Friday, July 28, 2023

आसेमागे.....



ओल्या आणाभाका
कशा येतील आकारा?
सये ! तुझ्या वेशीवरी
आडे मनाचा पुकारा

हुंदक्याच्या तळातून 
दे ना एक हाक!
मग शब्दांना येईल 
ओढाव्याची झाक

घे कुशिला मुक्याने
एक एक ओळ 
कविता सोसेल
दुराव्याचा काळ

तुझ्या आसेमागे
आस माझी धावे.....
कसे सुटेल हे कोडे?
नियतीला ठावे!

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२८.७.२०२३










हुरहूरे


घायाळ हरिण हसते
बाण तुझा कळवळतो
कसला गंध अनामिक 
करुणेचा दरवळतो?

पारध हवी कशाला
कवटाळत असता सुळ
जिव शिणून मंद होता 
का उठते गोरजधुळ?

मी हिरवे जंगल होऊन
किर्र तरी ना भासे
हे रानफूल गं कोणते
आत खोल सुवासे

मी निर्जन वाटेवरती
दिप कशाला पेटवू?
पक्षी पंखकूशिला
कशास त्यांना उठवू?

मी ऋतूंच्या सावलीला
आडोसा उन्हाचा धरे
पाऊस असा का तुझा
मुक्याने हुरहुरे......


"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२८.७.२०२३









 





Tuesday, July 25, 2023

ओथंब नाती


पाऊस असा का पडतो
जणू माय माऊली गाते
दुर अंतरी लेक जणू की
सासुरवाशीण होते

गर्त उमाळे रोखत चाले
गडद ढगांचा थवा
जात्यावरच्या ओवीमधूनी
हुंदक्याचा हो गवगवा 

बकूळगीतांची रास लावते
दुःख उगाळत माई
ओवी मधूनी प्रकट होते
नकळत मग अंगाई

ठेच लागते खसकन 
जिव असा कळवळतो
रक्तामधला खोल बंध 
परगावी तळमळतो

अंतःकरणातील हाक बघ
नदीत उमटून येते
सासुरवाशीण माई अन्
माय सासुरवाशीण होते

मिसळून जातो हुंदका
हिरवी होते माती
ढग चालतो पुढे
उजवत ओथंब नाती......

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२५.७.२०२३








Monday, July 24, 2023

हुरहूरणारे.......






देशांतर या नभांचे
शिखराला हळू भिडते
मृदेच्या हृदयकणात ओले 
स्वप्न बघ धडधडते 

हा झ-याचा शुष्क वळ
कडेकपारी का खुलतो?
दगडांच्या राकट डोळ्यातून 
बघ पाऊस का गलबलतो?

ती डोंगरवाट का रेखते
आभासी हिरवी रेषा?
काळ्या ढगास सुचताना
ओली पाऊस भाषा

घरटे का शाकारते
चिमण्यांना कसली घाई?
ढग वाहतो स्वप्न
होऊन तत्पर भोई

मी अथांग रिता होऊन
अदमास तुझा हेरतो
येशील तुडवत वाटा
माळरानी स्वप्न पेरतो

येतील हिरवे ऋतू
रंग ऊधळत सारे
मग गवसतील मलाही गीते
तुझे काळीज हुरहुरणारे...

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२४.७.२०२३










  



Sunday, July 23, 2023

ढगांची विण



ढग उसवते सजणी
काळजाची विण
सोसते कोण?
या ओल्या साजणकळा

आठव थेंबाखाली
रान होते चिंब
नयनी प्रतिबिंब 
हिरवे कोवळे

कोण गाते तृष्णेचे
कंच ओले गाणे
स्पर्शाची धुंद पाने
नव्याने फुटताना

कसले हिरवे शब्द 
धरेला फुटली
माहेरवाशीण कुठली
एकांती मोहरते

विज गं कशाला
आकांत करते
आभाळ झरते
मुकाट्याने.....

झेलू का अखंड 
हा मिलन सोहळा
कोंब आशेचा कोवळा
फुटताना......

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२४.७.२०२३









Friday, July 21, 2023

अधिर पिसारा


का थबकते बाई!
घनशामल पाऊस वेळी
गलबल्याच्या मुहुर्तावरती
कसली ब्रम्हानंदी टाळी?

कोण उसवते विण गं
मोरपिसारी इजा
आभाळ तुझे सोसते
झेलत राहते विजा

मी पाऊसघाई करतो
ओसरी तुझी की ओली
तु शोधुन खोदून घेशी
माझी स्पंदन खोली

काय हाताशी लागते
देशील कधी ईशारा?
मोर मनाचा माझा
त्याचा अधिर पिसारा.....
やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२२.७.२०२३






Tuesday, July 11, 2023

समाधिस्थ ढग


समाधिस्थ ढगांचे छत
हळुवार एकले गळते
चिंब पावसाखाली
मन असे का जळते?

अधि-या हवेत ओल्या
पर्वत कडा बघ भिजते!
दुर कपारी, नाले नद्यात
दुःख माझे सजते....

घनघोर हाकांचे तुषार 
उधळत गाठतील माती
चिखलाच्या फडताळातून
ते गीत तुझे का गाती?

कसे फुलते दुःख 
हिरवे,पिवळे,लाल
दे विसावा तृष्ण ओठा 
तुझा उन्नत भाल

मी लिन पावसामधल्या
वाहत्या एकट धारा
आकांत जणू विजेचा
कळवळून प्रकटणारा

येवू तुझ्या शिवारा?
सजवून घेशील माती?
फुलतील रानाशिवारी
कंच हिरवी नाती....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१२.७.२०२३











Saturday, July 8, 2023

अभंग!


पाचोळा रे उडतो
जिव जणू कुणाचा
सुर अंतरी घुमतो
मीरेच्या विणेचा

पाय रे कुणाचा!
पडतो अनवाणी
हाकेस भेटते हाक
मुक कशी दिनवाणी

कलते आभाळ जरासे
चांदण्याचे तळवे
अंतरिक्ष होतो आत्मा
रंग चंदेरी हळवे

डाग नको ना काही
चंद्रनिशेच्या भाळी
निद्रेच्या फांदीला बघ
तुझी स्वप्नझोळी

येईल कधी संभवा
चांदण्याचा संग?
उमटेल आत्म्यावर या
शामल एक अभंग !

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
८.७.२०२३






 












रचनापर्व

Thursday, July 6, 2023

तिर्थात्मा....



सर कोसळे मंद
नभास न्हयाळताना
का येते नभ दाटून
पाऊस टाळताना?

येती कुठुन श्रमून
हे वनवासी थवे?
आणी तुझ्या अंगणी
शिंपडती ओल दुवे

घे थेंब तळहाती
तुषार सुध्दा धारुन
मी ढगातून पोहचे
अनंत दुरावे सारून

घावांचे विस्मरण तुला
होई नित्य पावसाळी
तरीही तुझ्या रानशिवारा
माझी ओलहिरवी हाळी

आहे ना तुझ्या शिवारी
माझ्या ढगांची माला?
उमजेल, पहा कणवेने
त्यांचा आत्मा तीर्थ झाला.....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
७.७.२०२३
















Saturday, July 1, 2023

शब्दांचा दरवेशी


असु दे एक कविता
तुझ्या काळजा पाशी
हरखून जाईल कोणी
शब्दांचा दरवेशी..!



やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२.७.२०२३


एकांत भ्रम


चंद्रसर का झरते?
पाऊसओल्या आकाशी
वाहे कोण गर्त गर्त
काळजाच्या मुळापाशी?

झिरमिर झिरमिर चाले
झुळुक हवेची ओली
मुक हाकात लिप्त
माझ्या लोकगीताची बोली

हाक कशी मी देवू?
नसता मजला मुभा
निरोप तुझा घेण्या 
नभी चंद्र ठेवला उभा

फरियाद या ढगांची
कोसळते तुझ्या दारी
मन चाले तुझ्या दिशेला
जणू मग्न आषाढ वारी

वाहत असता सारे
मी बनतो वृक्ष बिज
तुझ्या निशिगंधी झाडाला
अर्पत माझी निज

दुर विज कडाडे
ढग जणू की रडते
त्याच्या काळीज मुठीत
साद अनाम धडपडते

ये शिवारी ओल्या
तुडवत चिखलवाटा
ठरु दे अपवादाने
एकांत भ्रम हा खोटा....


やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२.७.२०२३




















Thursday, June 22, 2023

हाक एकट मरते



मी पडलो गाव शिवारी
होऊन तुटता तारा
आणी टांगला ध्यास
चंद्रासमीप लुकलुकणारा 

तु तरीही मागत नाही
गाव शिवारा काही
मातीत पेरले स्वप्न मी
उगवून देण्या ग्वाही

दुर हवे ना काही
प्राप्तीची होण्या आस
शिंपडे चांदकोर नभी
आठवांचा गर्द सुवास

मी रुतून धरणी आत
चांदण्याची याचना करे 
दुःख तिळतिळ माझे
तुझ्या शिवारी झरे

शब्दांना गहिवर फुटती
कवितेत सांज झुरते
तु गेल्या वाटेवरती
साजनधुंद भिरभिरते

तु वळूनही पाहत नाही
सारे तसेच उरते
हाक अनावर माझी
शतदा एकट मरते

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२२.६.२०२३































Saturday, June 17, 2023

आभासगामी....



वारा असा का ओला
हल्ली मजला भेटे?
आभाळडोह तळातून 
येताहे हाक वाटे

नागीण विजांचा लख्ख
विळखा पडून सुटतो
दुर ढगांचा बांध हा
सरी सरीने तुटतो 

काठावर यमुनेच्या
मुक हाकांचा जागर
राधा निश्चल निश्चल
वाहून जाई घागर

गोठे चिंब ओले 
गाईंना वासरघाई
दुर उभी पावसात
निर्वस्त्र आमराई 

एकाकी चिंचोळी वाट
तिलाही घसरण लागे
तरीही मी निघतो
तुझ्या आभासा मागे.....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१७.६.२०२३













विसावोत्सुक थवा



माझ्या आत आहे
एक विसावोत्सुक थवा
आणी तु अजुन 
मुळ ही धरले नाही..!

साठवतो आहे जमिनीत
मी आत्म्याचे मगदूर माझ्या
आणी तुझ्या बिजास
अंकुरही फुटत नाही..

मी लयीत जपत आहे  
दुर खाडीवर वाहती गीते
तुझ्या वाणीस साधा 
शब्दही सुचत नाही...

मी निघतो आहे माघारा
या खिन्न अंधार वेळी
तुझ्या दिव्याचे काळीज 
मजला वाट ही दावत नाही....

उगाच का मी थबकतो 
न दिल्या हाकेच्या साठी?
माझ्या पाठो पाठी
तुझा आभासही दिसत नाही...

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१४.६.२०२३










 



 


Monday, June 12, 2023

टांगल्या नजरा.....



आला ढगात पाऊस
जणू पारंबीचे फुल
निळ्या निरभ्र आभाळा
पडे शामरंगी भूल

बिज हसते गालात
रुजु रुजु त्याचे मन
काळ्या मातीत बावर
उल्हासते मन

हाक शिवारी निनादे
विज कल्लोळ कल्लोळ
ढग मातीत धावते
जसे वेल्हाळ वेल्हाळ

सर एकेक अशी
रानावनास भावते
जणू आळवाची ओवी
विठुरायाला पावते

नको लावू सये!
खिडकीला पाठ
थेंब तुषार आसुस
अनुभवन्या ललाट

बघ शहारला तुझा
गंध मोगरी गजरा.....
तुझ्या सरीसाठी मी
नभी टांगल्या  नजरा...

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१२.६.२०२३
















Sunday, June 11, 2023

पुनर्शोध.....



तात्या!
घेता का थोडा त्रास?
लिहता का पुन्हा 
'जातीयवाद्यांचं कसब' 
असा एखादा ग्रंथ?

आणी जाता का पुन्हा
एकदा रायगडाच्या 
पायथ्याला.......?
निजला असेल तेथे
रयतप्रेमी समाधिस्थ 
'कुळवाडी भुषण'

पहा! वेढलं असेल
त्यांच्या समाधीस
अदृश्य विषवल्लीने
आणी माजले असेल तेथे
दुराभिमानी झुडपांचे तणकट

घ्याल का पुन्हा एकदा 
त्या मुळ समाधीचा शोध?
कराल का पुन्हा ती
झुडूपमुक्त?
कारण अठरापगड जातीला
घेवून त्यांनी स्थापलेलं स्वराज्य...
त्यांच्या राज्याभिषेकाच्या
पूर्वसंध्येलाच मरताहेत 
'निळी पाखरं' त्या झुडपात 
अडकून........
आणी भगवा सुर्य ही
चाचपडतो आहे...

आणी कराल का तुम्ही
शिवप्रभुच्या पोवाड्याची पुनर्रचना?
मी ठेवली आहे जागा त्यासाठी
संविधानाच्या कपाटात........!

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
११.६.२०२३











सजनीच्या काळजात


आला सांगावा ढगात
मन भरुनिया आले
सजनीच्या शिवारात
झाड आनंदून झुले

दुर देशीचा पाऊस 
सारे करील तो चिंब
खिडकीच्या काचावर
उमटेल ओले बिंब

थेंब वाहील मातीत
धरा होई आबादानी
तुझ्या काळीजकपारी
माझी ओलीकंच गाणी

रुजेल कविता 
शब्द होतील हिरवे
येतील माघारा 
दुर गेलेले पारवे

वाहील हवा गात
किणकिणीचे गीत
कंपन हळवे
सजनीच्या काळजात....... 

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
११.६.२०२३
















 







Friday, June 2, 2023

शब्ददुवे



ऊन स्पर्शते उंबरा
लांघेल कशास परके?
मावळतीचे रंग अबोल
संथ..संयत...पोरके

ठेव दारात थोडे
तहानल्या थव्यास पाणी
तृप्तीचे आशिष तयांचे
जिव होईल आबादानी

देशील एक कविता
त्यांच्या पंखापाठी?
सजनाशी होण्या तुझ्या
शब्दांच्या उराभेटी.....

ये ना उसासून अंतरी
किती कविता वाहू?
चेहरा तुझा मी किती
असाच कल्पनेत पाहू?

स्पर्शेन कधी चांदवा पहा
ओंजळीत जिव साचला
तुझा आभास निव्वळ नभी
अन् मोर मनाचा नाचला.....

या हाकांचे वादळ...
बहुधा इकडेच निघाले थवे
झाड माझे आतुर 
उतरव ना शब्ददुवे...

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
३.६.२०२३





 



 

Thursday, June 1, 2023

दान...


हवेत वाहवत राहते
तुजगंधी हलके अत्तर
अनंत प्रश्न व्याकुळ
नसते काही उत्तर

प्राक्तनाचा प्राण हळहळे
होऊन केविलवाणे
दारात पसरता झोळी
सुपात अडती दाणे

दान कसे मी मागु?
हातास नसते मुभा
कोण फकीर स्तब्ध
वेशीवर तुझ्या उभा?

घ्यावे काही मागून?
की देण्यास जिव गोंधळे?
बावर दिशेस थवा
पंख त्यांचे आंधळे

फकीर निघतो तसाच
अज्ञात दिशे कडे
वेशीतला जिव मग
थव्या मागे उडे.......

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१.६.२०२३




Monday, May 29, 2023

अंतरातील हाका....



ढळते सांज अशी
जसे पडते फुल
आणीक काळजावर 
गंधभारली भुल

शिखरावर झुकतो 
कसला गर्द भास
अन् बहरते अंतरी 
कोणी नसले खास

संदर्भ कसले येती
ओंजळी धुसर सगळे?
मी मलाच पाहतो दुर
मजपासून वेगळे

बोलवत नाही मी
मला माझ्या मिठीला
पापण्याचे बुलावे या
तुझ्या आर्त दिठीला

पांघरावे का हे आभाळ 
चांदणे भेटण्या....?
की तारा होऊ अनाथ
पोरके होऊन तुटण्या?

निर्मळा! 
मागशील का मग
काही दोघांस मिळणारे?
ज्याने हसतील दिवे
वृंदावनी मुक जळणारे

की विझू असाच 
नभाच्या कोपरी कुठल्या?
ऐक ना ! धीराने कधी
अंतरात हाका उठल्या.....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
३०.५.२०२३
























स्तब्ध गहनता....


गहनता माझी स्तब्ध 
ढळते अशी का थोडी?
समर्थ दुःख अनामिक 
त्याची लागते गोडी

दृष्टीस भ्रम ना होवो
अंधार व्यापून यावा
मी करु कशास एकट
तुझा काळीजधावा

हे रंग गुढ वाटती
काळीज खुणाही विझल्या
पापणीच्या आडोशाला
वेदना गाढ निजल्या

रिक्त कवेला माझ्या
डाग तुझा बघ लागला
जिव चकोर माझा
चंद्रामागे भागला 

अज्ञातवास हा कसला
किती जतावे कोडे?
स्वप्नात दौडती माझ्या
शुभ्र सात बघ घोडे

मी निजशिवेवर गातो
उजेडाचे जागे गाणे
आणी काढून बघतो
वहीत वाळली पाने......

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२९.५.२०२३












Sunday, May 28, 2023

आठवांचा शर


शहर होते एक साजिरे
आणी गर्द पाऊस ढग
निघून गेल्या सरी अनंत
मागे शिल्लक नुसती धग

एक आस होती देखणी
रस्ते ही गजबजलेले
तगमगत तमात करती
दिप मुके विझलेले

मी दृष्टीहिना सारखा
चेह-याचे अंदाज लावे
ही वाट अशी अनावर
का उगा जिवास भावे?

असेल सुना झरोका
निश्चल असतील पक्षी
कोमेजून निरंगी आणीक 
तुझ्या पडद्यावरची नक्षी

असेल का तो डोंगर 
अजुनही तेथे उभा?
तु खरंच घेतली होती 
निघण्या आधी मुभा?

तु का निघावे असे
सोडून मागे सारे?
आणी एक तळे ते
एकट तगमगणारे?

मी किती तरंग मोजू?
येईल कधी का लाट
तु येशील कधी का तुडवत
ती तळ्याकाठची वाट?

हे असले कसले जाणे
पाऊलखुणाही ना मागे?
आठवांचा तिक्ष्ण शर हा
किती जिव्हारी लागे....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२९.५.२०२३















 


Friday, May 26, 2023

महाकाव्य....



स्पर्शबावरे आभास
उत्सुक माझ्या दारी
काय उन्मळून दाटते
कंठात या घनभारी?

धमन्यातला थवा का
उतरतो एकट फांदी?
झाडाच्या तळामुळाशी
पानफुलांची नांदी

ऋषी कोण हा निघतो
तुडवत जंगलराई 
पाप अंगुलीमालाचे
पुण्यास हो उतराई 

ही हाकरंगातली रेषा
रुप तुझे रेखते
आम्रपाली निद्रेखाली
जणू तथागता घोकते

मी जातक सांगत असतो
गहन गळ्याची लय
पिंपळ दाटून येतो 
कंठी मुकहाकेची सय

हे कुठले महाकाव्य
आत साचून असते
कोण अनामिक त्याला
कळवळून वाचत असते...

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२६.५.२०२३









 

अंतरात...