शब्दांचे कुळ
आणी कवितेचे मुळ
बोटांनी रेखावी रोज
उडती नाजुक धुळ
अरण्यउजेडात चाले
तारकांची नयनभाषा
अनेकपदरी महावस्त्राची
ही लक्तरी अभिलाषा
चंद्राआड दडतो
अंधार गर्द जसा
उजेडाचे अर्ध्य देतो माझा
चंदन उगवी पसा
रातकीडे देती
नादाचे इशारे
राहून जाती मागे
शब्दांचे पसारे
सुखाच्या गुंगीत
गाव निजून जातो
दवबिंदूच्या वर्षावात
चांद भिजून जातो
मी ओलदाटके शब्द
माळावर पसरी
नदीच येते वाहून
भिजून जाई ओसरी
मी कोणाच्या आत्म्याचे
रंग सांडत असतो
नयनातील मुक आर्जवाची
उतरंड मांडत असतो
शब्दाच्या कुंचल्याची
हौस फिटत नाही
बांधल्या शब्दांची विण
कवितेलाही सुटत नाही
मी लिहीत जातो एकले
माळ दाटले गाणे
तुला स्पर्शिल्या वा-याने
मोहरून जाती पाने
तु गित नवे नित्य
माझ्या शब्दांना बिलगणारे
तु अनंत हळवे दिप
अंधारात शिलगणारे
Pr@t@p
" रचनापर्व "
31/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com






















