Wednesday, July 22, 2020

दुर पडत्या पावसाचा......


हुकलेला पाऊस बनून
ढगाचा सुरू असतो त्रागा
मी जपत असतो तेंव्हा
फुल फुलण्याच्या जागा

फुलपसा-याच्या राहुटीत
कल्लोळ बहरगंधी
फुलांच्या आत्म्याला
ये गंध चिरेबंदी

ही देखणी अलंकारशाळा
हिरवे गालीचे पसरलेले
काहुर दाटल्या वाटा
पाऊल मार्ग विसरलेले

फुलांच्या जगण्यामरणांचे ॠतु
अजब कल्लोळात बुडती
मोरपीसाचे चटके सोसत
कोणाचे बहर खुडती

मी पेरत असतो माळावर
हिरवी एक बाग
पावसाला लागते मग
कसली कोसळ आग?

तो उधाणून पडतो
तुला भिजवत असतो
मी वाटाच्या अंतःकरणी
ओला चिखल सजवत असतो

तु आलीसच ढगासम तर..
पावसाला येईल भरते
ही हवाधुन नमलेली
का ऊगाच थरथर करते?

दुर पडत्या पावसाचा
तु चेहरा ओला हिरवा
मी मोहरून घेतो डोळे
ॠतु पाहून तुझा बरवा

मी धारून घ्यावे तुला
अंगभर झेलत पाऊस सरी
ओठाला बिलगुन जाईल
अधिर ओली बासरी

तु ढगाच्या नजरेने
थेंब मातीस पाहणारा
मी कंच हिरवा श्रावण
मातीच्या कुशीत वाहणारा.....
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
23/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com












No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...