Tuesday, July 14, 2020

वाहिल्या चांदण्याचे सडे


अंधाराच्या कुशीत 
जेंव्हा गाव निजले होते
पसाभर चांदणे तुझ्या
छतावर थिजले होते

दिवा जागत होता
देत उजेडी पहारा
एकल्या झाडाला होता
टेकडीचा सहारा

चांद वितळत होता
काजवे फिरत होते
रातराणीच्या कळ्यांचे
गंध झुरत होते

स्वप्नांच्या झुंडी
येत होत्या चालून
हसत होते डोळे
बंद पापण्या खालून

हवा गात होती
स्पर्शाचे शितल गाणे
डुलत होती संथ
निजली पिंपळपाने

शांत होते सारे
रात शिलगत होती
शिथील झाल्या तनाला
झोप बिलगत होती

माळ एकला जागा
भरल्या चंद्राखाली
चंद्र एकला माझा
एकल मनास बोली

मी वाहील्या चांदण्याचे
तुझ्या छतावर सडे
रातीच्या काळजावर
तुटत्या ता-याचे ओरखडे

मी गित उद्याचे गातो
गाव निजल्या वेळी
लख्ख तुला होते
दिवा विझल्या वेळी

गावास देवून वळसा
मी निघतो अंधार तुडवत
सुर्य चढत असतो
तुझी रात प्रकाशी बुडवत.....

मी रातीचा चांद तुझा
सुर्यास अर्पून देतो
आशेच्या प्रकाशात माझ्या
तुझा अंधार झिरपून जातो....
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
14/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com














No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...