Monday, July 27, 2020

प्रतिक्षारत चोचीला....


पडवीत सांज थबके
अंधाराला पाहून
तडकत्या आठवणीचे
झरे जाती वाहून

माथ्याच्या भावप्रदेशावर
हलके एक टिंब
मी अंधाराच्या दर्पणात
एक शोधी प्रतिबिंब 

रानफुलाचे बहर 
कोणाचा तोंडवळा
अंधाराला चांदण्याचा
असला कसला लळा?

शेवंतीफुलांचे रंग 
हलकेच विरून जाती
मी चांद धारण करतो
अंधाराच्या हाती

तरारून पाणी जरी 
नयनी कुणाच्या आले
हिशोब कसले घ्यावे
जे बहर निघून गेले

स्वप्नांच्या जाळ्या
भावनेचे ओले तळे
माळावरील देवळात
दिप एकला जळे

औदूंबर निश्चल असतो
पाखरांचे पंख बेईमानी
निघून जाती थवे
मागे वेशीच्या कमानी

सांजेने किती करावे
आसुस दृष्टी रंजन
रातीच्या डोळ्याला
उजेडाचे अंजन

किती लिहाव्या गाथा
लाटा नटून येती
शब्दास लिपटते माझ्या
इंद्रायणीची माती

रातीच्या काळजावर 
मी लिहतो प्रकाश गाणे
प्रतिक्षारत चोचीला
सुखाचे चार दाणे....
♡pr@t@p♡
 "रचनापर्व"
  27/7/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...