Monday, July 20, 2020

श्रावण राधा...



बहरती शब्दांच्या
ओल्या श्रावणसरी
नयनी प्रकाश कोरडा
ओल दाटते उरी

फुलांचे आत्मेही ओले
उन स्पर्शत राहते
रंगाचे सोहळे हिरवे
घन इंद्रधनुतुन पाहते

मी ही पाहतो तुझ्या
हिरव्या श्रावणाचे सोहळे
सजती माळरानावर
भाव मनाचे कोवळे

चिखल गातो मुक्याने
उगवत्या पिकाचे गाणे
कोसळत्या थेंबाना
कुशीत घेती पाने

मन फुलते रान होते
शब्दांना हिरवा रंग
कवितेच्या हृदयाला ये
तुझा हळवा भावतरंग

मी उन पावसाचे
स्पर्श पाहत असतो
नदीच्या काळीजकाठावर
श्रावण वाहत असतो

सारेच झाले हिरवे
काळ्या मातीसही हिरवा रंग
राधेच्या ओल्या पायरवाने
बासरी होते दंग

माळरानाच्या कोप-यावर
ती धुन ही हिरवी दिसते
पावसाच्या थेंबाला बिलगुन
मातीही हर्षून हसते

सुर नभाला भिडतो
माळ व्याकुळ होतो
भरला श्रावण राधा
जिव गोकुळ होतो
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
20/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com





















No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...