आभाळकाहूर दाटले
की जिव माळ होतो
शब्दाचा मग माझ्या
अभंगी टाळ होतो
मी गुंफतो शब्दओव्या
मन भरून येते
झडून गेले पिंपळपान
पार फिरून येते
वेशीचे दगड बोडके
देती गावावर लक्ष
उगाच वारा वाहतो
होवून गंध दक्ष
तरीही त्याला भारावते
सुगंध फुटली दिशा
फकिराच्या गळ्यास लगडे
दुव्याची सांजभाषा
रातप्रतिक्षेचे ओंजळदान
मी सांजेस वाहून देतो
अंधारनेसल्या चांदण्याला
नदीकाठी पाहून घेतो
माळ मुका पाठीवर
मी नदी पाहत बसतो
एक ओला काठ तीचा
मनात वाहत असतो
ही नदी, हा माळ
आणी हे चांदणबन
तु, तुझी आठवण
आणी प्रतिक्षारत मन
दिवेलागण होते तिकडे
माळावर अंधार साचतो
मनाचे गुपीत माझ्या
चांद नभीचा वाचतो......!!
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
13/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment