Thursday, July 16, 2020

हिरवी सय....


शब्दमुके भाव
तरीही सारे कळते
धरेच्या हाकेसाठी
आभाळ जसे गळते

फुलांच्या हृदयावर
रंगाची नाजुकनक्षी
ओल्या सरीस असते
वा-याची झुळुक साक्षी

हाक ओली घुमते
माळास येती शहारे
मनाच्या ढगावर कसले
हे सरींचे पहारे

ढग दाटून येते ईकडे
तिकडे सरीला उधाण
बेभान झाल्या पावसाला
ओलदाटले भान

मी पाऊस होवून ऐकी
धरतीच्या आर्जवी हाका
मनात वसला असतो
एक 'पावश्या 'मुका

तु नसतानाचा पाऊस
ओला वाटत नाही
अवकाशाच्या गर्द कपारी
ढग दाटत नाही

मी शोधत निघतो माळावर
ढगांचे पाऊल ठसे
तुझ्या ढगाला असते
वाहत्या वा-याचे पिसे

मी अवचित थेंब हातावर
अलगद धरून घेतो
एक थेंबाच्या ओलीने
शिवार भरून घेतो

तुझा जाता पाऊस रिता
आता वाटत नाही भय
मातीला येत नाही
दाटून हिरवी सय

तुझ्या पावसाला आता
मी सर मागत नाही
तुझा पाऊसही तसा
ढगाला जागत नाही....

येईल असाही हंगाम
शिवार फितुर होईल
ओल दाटला पाऊस
जेंव्हा पडण्या आतुर होईल...
(प्रताप)
16/7/2020


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...