Friday, July 17, 2020

रंग हातचा सांडत नाही..


धुंदाळल्या पुनवराती
अंधाराचे धुके
पाखरांचे पंख गलबली
होवून जाती मुके

या मातीच्या कणाला
ही उब कसली लागते
हाताच्या तळव्याचे
स्पर्श होती जागते

दुर पसरले खुले रान
मातीवर चंद्र सांडतो
मी निःश्वासाचे चांदणे
जमिनीवर मांडतो

ही थकली हवा
हा मंद अंधार हलता
चंद्राला हा कसला
रंग लागला भलता

तुझ्या सावलीचे शिल्प
मनात माझ्या दाटे
फुलझडीच्या दुःखाने
उदास होती फाटे

तळव्यास लागली माती
गंध तुझा पेरते
वाट एकली पावली
माळ सारा भारते

मी माळ दाटल्या रातीचे
रंग उधळून टाकी
तुझा अमिट रंग
हातात राहतो बाकी

मी ताडून पाहतो पुन्हा
पुनव चंद्राचा रंग
हाताचा रंग उजळ
मी रातप्रहरी दंग !!!

मी टाळुन देतो तुलना
चंद्राशी भांडत नाही
वाहून जाते पुनवरात
रंग हातचा सांडत नाही..
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
16/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com







No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...