Tuesday, July 28, 2020

चंद्रतळाची हाक....



आत्ताच चांदणे पेटले
आठवणीची काहिली
कळ्यांच्या घालमेलीस
रास फुलांची वाहिली

अंधाराच्या सागरावर
उजेडाचे गलबत
मुक मनात चाले
आठवणीचे खलबत

मी साज कळ्यांचे पाही
झाड अवघे स्तब्ध
चांदण्याच्या आभाळावर
चंद्र होतो लुब्ध

नयनाच्या दंतकथेचे
गवळण गाई गाणे
स्वप्नाच्या लाजाळुची
मिटून जाती पाने

तु दुर असता चंद्र
ढगाच्या पाउलवाटा
धुकेरी ढगाच्या
चंदेरी आर्त लाटा

ढळत असतो बहराचा
अलगद पाउलतोल
कोसळत्या फुलांचे
निनाद हृदयी खोल

मी हवाधून शब्दांची
ढगात खोल पुरतो
सजून आला चांदवा
मुक धुक्यात झुरतो

हाकांचे फुलोरे मी
रानावनात पेरी
गावाच्या काळजाला
चकोराची उत्सुक फेरी

चंद्रतळाशी कसली
हाक दाटून येते?
उत्सुक झाल्या फांदीवर
रातराणी थाटून जाते...
(Pr@t@p)
"रचनापर्व"
29/7/2020
Blog# prataprachana.blogspot.co

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...