Thursday, July 23, 2020

खिडकीला फितुरतो......


झडीचा पाऊस
घडीची ओल
सांजकळीचा ढळतो
सरीतुन तोल

निर्गंध चांदणलिपी
डगाआड काळ्या
चांदणचमकीने विज
बेताल वाजवी टाळ्या

माजघरातील उब
मठात पेटते धुनी
मी शिकत असतो भाषा
पावसाची प्राचीन जुनी

चांद ऊगवत नाही
दिवा पेटत नाही
पावसाच्या उधाणाचे
कोडे सुटत नाही

खिडकीच्या तावदानाला
वारा धडकत असतो
वहीत वाळला गुलाब
मुक तडकत असतो

अंधाराच्या आत्म्याला
विज बिलगत असते
रातीच्या साथीला
ढग शिलगत असते

पावसाळी आगीचे
उधाण व्याकुळ गाणे
मुक भिजत राहती
रातराणीची हिरवी पाने

पाऊस थांबत नाही
मी हालत नाही
चांद वितळला ढगातुन
चांदणे खुलत नाही

मी तुझ्या खिडकीलाही
देतो माझे पाऊस दान
वाळल्या गुलाबाला पाहते
रातराणीचे पान

रातराणीचा गंध मग
गुलाबात उतरतो
माझा पाऊस वेडा
तुझ्या खिडकीला फितुरतो.....
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
24/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com






No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...