किरमिजी उभी
नसे तमाची चिंता
त्या पैंजणध्वनी वरती
सजते सांजफुलाचे गाणे
आकाशाच्या कुशीत
चांदण्याचे जोंधळ दाणे
नक्षत्र आशेचे उगवे
त्याला संकेताचा पान्हा
शुभ्र झोळीआड मीरेच्या
हसतो शामल कान्हा
मी ओंजळ धरुन चाले
शिवतो तिला वारा
दान कान्हा देतो
ओंजळीत तुटला तारा....
रास अशी तुटक्यांची
घर भरले बाई!
रात नभात भिनते
मंद राई राई
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
११ .१.२०२४
Wednesday, January 10, 2024
इंद्रधनु तमात सजतो
रात भेगाळते अशी
जसे टिचकते काकण
जरी झाकले डोळ्यावरती
पापण्यांचे झाकण
निरांजनाच्या वळचणीला
अंधार मूठभर सांडे
अर्धउजेडी गात्रात माझ्या
स्वप्नांचे रंगीत तांडे
बकूळ झरतो दारी
निद्रिस्त होता केवडा
मी गंधभारला होतो
निशीगंधाच्या एवढा
अंगाई का सुचते?
मोरणीच्या मना
मी भूईवर रेखत असता
मोरपिसारी खुणा
का कसे मला
घनघोर अंधार सोसवे?
जळल्या वातीतून झरती
काजळरंगी आसवे
ओल मनाला फुटते
कैफ हळुवार निजतो
दिवा अलगद विझूनी
इंद्रधनु तमात सजतो...
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
१० .१.२०२४
Tuesday, January 9, 2024
स्तब्ध पाश
हे संमोहन टिपेला
जिव एकला झुरे
गर्ततळाच्या हाका जणू
बुडल्या द्वारकेची घरे
पृष्ठी वर्तुळ वाटा
त्यांचा काठावरती नाश
अनंत सागरा भोवती
किना-यांचे स्तब्ध पाश...
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com ९.१.२०२४
सुगंधी शेला
येशील कधी का असे
जणू राम मिथीला आला
ज्या भावघडी जानकीचा
शेला सुगंधी झाला
नयनात तिच्या का हसते
रघूकुळाचे पाणी
रामाचे हृदय होई
प्रितीची अत्तरदाणी
विभक्त ठरे ना काही
एकात्म सारे वाटे
फुलती प्रित फुले
शमती वनवासाचे काटे
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
७.१.२०२४
Monday, January 1, 2024
पद्मताटवा
सिध्दार्थ दाटला येथे
कलिंग झरते आहे
महावस्त्र सम्राटाचे
मुक विरते आहे
उध्वस्त समशेरीला
आकांत असा हा फुटला
दंभ दाटला स्तंभ !
आकांत भारे तुटला
आक्रोशाला आली
संवेद हाकेची वाणी
रक्तमातीवर झाकतो
चिवर पद्मपाणी
हिंसा निमाली येथे
बुध्द भेटण्या आला
महावीर नश्वर इथला
शिलालेखी अक्षर झाला.....!
हर युध्दभुमीस इथल्या
बुध्द स्फूरून यावा
शांतीच्या पद्मताटव्याने
'दंभ' हरून जावा!
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
२.१.२०२४
Thursday, December 28, 2023
अवघडतो
दुःख उमगते बाई
मला तुझ्या मनीचे
जात्यावर जणू फिरती
अभंग आर्त जनीचे
घन सावळा व्याकूळ
सांज समयी विरतो
तुकयाच्या रस्त्यावरती
विठ्ठल वेडा फिरतो
मी व्याकूळ अभंगदिंडी
राऊळी घेवून येतो
तुझा पांडुरंग हळवा
दिंडीत धावून येतो
चंद्रभागा तिकडे हसते
जिव जनीचा रडतो
हृदयातला धावा
व्याकुळून अवघडतो....
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
२९ १२.२०२३
Wednesday, December 27, 2023
वाट....
वाट हरवली सजने
धुक्यात बुडला रस्ता
आभास नेतो मजला पार
हळूवार ....अहिस्ता....
मी स्वप्नपडीच्या वेळी
वाहून देतो निद्रा
निळ्या गर्द रातीवर
तुझी उमटते मुद्रा
मी चांदठशाचे माग
ढगास दान देतो
तु वेढल्या वेळी
मी झांजर धुके होतो
हाक तुझी उमटते
येते आठवांची लाट
विलीन होते परस्परात
तुझी..माझी...वाट
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
२८. १२.२०२३
Friday, December 22, 2023
ओकेपण
शिशिर उभा हा दारी
बहर निघाला गावा
ओक्याबोक्या झाडांचा
पानफुलांचा धावा
गिरकी घेवून पाने
निघती चुंबन्या धरती
फांद्याचे निरोप हळवे
अंतरात हुरहूरती
तु बहर नको ना नेऊ
चालत शिशिरा मागे
झाडांचे करडे ओकेपण
मनास माझ्या लागे
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
२३. १२.२०२३
Saturday, December 16, 2023
पैलतीरावर मोह
दुःख नदीवर आले
पाणी भरण्या ओले
काळीज तयाचे तेथे
ओले पाणी झाले
माठ कुणाचा तेथे
असाच राहून गेला?
निद्रिस्त यशोधरेला
जणू सिध्दार्थ पाहून गेला
ढग ही आभाळातला
नदीत बुडून जातो
त्याचा शिरावळाने
थवाही उडून येतो
मी तम उधळून नभावर
नदीत चांदणे वाहतो
दुःख सागरा निघाले
काठावरूनी पाहतो
लाटांच्या खाली उमटती
मंद हाकांचे डोह
मी ऐलतीरावर उभा
पैलतीरावर मोह !
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
१६. १२.२०२३
Sunday, December 10, 2023
अज्ञाताचे चांदणे
धागा धागा जुळे
कसा तो न कळे...
जसे अज्ञाताचे चांदणे
जपते अवकाश निळे
चालत चालत येते
बहराची निर्मळ वाणी
निपचितल्या शब्दामधूनी
प्रेमाची चाहूल गाणी
प्रेम आपूले पुर्वज
कसले आपले नाते?
मिलनाचे संकेत हळवे
शब्दात दडले होते
वेच कळीचे शब्द
दे प्रतिभेचे दान
होऊ दे कवितेला
व्याकुळ! बेभान!
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
१०. १२.२०२३
Tuesday, December 5, 2023
दिगंत
जरी मावळे दिनकर
आस उद्याची त्याला
अनंत वंचित नभाचा
तु अखंड सुर्य झाला
तु पथ किरणांचे दिले
कधी न त्यांचा अंत
प्रज्ञासुर्याच्या किरणाने
आबाद हे दिगंत!
#महामानवास वंदन
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
६. १२.२०२३
Monday, December 4, 2023
विहरणारे...
गर्द धुके ना सरते
सुर्य कुठे हा दडतो?
खोल मुळातून वृक्षाचा
जिव पहा अवघडतो
घनघोर एकांताला
फुटे ना कुठली भाषा
मी अवकाशाला लावतो
माझी ललाट रेषा
कसली किनार चंदेरी
या भाळास ये चकाकी
माझ्या काळोखाला
मग स्वप्नांची लकाकी
कोण मोडते स्वप्न
सलग शहारणारे?
मी दुरुन न्ह्याळतो पाखरे
तुझ्या अवकाशी विहरणारे....
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
५. १२.२०२३
तुटका ....
आसुस धुके हे करडे
हळू हळू बघ निवते
पंखांची आसूस फडफड
अवकाशाला शिवते
कोण पारधी कुठला
पसरून बसला जाळे?
काढून घेतले कोणी
स्वप्नाचे घुंगरवाळे?
बकाल नदीच्या अंतरी
स्वप्नाचे वाहे मंतर
सागर मोजत असतो
नदीस पडले अंतर
या झांजरसांजर वेळी
का हाका अशा फुटाव्या?
लाटांच्या लहरी जात्या
जणू किना-याहून तुटाव्या
तुटली लाट कितीदा
सागर कवेस घेतो
लाटांच्या तळाखाली
सागरही तुटका होतो....
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
४. १२.२०२३
Wednesday, November 29, 2023
आस दरवळ
झाडाच्या सावलीला
फुल कधी का लागे?
ती चालत निघून जाते
मंद प्रकाशा मागे
झाड दुःखी विरते
अंधारदिव्याच्या तळी
तेवत नयनी स्वप्न
बहराचे मृगजळी
तु का उजवते फांदी
अशा दाटल्या राती?
फुल उसासून चुंबते
दवात भिजली माती
दुःख तयाचे नित्य
मातीवर व्याकुळ पडते
अशा फुलसड्यावर
प्रित तुझी मग जडते
अशा फुलझडीची
तुझ्या देव्हारी रास
नित्य रामप्रहरी तेथे
दरवळते माझी आस.....
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
२९. ११.२०२३
Tuesday, November 28, 2023
धुकेरी एकांत...
धुक्यात चंद्र वाहे
नयनात ढग थिजतो
ओल्या पाऊस वेळी
एकांत अवघा भिजतो
चंद्र उभा व्याकुळी
जणू मिरेची विणा
शामलकांती नभी
शोधत गिरधर खुणा
दुर दरीतळाला
वाट तमात बुडते
स्वप्नांची काळीजमाया
तुझ्या आभासी जडते
कसे कुशीस घेवू
हे भुरभुरणारे धुके ?
आक्रोशती हाक माझी
मौनात स्तब्धे मुके
एकांताचे भोग तू
दिले शब्दांच्या भाळी
कशा विराण्या गाऊ
अशा धुकेरी वेळी?
मुक धुक्याच्या संगे
चांद नभी एकला
असला कसला आकांत
तु झोळीत त्याच्या टाकला.....?
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
२८. ११.२०२३
नयनात ढग थिजतो
ओल्या पाऊस वेळी
एकांत अवघा भिजतो
चंद्र उभा व्याकुळी
जणू मिरेची विणा
शामलकांती नभी
शोधत गिरधर खुणा
दुर दरीतळाला
वाट तमात बुडते
स्वप्नांची काळीजमाया
तुझ्या आभासी जडते
कसे कुशीस घेवू
हे भुरभुरणारे धुके ?
आक्रोशती हाक माझी
मौनात स्तब्धे मुके
एकांताचे भोग तू
दिले शब्दांच्या भाळी
कशा विराण्या गाऊ
अशा धुकेरी वेळी?
मुक धुक्याच्या संगे
चांद नभी एकला
असला कसला आकांत
तु झोळीत त्याच्या टाकला.....?
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
२८. ११.२०२३
Sunday, November 26, 2023
हुरहूर थवा
अज्ञात गाठण्या निघती
हे कावर बावर थवे
नयनात तयांच्या चांदणे
हृदयात काहूरी दिवे
तु तुझ्या दिशेची सावर
झाडांची निजली छाया
पानावर उजळून येईल
चंद्रव्याकूळी माया
मी कुशी तुझी का शोधू
थव्यास उसंत देण्या
की बहरून उगवून येवू
सडा फुलांचा होण्या?
अवरुध्द घटिका स्तब्ध
कंठ तुझा का दाटे?
अव्यक्त प्रारब्ध आपले
व्याकुळते स्वप्नावाटे
चांद नभाला शिवतो
निशीगंध तयात भिनतो
अवकाशाच्या मलमलीची
मी नित्य कविता विणतो
या तलम गोजी-या हाका
दुर दिशात विरती
ही किती युगाची भिरभिर
थवे व्याकुळी फिरती......
मिळू दे उसंत थव्याला
घे ना हाक उराशी!
शांत मंद होईल
हुरहूर मग जराशी!
("やraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com
२६. ११.२०२३
Friday, November 17, 2023
धिर व्हावा
घनश्यामा ये तु तत्पर !
राधा झुरते आहे
कळ तुझ्या बासरीची
अंतरात स्फुरते आहे
भेट अशी ती व्हावी
अनंत कवेस यावा
उगवल्या चंद्रास नभी
फुटो चांदणधावा
एकात्म सारे व्हावे
विलग उरो ना काही
विरुन एक व्हाव्या
बहूमुखी दिशा दाही
स्वत्व तुझे व्हावे
एक सुर व्हावा
तो पावेतो तगण्याचा
मला धिर व्हावा!
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१८. ११.२०२३
साजन खुणा
ढग चालले चालले
न्ह्याळत साजन खुणा
आणी स्पर्शिती डोंगर
आठवणींचा जुना
दिसतो एक पारवा
शोधत अजाण खोपा
युगायुगाच्या अंतराने
त्याच्या काळीजखेपा
दुर सजनी एकली
क्लांत आठववेळी
बट एक स्थिरावे
तिच्या उन्नत भाळी
हात उगाच काहूरे
चेह-याचा अधिर भास
या सांजेस गुलाबी छटा
भवती तुझा सुवास....
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१५. ११.२०२३
Thursday, November 9, 2023
दरवेशी
या साजनवाटा भिनती
जणू धुक्याला रंग
मी सांजनयनी पाहे
तमाचे काजळी अंग
तु सांडुन जाते सारे
माझ्या ओंजळी तारे
मी रातगतीचे चांदणे
रेखतो तगमगणारे
तू देत नाहीस हात
माझ्या रित्या हाती
मलूल एकट विझती
हृदयाच्या हळव्या वाती
दे ना चेत मनाला
अंधार जाचला असता
मी व्यापून असे काय घेवू?
तुच तु साचला असता
दे अखंड असे चैत
या हेमंती क्षणांना
तु दे अंतराळ अनंत
एकेका प्रेम कणांना
व्यापू दे अंतर्बाह्य
ये असे एकदा कवेशी !
शब्दांचे नगर वसवेल
हा विरहांकित दरवेशी...
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
९. ११.२०२३
Wednesday, November 8, 2023
प्रेमझरे
दुवे कुणाचे वसले
आत्म्याच्या भावतळी
हुरहुरते भिरभिरते
माळावरती एक कळी
झुरझुर वाहते एकले
हेमंताचे व्याकुळ वारे
सोनफुलाचे काळीज
अव्यक्त हुरहुरणारे
फकीर कुठली गीते
झोळीत सावडून घेतो
एकांत जुलमी सखा
स्मिताने आवडून घेतो
गातो तीव्र निःशब्द
तो शब्द आरास रचतो
कुण्या दुरदेसीच्या सजनीला
तो अनाहूत सुचतो
तो असतो आभास धुसर
तो नसतो वास्तव खरे
तरीही त्याच्या चाहुलीने
तुझ्या अनंतास प्रेमझरे....
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
८. ११.२०२३
Subscribe to:
Posts (Atom)
-
पळस पेटला रानी निळ्या आभाळाला झळा वैशाखाच्या विरहात येती सावलीला कळा रंग निळ्या आभाळात ऊष्ण केशरी लकाकी पहाडाच्या माथ्याला येते ...
-
तूम कहती थी, मुझे घोसला पसंद है। बताओ वो बरगद का पेड कट रहा था,तूम कहा थी? ₱Ɽ₳₮₳₱) रचनापर्व www.prataprachana.blogspot.com
-
मै क्यों ना काफिर कहू तुम्हे? मोहब्बत मे खलल गुनाह नही? ₱Ɽ₳₮₳₱) रचनापर्व www.prataprachana.blogspot.com



%20(26).jpeg)
%20(25).jpeg)



















