Sunday, July 5, 2020

पुरता अभंग होतो.....



निळाशार अंधार
एक स्तब्ध प्रकाशरेघ
ढगाच्या काळजाला
एक सोनेरी भेग

चंदनवनाचे फुलोरे
होतो वारा मंद
मी बांधतो मनाशी माझ्या
तुझा रेशीमगाठी बंध

उल्काफुलांचा रंगात
पेटती प्रतिक्षेच्या मशाली
पाखरगितांच्या सुरात
मी शोधतो खुशाली

किरट्या सुरात रातकीडे
करतात जेंव्हा कांगावा
उगवता चांद देतो
सांज थकल्याचा सांगावा

तु लावताना दिवा
वातीला भरून येते
हाक उजेडाची मनाला
तितक्या दुरून येते

सताड उघडी खिडकी
दिसती चांदण्याचे सडे
भरल्या आभाळाखाली
काळजाला तडे

मी हाक तुला का द्यावी?
मन तुझे का बहिरे?
चांदण्याच्या आत्म्याला
दुःख प्रकाशी गहिरे

गायगळ्याची घंटा
वासराचा हंबर
खिडकीत तुझ्या थबके
माझे चांदणरंगी अंबर

मुक्या गिताची गाथा
नित्य नदीत बुडते
माझ्या शब्दांचे मन
तुझ्या प्रतिमेत अडते

नित्य सांजेला मी
तुझा निरंगी रंग देतो
कवितेचा एकेक शब्द
मग पुरता अभंग होतो..
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
5/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com




























No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...