Tuesday, January 31, 2023

मिलनसुक्त....

शहर कसे लांघु?
पंखात धुके दाटते
तुझ्या निर्धारी पावलांना
आर्त असे का फुटते?

धुकेही पडत नाही
तरीही भास व्यापतो
भाव मनीचा माझा
आरक्ती आड लपतो 

तु राख ना फुले
मोसम पानगळीचा
मी अनावर का होऊ
तुझ्या पायतळीचा?

येशील तु कधी लगबग
होउन हळवी हाक
तमास माझ्या बिलगेल
तुझी पोवळी झाक

धुके विरेल अलवार 
पंख होतील  मुक्त
रेखीव तुझ्या चेहरी
मग उमटेल मिलनसुक्त.....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.२.२०२३








Monday, January 30, 2023

सारंगी आण..


भाव कस्तुरी माझा
कविता कृष्णसार
धुंद दाटला गंध
मनात अपरंपार

धाव अनावर चाले
गर्द तरुची दाटी
राधा विकल विव्हल
बिलगे कान्हा ओठी

गुंजते हाक कुणाची
सारंग धुंडतो माग
वातीच्या अंतःकरणी
उजेड जळीची बाग

मी सावध गती गाठून
टाळतो तुझे बाण
पारध्यास देत अलवार
शब्दाची निरागस आण....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३०.१.२०२३






 





Sunday, January 29, 2023

धाराया.....



मला सुर तुटवत नाही
झाडाच्या सळसळीचा
शाप अनावर जडतो
झाडावर पर्णगळीचा

पान झडते निपचित
धरतीच्या वक्षी बिलगे
गर्द धुकेरी शिशिरात
झाडांचा आत्मा विलगे

कोण येते दुरुन
बनुन वसंत हाक?
ओसाडल्या वृक्षांना
देत चैत्रपालवी झाक

तु ही यावे तसेच
बहराची उधळत छाया
माझे अभयारण्य ओसाड
हुरहुरते तुज धाराया......


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२९.१.२०२३








 


  






Thursday, January 26, 2023

मिटली वही


मी वही मिटून ठेवली
तुला अजून जाणून घेण्या
मी मिटले माझे डोळे
आणीक समीप पाहण्या

खोल उतरून गाठतो
मी शिखर तुझ्या असण्याचे
ठसे मिटवत मी निघतो
तु आसपास नसण्याचे

साधते एखाद कविता
तुझी सय दाटता
मी अजून व्याकुळ होतो
दुराव्याचे भय वाटता

मी मुकमुक्याने बोलतो
तु काहीच बोलत नसता
मी पान वहीचे मिटवतो
मन खोलत असता....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.१.२०२३


आतुर अगम्य


वेशीतले तम हसते
पेटता देव्हा-यातील दिवे
चांदथडीच्या अवकाशी
मी ही पेरतो चांदणथवे

त्या व्याकुळ अंधारघडीला
शब्दांचे भय सरते
वात तुझ्या समईची
सये! का उगी थरथरते...?

घे पसाभर उजेड!
अंधार मुक जळण्या
मी युगायुगाचे अगम्य!
आतुर तुला कळण्या...

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.१.२०२३
फोटो # नेटवरून साभार 









शब्दाआड


फकीर बांधतो गाठी
उसवत जाते झोळी
अंधार हळुच विरतो
चंद्र उगवल्या वेळी

हाक कुण्या जन्माची
नक्षत्र मांडते नभी
जाणीव त्या हाकेची
या शब्दाआड उभी...

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६.१.२०२३






Monday, January 23, 2023

वज्रलेप...



थवा निघाला सजने
ओलांडून नयन तळे
मावळतीच्या ओटीला
दिनकर का मंद जळे?

निरोप हवेवर येतील
देत मातीस पुकारा
होईल गाव सजग का
ऐकून आर्त हाकारा

तु थव्यास उतरण्या माझ्या
ठेवशील का जागा?
तुझ्या हातावर उतरण्या
तो टाळत निघतो बागा

घे विचारून खुशाली
साजन तुझा गं कोठे?
होईल खुशालून हृदय
सुपा एवढे मोठे

नकोस टाकु दाणा
देऊ नकोस पाणी
पदरावर उतरून घे
थव्याची व्याकुळ गाणी

रित्या पंखाचा थवा
घेईल गगन झेप
चोचीत तुझ्या खुशालीचा
वाहेल वज्रलेप....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३.१.२०२३









लोकगाथा...

दिगंत लांघण्या निघती
पंख पसरून बगळे
अवकाश उधाणून येते
रंग उधळत सगळे

पाहते एक कोणी
होऊन केविलवाणे
व्याकुळ त्या नजरेचे
झरते आर्त गाणे

शिल्लक मागे ठेवून
का घ्यावी झेप कोणी?
दुःख मुक्याने देते
उरल्या एकांताला वाणी

भरून येते अगम्य
एक उदासी खिन्न
सिध्दार्थ तथागतगामी..
आक्रोशे जसा छन्न!

मागे राहतो आभास
निघून कोणी जाता
उरल्या पुसट खुणांची
मी लिहतो लोकगाथा!!

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३.१.२०२३






आभास जुळेपण


अंधार सोसण्यापुर्वी
ते फुलशरण होते
पंखावरल्या रंगाचे
काळोखी हरण होते

रंग चांदण्या घेती
फुलपाखरू निजता
तुकडा त्याचा चमकवे
काजवाही न विझता

टिमटिमत्या सुर्याखाली
ते चुंबते फुलकळ्याना
गीत सोपवून निजते
व्याकुळ भाव गळ्यांना

ते गीत रंगीत घेवून
मी शोधतो नभ निळेपण
मी शब्दावर धारून घेतो
तुझे आभास जुळेपण


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३.१.२०२३





Sunday, January 22, 2023

नाजूक धडे



मी डकवतो अवकाशी
नक्षत्राचा दिवा
खिडकीत उतरतो माझ्या
चांदण्याचा धवल थवा

मी फितवतो हवेस
देवुन तुझा दाखला
प्रतिक्षारत रातीस
चांद मजसम एकला

हवा देते तुझा गंध
शब्दास बहर येतो
माझ्या व्याकुळ शब्दांचा
मग काव्य प्रहर होतो

सांडतो मी मनातले
आर्त शब्द सडे
चांदणे गिरवते मग
कवितेचे नाजुक धडे...

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२.१.२०२३




प्रितीतुळस...


समईत रात बावरे
उजेड सखीच्या दारी
पाऊलवाटेस तडे तरीही
गात निघते वारी

भगवंत कसा हा असला
वेदनेत हसतो शांत
हाक अभंग गाथेतली
तरी होई न क्लांत

कल्लोळ डोळाभर साचे
भगवंत नयनी वाहे
कळस शिखरावरला
अनवाणी पावले पाहे

पावलांचे धुलिकण
गाभारा हाती घेतो
अवघ्या वारीचा मग
बरवा भगवंत होतो

उरते ना काही वेगळे
पायरी कळस होते
कवितेच्या शब्दाखाली
प्रितीची तुळस होते

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२.१.२०२३








चैत्र पेरणी


पान गिरकुन कोसळे
झाड त्यागते काया
ओक्या झाडावरती कोणी
पसरावी हिरवी माया?

पाखरांचे थवे कसे
विसावतील मग फांदी?
शिशिराच्या कानी रे!
द्या कोणी चैत्र नांदी

कळ्यांना कसे पडावे
स्वप्न फुलखुलीचे...?
उतरावे कसे चेटूक
व्याकुळ शिशिर भुलीचे?

दे ना या हवेस
तुझे बहर तु सारे...
माझ्याही अंतरी
चैत्र पेरणारे.....!!

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२.१.२०२३






Saturday, January 21, 2023

क्रुसी धिर..


चर्च भिंतीवरली प्रार्थना
कोण कलंदर गातो?
मी येशू मुखातील करूणेचे
तु पाळले वचन होतो

दुःख अमाप क्रुसावर
मी खरेच रोखून धरू?
की पुनरुत्थानासाठी प्रेमाच्या
तुझी प्रतिक्षा करू?

सांग ! हे कसले खिळे
रूतताहेत सुकुमार हाती?
काटेरी मुकुट आठवांचे
का देताहे तु माथी?

मी असेच का तुझे
सारे दोष वाहू?
अन् मलाच मी कितीदा
क्रुसावर व्याकुळ पाहू?

गा! तु ही कधी माझ्या
दुःखाचे व्याकुळ गाणे
मग क्रुस आठवांचा
चुंबेन मी धिराने.....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.१.२०२३









Friday, January 20, 2023

पुकार....


शोधतो आहे
अज्ञात शहर मी
वसते अंतरातले
जेथे गाव माझे...

जरी पुसतो आहे मी
माझ्याच गुलाबी खुणा
पुकारेल मुक्याने कोणी
एकट्यात नाव माझे....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.१.२०२३









प्रेषिता


रोपतो आहे मी
शब्दांची आमराई
लगडेल नक्की
कवीतेचा गोडवा

चाखेल कोणी
अज्ञात प्रेषिता
पंख तिचे रे कोणी
मर्यादेचे सोडवा.....!


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.१.२०२३






सुर्य तुझे माझे


पेटतो आहे मी ,
दिव्याच्या अंतरी
जाळु कशास तेंव्हा
शिलगले शब्द माझे...

प्राशतो आहे मी
अश्रु प्रेषिताचे
सुकवू कशास तेंव्हा
प्रतिक्षारत नयन माझे...

जोजवतो आहे मी
भार आठवांचे
वाया कशास घालू
हसरे वसंत ताजे...

चाललो आहे मी
निनावी दिशेला
कशास खोडा घालून
रोखु पाय माझे....

झेलतो आहे मी
आघात दुराव्याचे
कशास झाकुन देवू
घायाळ हृदय माझे

ऐकतो आहे मी
यशोधरेची करूण हाक
कशास थरथरू देवू
आर्जवी गीत माझे...

भेटतो आहे मी
माझ्यातल्या तुला
कशास संपवू तुझे
शोध आतल्या माझे...

झाकाळतो आहे मी
साचत्या अंधार राती
कशास रोखुन देवू
सुर्य तुझे माझे....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२१.१.२०२३





Thursday, January 19, 2023

भिजकी वही


बघ हाक परत आली
दार तुझे की बंद
सनई सुर त्यागते
झुळुकीवरती मंद

नसतोच कधी माझा
पसा तुझ्या ओसरी
मी सजवून काळजात
घेतो कळ एक हासरी

माझ्या शब्दांशी झगडते
तुझे आठव गाणे
मी दुःखभराने भरतो
भिजक्या वहीची पाने....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.१.२०२३


दिठीची आस

ही गर्दी आत कसली
असता ठार एकले?
शहाणे मौन माझे
त्याने आकांत झाकले

गाव शांत निजता
मी निघतो दुरदेशी
दिवे मंद आठवांचे
पेटवत दर वेशी

मलूल चांदण्याला
मग आग लागे
कुस कोण बदलते
झुळुकीच्या चाहुली मागे?

रित्या अंतःपुरात
होतो कुणाचा धावा?
माझ्या पावलामागे
तुझा पायरव यावा

मी गाठावी सम
आभासी तुझ्या मिठीची
पुरेल का आस
व्याकुळ या दिठीची?

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९.१.२०२३








Monday, January 16, 2023

हिरवी बहर भुल


निनाद येती थव्याथव्याने
मोहरून येते झाड
तुझ्या कुळातील वसंत
रंगीत फांदिवरती धाड

उभे कधीचे झाड एकले
झेलत वादळ वारा
टिपून शिशिर ;दे चैत्र
अंतरी थिरकणारा

झाडाच्या अंतरी
खोदून घे तु ढोली
निजवून दे तु अंतरी
हाक हिरवी ओली

हिरव्या ओल्या हाकांचे
मी सजवेन अनेक सोहळे
उडत्या पाखरासवे पाठवेन
निरोप तुला मी पोवळे

माझ्या हाकांचे खंडातर
हृदयी तुझ्या बिलगेल
एकेक आर्त फुल मग
फांदिवरूनी ओघळेल

होईल फुलांचा सडा
तु उचलून घेशील फुल
दोघांनाही भारून जाईल
हिरवी बहर भुल....


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१६.१.२०२३


Sunday, January 15, 2023

काळीजवेडा...


पाहतो वाट उद्याची
हा पक्षी मंत्रवेळी
मनी आठवांची
ब्रम्हानंदी टाळी

हसतो काळीजवेडा
दुःख लपवून सारे
त्याच्या सुखाखातर
मंद लकाकती तारे.....


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५.१.२०२३

Friday, January 13, 2023

विनाचाहूल.....


तु निज कुशिला सये
साजन असता जागा
करेल निरव कशाला
चांदण्यावर उगाच त्रागा

काळोख दुर उभा तो
मजसम मुक एकला
क्लांत होऊन चांद ही
धरतीच्या कुशीस टेकला

कशास हसते निद्रेत
सटवी का काही लिहते?
माहेरची नदी तुझ्या का
दुर सागरा वाहते?

समईला होते बाधा
अंधार हळु जळताना
मी विनाचाहूल विरतो
रात हळु ढळताना...

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३.१.२०२३







एकेक्या झुळुकीवाटे...

चांद ओलांडून निघते
तुझ्या गावची हवा
झाडांच्या फांदी निजलेला
थकलेला स्वप्नथवा

देशील एक हाक का
काहूर दाटल्या वेळी?
की निज समेटून घेशि?
तांबडे फुटल्या वेळी?

थरकापून झाड जाते
थवा दिगंती जाता
झाड गोंदवून घेते
पाखरांची आठव गाथा

एकेका आठव कळीचे
फांदिवर फुल होते
झाडाच्या तनूवर सजती
बहराची झुल होते

असे बहरतो बहर
आठवांचा मोसम दाटे
मी थव्याथव्याने भेटतो
एकेक्या झुळुकीवाटे.....


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३.१.२०२३







नयनथेंब...


मी दुर जात नाही
आतल्या आत तुटतो
होऊन बांध अनावर
हृदयास कुणाच्या फुटतो?

अपुर्वाई कसली हुंदक्याची
उमाळा न दिसे मजला
थेंब नयनीचा माझ्या
हिमालयात मुक थिजला!!


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३.१.२०२३



Wednesday, January 11, 2023

मुक्ती दिक्षा...


तु नाकारावे असे
असेल नक्की काही
कोण पिंपळाखाली दे
विरक्तीची द्वाही?

मन सिध्दार्थ होते
मागे सुटते यशोधरा
झाक शामल तरीही
मुक या अंबरा

कसे त्यागते कोणी
रोहिणी नदीकिनारे?
क्षणात थिटे पाडते
राजप्रासादी मनोरे

मी ही सन्यस्त होउन
राजहंस कुशिला मागु?
की हृदय चिरता बाण...
की देवदत्ती वागु?

सुटता सुटत नाही
माझ्या मुक्तिचे कोडे
मी झडली पिंपळपाने
जपून ठेवतो थोडे

मी करूणेने ध्यानस्त होऊन
घेऊ का तुझीच दिक्षा?
काळीज पसरल्या हातांना
देशील कशाची भिक्षा...??

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.१.२०२३





Monday, January 9, 2023

आभास..भेटाया



मी बसलो आहे रिता
घेवून तुझी आस
दारात मुक्याने ठेव तु
तुझा चंदन भास

मी भोगतो आहे तम
एक शब्दही न बोलता
माती गंधीत होते
रातराणी फुल झेलता

मी भिनतो आहे सृष्टीत
आठवत तुझे ते असणे
या आर्तखुल्या ओंजळीस
दे चांदणे तुझे तु उसने

मी पाहतो आहे वाट
गात हाकांच्या ओव्या
आभास तरी धाडशील
क्षणभर...मज...भेटाया?


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९.१.२०२३


Sunday, January 8, 2023

अनमोल दुरावा


तुझ्या आसक्तीची
होते दिवेलागणी
मी सांयप्रार्थनेवेळी
करतो तुझी मागणी

दिवे भरून येती
प्रकाश हळु पसरतो
तमात शब्द पेरून
मी एकटपण विसरतो

मी भरून घेतो ओंजळ
तुझ्या रितेपणाची
मी भोगुन घेतो शिक्षा
व्याकुळ या क्षणांची

तरीही लावत नाही
मी तुजला कसला बोल
तुझा दुरावा ठरतो
असाच.....अनमोल



"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.१.२०२३
















Saturday, January 7, 2023

करूणेचा अभंग


पाहून तुला का वाटे?
परकेपण संपून जाते
तुझ्या हृदयामधले इकडे
स्पंदन कंपून जाते

जरी पाहिले ना समक्ष
वाटते ओळख जुनी
अंतरातला मोह आठवे
निर्मोही शाक्यमुनी

जाताजात नाही
तुझी आभासओढ
मी जादूने व्याकुळ होतो
भेटत नाही तोड.....

लाटेवर उमटून येती
तुझे आभास तरंग
शब्दास बाधतो माझ्या
मग करूणेचा अभंग....



"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७.१.२०२३







Friday, January 6, 2023

पाऊलठसे



शब्द होते
तु नव्हतीस...
पण कुठुन कोण जाणे...??
माझ्या शब्दांचे
माग काढत
त्यांचे अन्वयार्थ लावत
तु आलीस सोनपावली
आणी माझ्या कवितेचे
अंतरंग ढवळलेस..!

आणी.....
.......
माझे शब्द तुझे झाले
त्यांची घडण
तुझ्या पाऊलठशावर
अलवार विसावली....
तुझ्या अंतरात विलीन होऊन
कविता अविभाज्य झाली
तुजपासून....
आणी तु ही तिला
धरलेस हृदयाशी अपार
कवटाळुन..

आणी अचानक
तु म्हणालीस..
"हल्ली मी कवितेपुरतीच!"

यावर माझ्या आतील..
अनंत अजन्मी कविता
हसताहेत बासरीधारी 'शाम' बनून..
तुझ्यातील लटक्या राधेवर....
आणी तुझ्यातला मी
तगमगतो आहे
नव्या कवितेसाठी...

आता.....
शब्दामागील तु
चालते आहेस
प्रितबनाच्या वाटा
आणी माझी कविताच
निघाली आहे तुजमागे
तुझे प्रितबनी पाऊलठसे
कवटाळत.....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
६.१.२०२३

















गुलदस्ती...


हाक तुझी बघ आली
नव्हते धुके जरी
निनाद कंपीत होऊन
स्पंदून आले उरी

हात तुझा ऊंचावून
तु आकाश व्यापले सारे
मी चमकून चांदण झालो
दिवसा न दिसणारे

तु उभी हसतमुखाने
माझ्या प्रेमदत्त वृक्षापुढे
बहराच्या हृदयी गुंजती
आसक्ती चौघडे

शहर तुझे धुकेरी
माझ्या आठवणींची वस्ती
कवितेचा आत्मा माझ्या
होतो रंगीत गुलदस्ती

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
६.१.२०२३



Thursday, January 5, 2023

धुकेभेट


तुझ्या शहराभोवती
धुके असेल
मुक गुमान पडलेले..
दाखवेल तुला ते सारे
माझ्या मनात
घडलेले....

तु जाशील उत्सुकतेने
त्याला डोंगरमाथी
पाहशील....
निःशब्द हाक आर्त
मनोमनी तु
वाहशील??

भेटेल हाकेशी हाक
धुके येईल
दाटून.....
घे तुही मग
मजला
आभासघडीला भेटून

समजेल तुलाही काही
जे सहजी
समजत नाही
परके दुःख जसे की
सहजी
उमजत नाही

थांबशील का तु
क्षणभर ....
माझ्या आभासा साठी...?
देशील तुझे का
गीत....
माझ्या धुक्याच्या ओठी...?

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१.२०२३










धुकेरी पायभेट


तु दिसता मला गवसते
हरवले माझे काही
धुक्यात निनादून येते
प्रेमाची आर्त ग्वाही

धुसर दिशेला स्पष्ट
अंधूकसे काही दिसते
एक निळे फुलपाखरू
फुलाआडून हसते

नजर अशी की आर्त
कोणाची मजवर पडली?
पायभेट की अहिल्येची
जणू रघुनंदनाशी घडली

विरून शिळापण जाता
मुक्तीचे व्यापते धुके
सुर तुला ना परके
बासरीचे कृष्णसखे

गीत मला का सुचले?
तु शब्दही न बोलता
भाव तुझे गुलाबी
शुभ्र धुक्यात मी झेलता....


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१.२०२३











Wednesday, January 4, 2023

मिलनधुके


पळसबनाचे हृदय
ठोका अनाहुत चुके
वेढत असता मजला
तुझे गुलाबी धुके

तु व्याकुळ घडीस माझ्या
दे मिलनाचा जोग
मी भोगुन शिल्लक उरतो
आठवांचा अमिट भोग

धुके बिचारे झुरते
शुभ्र रंगाकाठी
मी स्मित गुलाबी हेरतो
तुझ्या पुकार ओठी

दे गीत नयनास माझ्या
उचल जराशी पापणी
धुक्याच्या काळजावर
थोडी गुलाबी रोपनी

धुक्याला चढू दे
अस्तित्वाचा गुलाबी रंग
पाने सजवून घेतील
पाकळ्यांचे उत्सुक अंग

गंध नभी पसरू दे
धुक्यास आर्त फुटो
कोडे तुझ्या मिलनाचे
अनाहुत आपसुक सुटो

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.१.२०२३


कमलहृदय


धुक्याचा बहर हा
कमळ फुलांची रास
मनास माझ्या बिलगे
गुलाबी मंद सुवास

हे फुल कोणते हसते
असल्या धुकेरी वेळी
कवितेत हुरूपून येती
तुझ्या चंदन ओळी

नजर कशी मी उतरू?
जिव चढता तारा होतो
धुक्यातल्या दुपारी
मी अल्लड वारा होतो

घे स्पर्श या कटाक्षांचे
नयनास फुटली भाषा
धुसर धुक्यास का वाटे
लख्ख तुझी ..आशा...?

तु दिठीस येता बिलगुन
धुके गुलाबी झाले
कमळ फुलांचे हृदयही
सुखात चिंब ओले......


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
४.१.२०२३















Tuesday, January 3, 2023

चांदण तुकडे


अतुट असावा बंध
माझी स्मरणे जप
पिंपळाखाली तुझ्या
चालले माझे तप

मागणे कशास सांगु?
अन्वयार्थ तु लावणे
होईल कधी का बंद
मजला तु भावने?

कशास भुलते माझ्या
बुबळात थिजले पाणी
आणीक ऋचात वाहते
अव्यक्त एक विराणी

वाटा धुळीत पडल्या
भुरभुर उडते माती
आठव दाटल्यावेळी
झरते कातळछाती

मी ध्यानस्त शब्द
कवितेतला तुझ्या जणू
अव्यक्त गीत तुझे मी
एकांती गुणगुणु?

शाकार मनाला माझ्या
लिहून आर्त काव्य
तुझ्या आभास चाहुलीचे
सुक्ष्म पायरवही श्राव्य

मी व्यापतो काळीज माझे
तु नसतानाही इकडे
अवकाशावर भिरकवत
प्रतिक्षारत चांदण तुकडे

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३.१.२०२३





Monday, January 2, 2023

निद्रिस्त चंद्र


हात तुझा हाती...
दान कसे मागावे?
दुःख सनातन तिव्र
सांग कसे त्यागावे?

येवू दे जरासे
काहुर मनाच्या ठायी
आस तुझ्या दिशेला
चालत निघते पायी

तुडवत असता रस्ते
गीत तुझे संगती
तमात बुडल्या वाटा
रंगात तुझ्या रंगती

मी येतो तुझ्या दिठीला
पापणे बंद असता
मी निद्रिस्त चंद्र पाहतो
तुझ्या गाली हसता...

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२.१.२०२३












राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...