Friday, July 24, 2020

आत्म्याची तुला मुभा....



वैशाखी फुलला गुलमोहर
श्रावणात बहराविन उभा
पावसाच्या थेंबाखाली
त्याची ओली शोकसभा

परडीभर फुले घेउन जा
माझ्या ओंजळीत फुललेले
येईल उमाळ्याचा गंध
जागवेल भुललेले

पात्र बदलत्या नद्यांनी
पाऊस तरी का झेलावा?
ठार कोरड्या आत्म्यास
असला कसला ओलावा

तुझ्या स्वप्नांनाही स्पर्शू नये
ढग इतके दुर गेले
डोंगराच्या कडेकपारीस
आळवांचे पुर ओले

रांजणभर पाण्याला
न येई सागर भान
सुरांच्या बंदिशीवर
हा कसला मुक ताण?

नभनक्षीचे मोर
तुझ्या शिवारी नाचले
गेले उडून मोर
पंखावरील डोळे वाचले

सारेच दाटून आले म्हणून
पाऊस पडतोच असे नाही
ढगाच्या काळजालाही
मर्यादा असतात काही

तरीही! तुझे शिवार
जर देईलच श्रावणपुकार
तुझ्या सुकल्या गुलमोहराला
ओंजळफुले देतील आकार

बहर सर्वांनाच भेटतो
पण हंगाम असती नवे
माझ्या फुलल्या फांदीवर
तुझ्या नजरेचे थकले थवे

हवा तर हा ही श्रावण घे!
गुलमोहर फुलेल ऊभा
चिखल पुन्हा पेरण्या
आत्म्याची तुला मुभा!!!
(आदरणीय कविवर्य 'ग्रेस' सरांच्या शब्दधुनीतून !!!)
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
24/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com












No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...