Sunday, May 29, 2022

तुझे चांदणे

निनाद कसले येती
सुर्य निजेला निघता
काय शिलगते आत
प्रकाश हळुवार विझता

गहिवराचा उडतो पक्षी
पसरून आपले पंख
मी तळव्यावर सजवून घेतो
किरणांचे विझते डंख

पाणवठ्याच्या दुथडीवरती
हळुवार आपटती लाटा
सांजेत अदृश्य होती
माळावरच्या वाटा

मी आशा पेरतो नभी
चंद्राची खुण लागते
रात अशी का नित्य
तुझे चांदणे मागते..?
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३० मे २०२२







ओथंब...

बंद होता नयन
स्मरते असे काही
ढग माझा ओथंब
पाऊस कुणाचा वाही?

ते कोसळ फुल कुठले
पावसाची पाहते वाट?
दुथडी भरून उचंबळ
नयनाचे दोन्ही काठ

दाटेन कधी मी ही
नयनात तुझ्या घनभारी
कोसळलेला सागर मग
साचेल तुझ्याही दारी

थेंबथेंब वाहील मग
पावसाचे ओले गाणे
मी ढग साचवत राहीन
पुन्हा नव्या धिराने....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९ मे २०२२



Saturday, May 28, 2022

भिजण्याची रित

तो येईल घेवून लवकरच
ओल्या सरीचे गीत
तु भिनवून घे स्वतःत
कंच भिजण्याची रित

तो वाहील,तो कोसळेल
तो फिरत राहील अवकाश
मातीतला आवेग तो
भिजवेलही सावकाश

तो सृजन पेरून जाईल
वाहून स्वतःस सारे
हिरवळीच्या वरती
हसतील मग तारे....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८ मे २०२२

Friday, May 27, 2022

हाकांचा माग...

परतीस निघाले सारे
काकुळतीचे पक्षी
आवेग आभाळी घेवून
आपल्या ओल्या वक्षी

दुर शिखरावरती
ठेवून आपल्या व्यथा
पेरत निघाले अवकाशी
ते प्रितीच्या लोककथा

एक रेंगाळतो मागे
काढत हाकांचे माग
मग आपसुक बनत जातो
तो प्रितकथांचा भाग

गळले त्याचे पंख
पुढ्यात माझ्या पडते
माझेही मन व्याकुळ
मग हाका मागे उडते.....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७ मे २०२२





Thursday, May 26, 2022

अंतरात भिडणारे..

भेटावे असे काही
अवघेची स्तब्ध व्हावे
त्या साचल्या क्षणांचे
मग हळवे शब्द व्हावे

कळावे असे ते सारे
नकळत घडणारे...
मी भाव शब्दास द्यावे
अंतरात भिडणारे

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७ मे २०२२





बीजस्वप्न

निष्कारण असे काही
उगा मनात उमले
अंकुराचे भास कोवळे
बहरात तुझ्या बघ रमले

अकारण असे का मन
तुझ्या दिशेस निघते?
रोपट्यातुन उगवू पाहणारे
बीज प्राचिन स्वप्ने बघते

युगायुगांच्या नोंदी
वर्तुळातुन झाड देते
फुलण्याच्या बहरआशेने
झाड पुन्हा बीज होते.....


(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७ मे २०२२







राधा कृष्ण होते

कळले आज जरासे
चांदणेही व्याकुळ होते
मथुरेच्या दिशेस पाहून
झुरणारे गोकुळ होते...

न वळले पाऊल मागे
तरी बासरी परतून आली
वृंदावनाच्या चांदण्याखाली
राधा कृष्ण झाली.....


(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४ मे २०२२








शब्दांची आर्जवे

माझ्या शब्दांची आर्जवे
दारात व्याकुळ थांबले
अबोल्याचे पर्व जेंव्हा
दिर्घ..प्रदिर्घ लांबले...

कवितेचा गाव उदास
धुक्यात पार बुडतो
शब्दांचा जिव आर्त
उंबरठ्यावर अडतो

किलकिले दार तरी
व्हावे या भाववेळी
नको मिळू दे शब्दांना
कौतुक भरली टाळी
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४ मे २०२२






Saturday, May 21, 2022

व्याकुळ फुल

उमाळ्याच्या फुलास
गहिवराचे काटे
व्याकुळ मन सांडे
एकांत वेली वाटे

चाहूल लागत नाही
फुल पडते खाली
तुटल्या पाकळ्यांचा
कोणीही नसतो वाली

गंध लपत नाही
तो वा-यावरती उडतो
पुन्हा एक उमाळा
वेलीला अलगद जडतो....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१ मे २०२२










जटिलांचे काळोख.....

डोळ्यांचे संदर्भ
कटाक्षांचे कोने
मोहरल्या चंद्राचे
पूनवेस हो सोने

चांदण्याची चकाकी
सागरात मंद विरते
मन उधाण स्वप्नामधूनी
एकट एकट फिरते

रात संभ्रमी वाटे
जटिलांचे काळोख उभे
तुझ्या दिशेस निघण्या
माझ्या स्वप्नांचे मनसुबे.....!
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१ मे २०२२



गंधित होते माती

अनादी,अनंत...
आत अगदी खोल
तुला शोधत्या शब्दांना
कवितेचे मिळते मोल

हुकलेल्या सांजवेळी
मी शोधत तुझी दिशा
शब्दातुन पेरत निघतो
चांदण्याची निर्मळ आशा

चांदणे माळावर सांडे
अवकाश असा का पाही?
तुझ्या पुर्ण चंद्रासाठी
देवू कोणती ग्वाही?

हा सागर रोखुन धरला
पुनवेच्या भरतीसाठी
लाटांचे आवर्त नांदे
मिटल्या पापण्या काठी

शब्दांचा चकोर उडतो
पुनवेचा घेण्या माग
फुलझडीचा निनाद
अन् रातीस चांदण जाग

मी सारल्या सा-या दिशा
तरी दिशाहीन होणे टाळतो
तुझ्या चांदण्यासाठी
शब्दांचे वचन पाळतो

शब्द कुशीला येवून मग
कवितेस अलिंगन देती
रातराणीच्या फुलाखाली
जेंव्हा गंधित होते माती.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१ मे २०२२










Thursday, May 19, 2022

स्वप्नमाग....

आलीच स्वप्ने
हरिण पावलाने
तर अलवार
कुस बदल....
अन्यथा....
बिथरून होतील
ती रानोमाळ

आणी तुला
हरवायला होईल
त्यांच्या पाठलागात...
स्वप्न तसेही
माग ठेवत नाहीत....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२० मे २०२२



आभाळाखाली साजरे

शोधत असता माझ्या
शब्दांचे व्याकुळ मुळ
सांजघडीस उडते
मनात गोरजधुळ....

तु येते मनात माझ्या
जणू घरी कोण ते परते
सांज घडी घडी ने
रातीच्या कुशीत सरते

दिवा होऊन तेवते
मन माझे ओसरी
शब्दांना सुर फुटतो
कवितेची होते बासरी

धुन नभात विरते
चंद्र ढगाआड पाझरे
असे दुरावे नित्य
आभाळाखाली साजरे.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२० मे २०२२

परिक्रमणातील प्रार्थनालये....

तो म्हणाला,
"तुझं प्रार्थनालय
माझ्या अगोदर नव्हतं"
मग तोही म्हणाला
"तुमचंही...!!"
हमरीतुमरीने दमून
दोघांनीही मग
पृथ्वीची साक्ष
काढायचं ठरवलं....

पृथ्वी शांतपणे उत्तरली..
"दर हजार पाच हजार वर्षांनी
उद्भवतात असेच
थोर पणाचे झगडे...
झगडणा-यांचे अनेक
धर्म,प्रार्थनालये व ते खुद्द...
पहुडलेत शांतपणे माझ्या उदरात
किती संस्कृती,किती धर्म
आले गेलेत माझ्या
हयातीत...
सारेच थोर म्हणवून
पिटतात आपापले ढोल...
"तुमचे युग आहे तो
झगडून घ्या...बाबांनो!
शेवटी तुम्हीही येणारच
आहात विसाव्याला माझ्याकडे..."

ते दोघेही मग गुमान
निघाले आपापल्या
प्रार्थनालयाकडे
...आणि पृथ्वी आपल्या
नियमीत परिक्रमेसाठी....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९ मे २०२२








Monday, May 16, 2022

अत् दिप भवं..

प्रज्ञेचे पिंपळ छाटून
करूणा देशोधडीला लावलेले
ते ओरडतायत 
तुझ्या कडे पाहत..
'किती अंधार 
भवताली साचलाय..?
ही युध्दे,दारिद्रय,दुःख,
वंचना किती वाढलंय सारं..."
"...तु काही चमत्कार का
करत नाहीस...?
मुक्ति दे आम्हाला......"

आणि तो शाक्यमूनी
स्वतःचे देवत्व नाकारत 
आपले चिरपरीचीत 
स्मितहास्य पेरत
आवेगाने ओरडणा-या
'त्या' सा-यांच्या आत 
साचलेल्या गर्द तमाकडे
अंगुलीनिर्देश करतोय
"अंतरीचे दिवे पेटवा"
"प्रज्जवलीत व्हा!"
"प्रबुध्द व्हा ! " म्हणत..
मला ऐकू येतो आहे
त्याचा शुभाशिष..
"भवतु सब्ब मंगलम्"
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१६ मे २०२२


Sunday, May 15, 2022

कळ्यांचे मोसम

कधी आलेच कळ्यांचे
मोसम तर ओंजळीचे
खुले असावे दार

झेपावला मनातला पक्षी
तर अवकाश असावा त्याला
नजरेच्याही पार.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ मे २०२२

रंगीत जंगल

स्वप्न घेऊन
तुझ्या दिशेला
पक्षी उडतात
निरंतर ,थेट...

मग तुझ्या
आभासाच्या
झाडावर ते
अलगद उतरतात

त्यांच्या पंखस्पर्शाने
तुझ्या झाडालाही
रंगीत स्वप्नांचा
मोहोर येतो

पक्षी तो मोहोर पेरत
परत निघतात
मग त्यातुन उगवते पुन्हा
स्वप्नांचेच रंगीत जंगल...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ मे २०२२






ध्रुवतारा......

सांज ठेपेल दारी
तेंव्हा तु निघ
दिगंत निवत असेल आणी
दिवे पेटत असतील
तसेही तुला अंधारभय
वाटत नाही
कारण तुझ्या आत
फुलली असते चांदपुनव
त्या अंतरीच्या
पुनवेच्या उजेडात
चांदण्याचा शोध घे
माझे शब्द तुझ्या
हाताला बिलगतील
त्यांना तु 'सप्तर्षी'
ठेवण दे
आणी सजवून घे
तुझा अवकाश
त्यावेळी मी
निरखत असेन
तुला ध्रुवाचा तारा
बनून!!
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ मे २०२२






Saturday, May 14, 2022

तुटला तारा....

चंद्राच्या थेट खाली
त्याचा उजेड
आणी मी..
अंधार हटवत
आतला....
शोधत असतो
परस्परांची
पाळेमुळे
मग....
पुन्हा
तुझी गर्द
आठवण येते
आणी....
अंधार साचू लागतो नव्याने
मी आणी चंद्र ..मग..
अंधार मागे सारत
निकराने
तेजाळत राहतो
मुक रात्रभर....
एकमेकांच्या
आधाराने....

आमच्या या
हळव्या प्रयत्नात
निखळतात
काही तारे...
आणी बहुधा
तु त्यांनाच
"तुटला तारा"
समजून
मिलनाचे दुवे मागतेस!!!
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४ मे २०२२





झरझरणारे वारे

मी तसाही माझा नसतो
तु नसलेल्या क्षणी
रान पेटवत असता
आठवणीच्या धुनी

मी हाक कशाला देवू?
तु ऐकत असता सारे
ओंजळीत स्थिरावत नसते
झरझरणारे वारे....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३ मे २०२२


श्यामरूपी....

लिहीण्या माझा भाव
आणी त्याचे प्रारब्ध
व्याकुळा नेमका दे
हृदयातला शब्द!

धुके जसे पसरते
व्यापून घे तु मजला
तुझ्या उमाळ्याखाली
फुलती व्याकुळ गझला

असे घडावे काव्य
सारे थिजून जावे
कवितेने माझ्या शब्दात
स्वतः रूजून घ्यावे

तुला तुझे वाटावे
असे लिहावे काही
बासरी जणू राधेला
शामरूपात पाही.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३ मे २०२२



Thursday, May 12, 2022

दुवे कवितांचे....

कोणे एके काळी
या देहाच्या ढोलीत
रहायचा एक सामान्य पक्षी..
तो नित्य निघायचा,परतायचा
दाणे टिपून
घोट दोन घोट पाणी पिऊन
निजायचा ढोलीत गुमान
आणी एके दिवशी तु
'क्रौंच-कारूण्यी' कटाक्ष
टाकलास...!!!

आता तो...
नित्य भरकटतो
शब्दबाधा झाल्याने तो
नित्य शोधतो कविता
आकाशभर...
ढग,चांदणे, मावळती
वाळवंट,नदी,तळे, फुल पान
असं पाहतो काहीबाही...
ढोलीत ठेवतो जपून
त्यांची एकेक वेदना फुले...
आणी झेपावतो पुन्हा ...
अज्ञाताकडे....स्थितप्रज्ञ..
काय माहित ....?
कुठल्या महाकाव्याच्या शोधात...?

शब्दसखे...! तो पर्यंत
छतावर ठेवत जा ना
तुझ्या ओंजळभर पाणी....
आलाच कधी तो तृष्ण
तर विसावेल तो क्षणभर
आणी त्याचा तृप्त आत्मा
देईल तुला कवितेचे दुवे....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२ मे २०२२

कवितेचा माळ

भेटून तुला घ्यावे
जसा पक्षी येतो दारी
ओसरीवर तु ही यावे
उत्सूक सांजपारी

अलवार व्हाव्यात तेथे
नजरेच्या भेटीगाठी
अंधार सारण्या व्हावी
चांदण्याची ढगदाटी

टिपून घ्यावी क्षणात
श्यामल संध्याकाळ
कंच हिरवा व्हावा
कवितेचा माझा माळ...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१२ मे २०२२










Wednesday, May 11, 2022

धुळ...

काय निसटते आत
जणू दरीत फुल पडते
काळीज दरीचे गर्त
वा-यावरती उडते

कसले भासगाणे
बनते पाखरशिळ
शिखराला वारा शिवतो
दरीत उडते धुळ....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११ मे २०२२







Tuesday, May 10, 2022

सांजकविता.....

दिसाअंती चंदेरी
सांजेस लकाकी येते
रातीच्या अस्तराखाली
मन एकाकी होते

जरी टाळतो मी
अंधाराचे अंबर
दाटून चांदण्यात येते
गायगळ्याचे हंबर

रानावर चंद्र उगवता
रान हळूच निवते
मंद उजेडा आडूनी
आठवांचे सारे फावते

ध्रूव तुझ्या आठवणींचा
स्थिर निश्चल पाहतो....
एक चांदणी घेवून मग
मी सांजकविता लिहतो

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११ मे २०२२



व्याकुळ शिवार...

नदीवरचा वारा बनून
गाव तुझा गाठावा
आस लागल्या नयनाचा
छंद हळू मिटावा

नदीत भिजत असता
तुझ्या गावची माती
मी भास नदीचा द्यावा
तुझ्या शिवार शेती

भास तुझा स्पर्शून
मी मुळ ठिकाणी यावे
झुळकी साठी एका
तुझे शिवार व्याकुळ व्हावे.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११ मे २०२२



Monday, May 9, 2022

लोकगीत...

उगाच आपले गीत
काफिल्याला वाहून द्यावे
लोकगीताच्या चालीमधूनी
त्यास दुरून पाहून घ्यावे....





(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९ मे २०२२



खस्ता....

सवाल कसले दाटती
कुठलेही उत्तर नसता
बघवत नाहीत शब्दांच्या
अबोल अजाण खस्ता....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९ मे २०२२


अगम्य....

तुला स्वप्न पडत नाहीत,तुला हाकांचे डोंगर
आणी त्यावरील उदास धुकेही दिसत नाही

डोंगरमाथ्यावर ओथंबलेला सांजरा
अबोल अवकाश रातीत विरघळत असता
तु पेटवलेल्या दिव्याची वात का थरथरते?

ओंजळीला विचारअदमास घे
उत्तर नसेल तर...दिवा विझव
हाकांचे डोंगर गाठ
ओथंबलेला अवकाश स्वतःवर धारून घे
धुके बन,मिसळ त्याचे उदासपण जाईल!
आणी तुला अवकाशा इतकं विस्तृत स्वप्न पडेल...

अर्थ नसेल लागत स्वप्नांचा तर
पुन्हा दिवा पेटव, स्थिर वातीतुन
माझे शब्द तुला प्रकाशवाट देतील
हवं तर पुढे ये!नसेल तर घर गाठ
दिवा विझेल आणी अंधारात मग तुला
पुन्हा स्वप्न पडेल अगम्य...!
हवा तर अर्थ लाव,हवे तर स्वप्न विसर....
(Pr@t@p)
"रचनापर्व"- 'अ'मुक्त छंद
www.prataprachana.blogspot.com
९ मे २०२२







Sunday, May 8, 2022

बासरीसुर

ही सांजव्याकुळी वेळ
मनात शाम उरतो
सुर कुणाचा राधा
श्वासातुन बासरी झरतो.....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८ मे २०२२


सुगंधी अंतरा

ते होते अद्भूत सारे
जे अंतरी रूजले
सय जराशी आली
मनात मौन भिजले

ते व्याकुळ होते म्हणूनी
शब्द वेचले नाही
फुल वाहीले गाभारी
शिखरा पोचले नाही

तरीही झाड बहरते
मौन तुझे पुसण्या
दे ! शब्दकळ्या फुलाया
ओंजळीत या उसण्या

साधेल एखाद वसंत
सुचेल कविता शब्दगंधी
असू दे अंतरा तिचा
तुझ्यातला सुगंधी.....!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८ मे २०२२







अंतरीचा अवकाश...

भवतालच्या आभाळाला
घालत असता घेरा
स्वतःतील अवकाशालाही
मारून घ्यावा फेरा

अंतरीच्या अवकाशाशी
बोलत रहावे सारे
भवतालच्या आभाळाला मग
द्यावेत उजेड तारे....

उजेड वाटून घ्यावा
अंधार दाटत नाही
एकांताचे भय ही मग
अंतरास वाटत नाही...


(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८ मे २०२२














सृजनाभास...


 

या सोनचोची
चिमण्यांची
अगम्य
गोंदणभाषा घेवून
मी माळ तुडवत
निघालो आहे
सांजशामी दिशेला..

एकेक मातीचे थर
भाजून घेताहेत राब
हसत हसत
आणी माझे शब्द
शिवशिवताहेत
सृजनाचे देवधानबिज
अर्पिण्यास...

'ओलाव्या'तुझा मगदूर
हवाय!!
तुझे भरकटणारे ढग
विसावू देत
या अवकाशात आता..
माळही वेढला जातोय
तुझ्या कंचहिरव्या
सृजन आभासात...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७ मे २०२२












Saturday, May 7, 2022

सांजदाटला प्रहर .....

जाणू तुला कसे?
तु भासाचे पालव
माझ्या बिजातील वृक्षी
तु बहर खुलव

देवोनिया तुला
वृक्षाचा रंग
राखावा मनात
तुझ्या बहराचा संग

शब्दसखे! वाहतो
आठवांचा वारा
दे शब्दांच्या चोचीस
तुझा भाव चारा

होवूनिया झाड
मी उन्हाच्या पावली
धारतो फांदीवर
तुझ्या सांजेची सावली

धाड एक पक्षी
देवोनिया गीत
मी शिकवेन त्याला
बहराची रित

नित्य खुलतो येथे
तुझ्या शब्दांचा बहर
तुझ्या कवेत फुलझड
सांजदाटला प्रहर..!
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७ मे २०२२












Thursday, May 5, 2022

अथांग...

अक्षराच्या वळचणीला
भाव तुझा मी टांगला
अनुस्वारही माझा
तुझ्या संगाने अथांगला...

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५ मे २०२२







एकतारी..

नयनाच्या गर्ततळाशी
प्रतिमेचा दाटे सागर
पापण्यांच्या दाराआड
आठवणींचा जागर

गर्द जाहले क्षण
स्पर्शाचा कापूर जळे
दुःख अनामिक माझे
जोजवते खोल तळे

पंचतत्वी कसला जोग?
आत्म्यावर भार पडतो
आत्म्याच्या भावकुळीचा
जिव तुझ्यावर जडतो

ठेवा अंतरीचा
झरतो आत खोल
शब्दाने माझ्या होते
तुझेपण अनमोल

येते लहर जराशी
अल्लड होउन दारी
मी आत्मधूनीची छेडता
मुक एकतारी!!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५ मे २०२२







Wednesday, May 4, 2022

शब्दव्याकुळी...

निसटत्या स्पर्शगंधाचे
काढत निघता माग
स्वप्नास माझ्या ये
रातीत हळवी जाग

चंद्र मंदावे नभी
चांदण्यात बावर दाटे
गंध तुझा बिलगाया
येतो फुलांच्या वाटे

अंधाराच्या अबीराचे
रंग उशाशी साचले
शब्द बघ !स्फटिकाचे
मी कविते साठी वेचले

वाचता माझे शब्द
गाभा-यास फुटते पालवी
अभंग जणू भगवंता
भेटण्या ऊरी बोलवी

शब्दव्याकुळी सुरांचे
हे तरल भावगाणे
किती तुला भावते
शब्दांचा देव जाणे!

मी अर्पत जातो नित्य
माझे शब्दफुल
तुला पडते मध्यरात्री
स्वप्नांची रंगीत भुल....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
४ मे २०२२










Tuesday, May 3, 2022

सुबक भुल...

चेहरा मी तुझा
कवितेतुन सांधावा
जिव माझा रूपक
शब्दांनी बांधावा

अनावर प्रतिमांची
हो सुबक मांडणी
शिर्षकात उगवून यावी
तुझ्यातली चांदणी

हर एक शब्दाने
प्राचिन ॠचा व्हावे
कवितेत रूजलेले
मी तुला पहावे

ही रूजवात अशी
पुन्हा अंतरी फुलावी
कवितेस तु, तुला कविता
नित्य निरंतर भुलावी...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३ मे २०२२

ऋतूभान

थेंब थेंब तुटतो
पाऊस एकला रानी
ओले पाऊलठसे झरती
मातीत अनवाणी

हे गर्द काळे तिट
ढगास कोण लावले?
मातीच्या आर्त हाकेला
तुषार ..धावले..पावले

मी तुषार घेवून थोडे
मातीस केले दान
झाडास तुझ्या का
त्यानेच हिरवे ॠतुभान?
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३ मे २०२२



बहरदिशा....

कोण उभे प्रतिक्षारत
माझी वाट पाहे?
की बहर असा हृदयाचा
तुझ्या दिशेला वाहे.....

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३ मे २०२२


Sunday, May 1, 2022

वचनभंग..!

निघून गेलो आपण
मन मागे राहीले
आत्म्याने विव्हल व्हावे
व्याकुळ असे तु पाहिले

चेह-याचा आभास दाटला
चेह-याच्या माझ्या भोवती
श्वासांनी तुझ्या भेट घ्यावी
श्वासांची माझ्या धावती

हे फुल कसले उमलले?
शहरात हाकांचे रस्ते
जात्या पावलातुन तु मजकडे
निघते अलवार ..आस्ते!

मी स्तब्ध उभा तेथेच
जेथे तु सोडले होते
न भेटण्याचे वचन कितीदा
असेच मोडले होते!!!

(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२ मे २०२२





अंतरी.....

मी प्रश्न घेवून बसतो
अवघड एकांत वेळी
तु खेळून जाते पुन्हा
आठवणीची खेळी

मी दिप लावत नाही
अंधार बिलगत असता
चांदण्यातुन टिपत बसतो
चेहरा तुझा हसता

तु येता येत नाही
या अवघड काळीज वेळी
मी चंद्र उदासून लावतो
अवकाशाच्या भाळी....

जेथे अवकाशाला
जमीन अलगद भेटते
नजर स्थिरावून तेथे
अंतरी अज्ञात तुटते....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१ मे २०२२

स्थिर तारा....

नसते मलाही काही
नजरेतुन बोलून देणे
तरीही तु व्यापते
पापणीचे सारे कोने

असते मला व्हायचे
मुक्त संधेतला वारा
पण तुझ्या अवकाशाचा
मी होतो स्थिर तारा.....
(Pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१ मे २०२२

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...