Tuesday, August 30, 2022

चांदणव्यथा...


झालो तुझाच सारा
उरले ना काही इथे
तुझ्या अंतरातलीच तर
सुचतात मला गीते

तुझेच ना हे शब्द !
भाव माझा भारती
आस तुझी चालवे
स्वप्न तुझेच सारथी

तु नसल्या वेळी इथे
भास तुझे बघ आले
या बंद पापण्याआड
स्वप्नांचे गाव खुले

येशील सारत दिशा
होशील वास्तव कथा?
विरून जाईल अलवार
मग धुक्यात चांदणव्यथा....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३१.८. २०२२











Monday, August 29, 2022

बंद दारापाशी


मी शोधतो आहे एकांती
एक निरव भरीव शांती
प्रकाशत अंधारपहाडी
चांदण्याची शामकांती

मी सारतो आहे तम
चांदणे घेवून कुशी
भाव निघतो आहे थेट
दुरदेशी......दरवेशी

वेचतो आहे मी तुझ्या
वेदनेची व्याकुळ फुले
उसवताहेत पुर्वापार एकांत
आठवांचे आदिम सुले

विस्कटतो आहे अंधार
मी शोधता तुझे गाव
आभाळ का घेते आहे
चांदण्याचा उगव ठाव?

दे ना तुझे दुःख!
एकांत हा शाकारण्या
जप वाहिले स्वप्ने तुला
निगुतिने आकारण्या

दुःखाचा तुझ्या बिलग
होऊ दे मग वेशी
मी हर्ष पेरून परतेन
तुझ्या बंद दारापाशी......

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३०.८. २०२२












Sunday, August 28, 2022

ओंजळदुव्यात...


या ओंजळदुव्यात तरळतो
तुझा हसरा नितळ चेहरा
लख्ख लकाकी देत दुव्यांना
जणू बावन्नकशी मोहरा

आळवू दे ना मला
तुझ्या प्रार्थनेची आर्त ओवी
अंतरातली हाक माझी
तुझ्या अंतरी विलीन व्हावी

उठावे प्रतिहाकांचे आवर्त
जणू यमुनासाक्षी बासरी
धुन उमटून मनात यावी
ओल्या नयनातुन मग हसरी

मी व्हावे तुझ्यात एकात्म
असे पसर तु बाहू
नदीतळातील हाकांना
सागरातुन कुठवर पाहू?


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८ .८. २०२२









Saturday, August 27, 2022

अंतर...

जुळवू कसा यमक मी
तुला देवून शब्द सगळे
सारेच वाहून तुजला
उरेल काय ते वेगळे?

गाऊ कोणते गीत
सा-यात तुझेच तराणे
लोकगीतासम अज्ञात
भावही आपले पुराणे

हाक कशी रोखावी
हृदयाची वाढता गती
पुरातन ही आस
या युगातही जिती

कसे मिटावे डोळे
तु साकारताना मनी
दे ना तुही नयनभेट
या सांजव्याकुळी दिनी

कसे रहावते तुला
करत हे जन्मांतर?
सांध तरी जरासे... हे
अगणीत अगम्य अंतर.....



༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२८ .८. २०२२




भावसुवास.....

अरण्यके गात वनी
कुठला साधू फिरतो?
विरहांकित मेघदूत जणू
निरोप देण्या झुरतो

दे ना तु ही एक
मजला एक परवली
मनात मी त्यासाठी
महाकाव्यही ठरवली

नदीतिरावर मी ही
वाचू का अरण्य?
की टिपून घेवू तुझ्या
नयनातील कारूण्य?

सुचेल कशी मला
तुझ्या महाकाव्याची भाषा?
या भोजपत्रावरती रेख ना
तुझ्या मनातली भावरेषा

ऐकू का मी करूणाष्टके
की पाहू तुझेच डोळे?
सुचतील झरझरून शब्द
रेखीव ..भावभोळे..

गाठशील मग तु ही
माझ्या कवितेचा तळ
जोजवेल कविता माझी
हृदयातली तुझ्या कळ

नसेलही कदाचित महाकाव्य
पण होईल तसा भास
तु पेरत रहा या शब्दात
तुझ्या असण्याचा भावसुवास.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७ .८. २०२२

कालिदास समजवणा-या मधूरेस......









Friday, August 26, 2022

काळीज देईल धिर


येत्या आठवणीचे कसे
देवू तुला खुलासे?
नसते तुजकडेही काही
जे देईल मला दिलासे

किती उगाळू तमास
उजेड उगवत नाही
मी दुर दर्ग्यावरती सुना..
मलाच बघवत नाही

ये ना कधी ओलांडून
परिघात कितीसे रहावे?
एकांत घडीच्या वेळी
मग कशास करावे धावे?

होईल कधी का असे?
चांदण्यास बिलगेल ढग
रात हसेल काजळमंद
प्रकाश अवतरेल मग..

होईल वेदना अंत
झाड होईल स्थिर
उधाणल्या काळजाला जेंव्हा
तुझे काळीज देईल धिर....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२६ .८. २०२२



Thursday, August 25, 2022

दुरवरचे दाट धुके


व्हावे तुझ्या मनातले
मी गुपीत हळवे मुके
मी तसाच ना गर्द जसे
दुरवरचे दाट धुके?

समीप असूनही नसतो
मी विचार एकांतसुन्न
मी हस-या तुझ्या क्षणातील
उणीव अबोल.. खिन्न

शब्दांनाही संहिता
ही अशी हृदयकथा
दुःख किती जन्माचे
वाहे दुखरी ही व्यथा

तु असे असावे येथे
जणू जिवाचे असणे
अन् स्वप्नपडीच्या वेळी
निद्रेखालून हसणे

तु यावे असे अनाहूत
जणू चांदण वारा
वाहून द्याव्या कुशिआड
नयनातील ओथंब धारा.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२५ .८. २०२२











Wednesday, August 24, 2022

मिलन भरात


रातीच्या सावलीत
झाकाळे प्रकाश
पाताळाच्या अंतरी
कलते आकाश

होते उसास्याचे गाणे
शब्द कशाला आणावे?
किती वाटते मनाला
तु सारेच जाणावे

नसे तुला काही
किती तुटतो बकूळ
फुलबांधणीत होतो
सुगंध व्याकुळ

मी नष्ट होऊ कसा?
तुझ्या उरी साचलेला
मी होऊ का तो शब्द
ओल्या डोळ्याने वाचलेला?

मध्यराती गडे सखे
कसे चालावे अंतर?
ठेव पापण्यात माझ्या
तुझ्या स्वप्नांचे मंतर

होऊ दे ना भेट
जिव व्याकुळ वागतो
तुझ्या झोपल्या उशीला
दिप आठव जागतो

नको कुस बदलू
दिप तेवणे विसरतो
चांदण्याला घेण्या कुशी
मी बाहू पसरतो

असा वेडा उभा मी
चांदण्याच्या खाली
हो ना कधितरी
माझ्या हाकेची तु वाली

देवू किती हाका
शिखराची आन
या तमाच्या झाडाला
दे चांदण्याचे पान....

झाड चांदणे होऊ दे
फुल पडू दे दारात
चल वाहू सारे सारे
मिलन भरात....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२४ .८. २०२२







Tuesday, August 23, 2022

हिरवे उधाण


रान निघते भेटाया
हंगामाची सय
उधळून देत
अकालाचे भय

चालतो बहर
असा कसा पुढे
रान निगुतीने जते
हंगामाचे तडे

मन दाटले पाखरू
गाते हुरूपाचे गीत
रान नेटाने निभावे
बहराची प्रित....

येईल बहर
हसेल मग रान
कुशीला येईल
हिरवे उधाण...




༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३ .८. २०२२
















धुसर माया...

हा भास चांदण्याचा
धुन कसली वाजवे?
रातीचे गर्त हृदय
व्यापती उत्सुक काजवे

अंधार नसतो एकला
साथीस एकट रितेपण
राखेतल्या अंगाराचेही
मग विरघळते जितेपण

पक्षी नसता जागे
नभ असे का जागते?
नसलेल्या दारापुढे
जोग कसला मागते?

टळत नाही उदासी
अशा एकट राती
निःश्वास मंदावलेल्या
विझलेल्या निपचित वाती

मी मला शोधतो नित्य
तुझ्या दिशेस वाटा
सागर तळातल्या चंद्राला
फुटती चांदण लाटा

नसते तरीही काही
हात राहती रिते
नसलेल्या चांदण्याखाली
गर्त तमाची फुलती गीते

त........री.......ही......

अंधाराचे भय कशाला
चांदण्याची असता छाया
भासात दरवळत असते
चांदण्याची धुसर माया


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२३ .८. २०२२



















Monday, August 22, 2022

त्यावेळीही....


युगापुर्वी हरवलेले शब्द
कवितेस अलिंगन देती
ते शब्द,ती कविता
त्यावेळीही तुझीच होती...












༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२ .८. २०२२




भग्नता अन् तडे


दंग होऊन सांज
बुडता सुर्य पाहते
तुझे चांदणे हळवे
निद्रेखाली राहते

देवू का मी एक
भावविभोरी हाक?
घे टिपून माझे शब्द
मग पापणी झाक

भारू का तुझी निद्रा
स्वप्नांच्या उधळत राशी?
ठेव मंद जळता दिवा
आभाळाच्या हृदयापाशी

तुझ्या परिघात मी नसेनही
असतो सदैव ता-यापलिकडे
दिसतील कसे आभाळाचे
मग भग्नता... अन् तडे..?


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२२ .८. २०२२















Saturday, August 20, 2022

अनुभूतीचे नक्षत्र...


सुर्य बुडतो मंद
सांज हळु पसरते
कोण असे अंतरी
चांदपावली उतरते?

भास तुझा का होई
असल्या साजनवेळी?
मी तुझे सजवतो चांदणे
उत्सूक या आभाळी

दुर उभ्या इमारतीला
धुके मंद वेढते
तार कोण हृदयाचे
व्याकुळ घडी छेडते?

अवकाशी रंग सांडतो
ओंजळ तमाने भरते
तुझे चांदणे हळवे
तमात खोल झरते

चांदणरंगी तमात तु
रेख मिलनचित्र
दे नभात माझ्या रेखाटून
अनूभुतीचे एक नक्षत्र.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२० .८. २०२२








Friday, August 19, 2022

ओंजळीचे दान पदरी


तुझे पाऊस वेड भिनता
आभाळ सांडते मन
तळव्यावर तुझ्या ओघळते
काळजाचे शामल बन

त्यासही आस लागते
तुला अनावर पाहण्या
आभाळ तसे ही व्याकुळ
तुझ्या सभोवती वाहण्या

हो चिंब तु हाकेने
स्वप्नांच्या पडती सरी
हा मेघ मनाचा माझा
पावसाळतो तुझ्या उरी

ढग माझ्या शब्दांचे
खिडकीत तुझ्या साचले
थेंब त्यांचे ओले
नयनी तुझ्या मी वाचले

नित्य कवितेत माझ्या
तुझ्या हाकांची दाटी
मी व्याकुळ मंदहास्य
उमलणारे तुझ्या ओठी

दे स्मितांचा दिलासा
अशा निरव राती
घन मनातले माझ्या
गीत ओले तुझे गाती

सरसरून पाऊस येतो
त्याने कुठे पडावे ?
ओंजळीचे दान पदरी
त्याच्या नित्य घडावे....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९ .८. २०२२






Thursday, August 18, 2022

अपार..


नसणे सोसवत नाही
असणे ही हळहळते
दुर तुझ्या दिशेला
फुल मंद दरवळते

असते मुक भाषा
गीतात या दडलेली
खेप बहराची हसते
ओंजळीत पडलेली

वाहू का हे ही गीत
तुझ्या व्याकुळ ओटी?
रातीच्या गर्द मिठीला
होऊ दे चांदभेटी

इतके बुडून जावे
की व्हावे न विभक्त
तु अंतरात असे भिनावे
जणू धमन्या मधले रक्त

व्हावा अंत न कधी
असे अपार भेटावे
शब्द असूनही माझे
गीत तुझे वाटावे...


༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१८ .८. २०२२













Wednesday, August 17, 2022

भासाचे प्रारब्ध

भरून मन येते
जशा पाण्यावरती गाई
निज मना लागावी
देशील अशी अंगाई?

वाहते मनात काय ते
डोळ्यातुन धावत नाही
अथांग तुझ्या मनाचे
माझ्या मनात मावत नाही

होतो मलाही अनावर
तुझ्या मनाचा धावा
तुच नसता येथे....
सांग बोल कुणा लावावा?

ढाळावे कशाला आसवे
वाहून जाण्या सारे?
दुःख दाटून मनात येते
तुलाही न कळणारे...

क्षितिजावर तु उगव ना
होऊन तेजो तारा
गर्द तमाचे काळीज
उजेडाने भारणारा...

असते उणीव ईथे ही
जी असते तुझ्या ठायी
धावा मनातला तसाही
सहजी उमजत नाही

उंब-यात तुझ्या अडते
हे फुल मनाचे ताजे
झुळुक मुक परतते
न करता गाजेवाजे

होईल कधी तरी शक्य
मी वाहीन समक्ष शब्द
तो वर सजवत राहू
आर्त भासाचे हे प्रारब्ध.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७ .८. २०२२







Tuesday, August 16, 2022

हुरहुरते मन्वंतर...


तुझ्या आभासाला सांग
उगाच तो दाटतो
जिव पारंबीचा पार होऊन
साध्या झुळुकीनेही तुटतो

जगरहाटीच्या आडोशाला
गुपिताचे सोसू किती घाव?
स्वप्नाळल्या तमातुन तु
उजळशील का आर्त धाव?

लगबगीच्या गलबल्याचा
मी अनुभवतो दाटवा
भेटलूब्ध जुईचा
शाकारताना ताटवा

हवेस घातला बंध
तरी गंध कसा रोखावा?
चांद तुझ्या नजरेचा
मी तमात या जोखावा

सोडवू किती कोडी
तु घातल्या मनाचे?
लावून अर्थ एकले
तुझ्या बिलोरी खुणांचे

भेटून जातो दोघेही
राखून असता अंतर
मिठीत राहून जाते
हुरहुरते मन्वंतर....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१६ .८. २०२२











Monday, August 15, 2022

व्यथावेध....


व्यथे! घ्यायचा आहे
तुझ्या तळाचा वेध
हृदयातील स्पंदनाचे
जाणत व्याकुळ भेद

हा कुठला झरा वाहतो
पाषाणाच्या अवघड वेळी?
चंद्रतमातील किरणे
वर्षावत उन्नत भाळी

तुझ्या हाकांचे जंगल
या अवनी ठार रूजते
चांदण्याच्या पंखाखाली
रात निःशब्द थिजते

फुल बहरता श्रावण
पेरतो आभासी भुरभुर
वाढत्या पिकास लावत
कापणीची उदास हुरहुर

मी करून पेरा तुझा
काळीज राखतो आहे
जाणीवांच्या हंगामाचे
पसे जोखतो आहे.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५ .८. २०२२









Sunday, August 14, 2022

चांदण अनूभूतीची मुभा

आठवण येते झड बनून
या सर्द पाउस घडी
मन वैराणाचे धन
रात लागे देशोधडी

घन तिमीर रेंगाळता
चांदण उणीव साचे
गर्द रिक्तपण दुखरे
चांदण्याचे भास वाचे

दे ! चांदणं भाषा
मुक्या हाकेस माझ्या
गलबल्यात उगवेल कविता
न करता गाजावाजा

घे! दुःख मनाचे माझ्या
कवेस तु मेघवेळी
कवितेस लागो माझ्या
ब्रह्मानंदी व्याकुळ टाळी

जरी रावा घुमतो नभी
तमात लपते दिशा
चांदण्या रे उगवून
उजळ व्याकुळ निशा

कधी उतर या नभावर
दे पसरून तुझी आभा
आभाळासही हवी ना?
चांदण अनुभुतीची मुभा..

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४ .८. २०२२













Wednesday, August 10, 2022

मजसम आभाळ व्हाया...

हाक बिलगते मुक
जाणीव असते ठायी
अंतरी उमलाया तु
वर्तमानास लागते घाई

प्रतिक्षेच्या दारात या
तु मुक उभी एकली
मी आठवांची मुठ माझी
तुझ्या तळव्याने झाकली

असते तुझेच सगळे
सर्वत्र गर्द व्यापणारे
चांदणे शितल चकाकते
ढगाआड लपणारे

शोध कशास घ्यावा
असता अंतरी सारे
दे ढगास माझ्या तुझे
प्रतिक्षारत आठव तारे

मी बिलगतो तुझ्या भासास
आसूस हाकेच्या वेळी
प्रतिध्वनीच ती दिल्या
हाकेची एकेकाळी

जळतो एकांत असा
कधी तुलाही असे पटावे
काळीजखुणाच्या इशारतीने
फुल फांदीवरून तुटावे

झडले फुल चुंबते
चांदण्याची व्याकुळ छाया
निरव अनूभवावे लागते
मजसम आभाळ व्हाया....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११ .८. २०२२









Monday, August 8, 2022

ओंजळ हळवी राख


या आवर्तास बाधते
माझे मौन पावसाळी
भिजल्या झाडाखाली
चिंब सायंकाळी

ओल्या पंखास कसली
उब देवू सहवासी?
हाक रूजता मातीत
अशी अनावर दरवेशी

ऐक! कलत्या थेंबांना हे
समर्पणाचे गीत सुचलेले
कुठल्या आदिम काळी मी
ताज्या भूर्जपत्रावर रचलेले

पाचोळा का त्यांचा
असा मंद पावसी जळतो
अन् अवकाश शामलेचा
मग आभेत त्या उजळतो

वेच हे भिजले निखारे
चेतले तरीही स्थितप्रज्ञ !
शिलगून घे तुझ्या मनातला
हुरहुरीचा अपुर्ण यज्ञ

लिही त्यावर ऋचा
गा! समर्पणाचे हळवे गीत
मी अलगद रेखुन देईन
शब्द अनोखे अन् नवनीत

असाच माझा पाऊस तुझ्या
शब्दातून अनामिक वाहो
सृजन धरतीच्या पाताळी
तो खळाळत झरा होवो!

येईल कधी आठवांचा मुसाफिर
देईल या सुप्त झ-यास हाक
दोन घोट त्यास देण्या
तुझी ओंजळ हळवी राख!

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९ .८. २०२२










पंखविस्तार


ढवळताहेत मनाचे गाभारे
अनुत्तरीत प्रश्नांचे थवे
मार्गस्थ होऊन परताहेत
पुन्हा पुन्हा इकडेच
कोणी साधी प्रश्नांची
वास्तपुस्त करू नये
इतके का आभाळाने
असाह्य व्हावं?
असो
प्रश्नाळल्या आभाळावर
रेखावे लागेल
एक नवे आभाळ
ज्यातुन उत्तरे घेवून
पक्षी ओलांडतील दिगंत
आणी येतील माघारा..
नवीन लोकगीत घेवून
अगदी मनातल्या
प्रश्नास तुडुंब चिंब
करेल असे....
उड्डाण घेण्यास
माझे पंख विस्तारताहेत..
वादळा नोंद घे..
तुला लांघण्याचे मनसुबे
वाहताहेत तुझ्याहूनही
जोरकस वेगाने...
टिपतील ते झुळुक हळवी
आणी तुझे उधाणही
सामावून घेतील कुशीत...

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९ .८. २०२२




Sunday, August 7, 2022

निघून जाणे

कोसळते जणू ढगातुन
आठवांचे काळीजपाणी
अन् ते ही गुमान वाहते
एकल्या माळरानी

चिंब माळ भिजतो
माजघर कोरडे ठाक
पावलास चिखलबंदी
कोणाचा त्यावर धाक?

दुर पडता पाऊस
छान तसाही दिसतो
खिडकीस कसे उमजावे
व्याकुळ किती तो असतो

येवून कधी माळावर
वेच सुनेपणाचे टिंब
ढवळ ओथंबात साचलेले
सजनाचे प्रतिबिंब

चिखलात रूतू दे तुझा
नक्षिदार पाऊल ठसा
टिपून त्यास घेवू दे
नाचल्या मोराच्या पिसा

नखशिखांत पाऊस गायील
तुझ्या स्पर्शाचे ओले गीत
माळही समजून घेईल
मग मिलनाची ओली रित

मनातल्या पावसाला
दे माळावरती संग
पाऊस कोसळून पेरेल
मातीत हिरवा रंग

माळ होईल हिरवा
धारून तुझे येणे
मग मनास टोचणार नाही
पावसाचे निघून जाणे.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७ .८. २०२२




























Saturday, August 6, 2022

आभाळ गोंदवा


नित्य सांज येते
हुरहुर अनामिक सवे
तुझ्या दिशेच्या कोनावर
थबकती व्याकुळ थवे

आभाळी गुलाल लागे
चांदवा मंद उगवे
सुर्य त्यागत असता
राजवस्त्र एकट भगवे

फुलावर चंद्र उतरता
भाव फांदीवर टेकतो
आभाळ कोनाही मग
दिशेस तुझ्या झुकतो

मी शब्दव्याकूळ फुलांची
घेवून गंधसुगंधी भाषा
रेखाटून नभी घेतो
उगवत्या चांदणरेषा

चांदणे लकाकता
भरते अवकाश सारे
चकोरास पुकार देते
वाहते पुनव वारे

मी चकोराचे पंख घेता
तो शब्द माझे घेई
आम्ही चांदण्याखाली होतो
आठवांचे मुक भोई

लावता चकोर ध्यान
अनूभवन्या मिलनचांदवा
चांदण्याच्या काळजावर
कुणी आभाळ रे गोंदवा!

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
६ .८. २०२२









Friday, August 5, 2022

चांदणबांधणी


असेल तुझ्याही ठायी
एक अपुर्णत्व साचलेले
शेष निनाद रेंगाळत
मी शब्द तुझे वाचलेले

घे धाव या उराशी
होऊ दे बिलग युगाचा
धागा बांधून घेवू
कवितेतल्या आर्त जगाचा

मी वाहता शब्द व्याकुळी
तुझा भाव ढगाला आला
शब्दाच्या अंतरी माझ्या
तुझा दाटतो अर्थ ओला

तुझा कोसळ अनंत चाले
नखशिखांत मी भिजतो
तुझ्या पापणी आड मी
उजळून अपार सजतो

राहू दे तुझ्या ठायी
माझ्या शब्दांचे पुकार
दे उधळून तु तुझेपण
येण्या कवितेस या आकार

तुझ्या देखण्या आभासाचा
कवितेस मखमली रंग
तुझ्या चांदण बांधणीचा
आभाळ मांडते चंग....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
६ .८. २०२२






Tuesday, August 2, 2022

अभिव्यक्तदग्ध


तुझ्या अव्यक्त कवितेतील
मी दोन ओळीतला अर्थ
नयन डोहात रेंगाळणारा
आशाकिरण अंधूकसा गर्त

घनव्याकूळ वेळी संयतुन
मी न लिहलेला शब्द
निनाद मनातला तुझ्या
मी उत्सुक अभिव्यक्तदग्ध

मी तुझ्या भावातुर कागदाची
अस्पर्शी अव्यक्त घडी
मी साचता सलील ओला
तुझ्या मिटल्या नयनथडी

मी तुझ्या व्यक्त कवितेतील
अव्यक्त ओळखभास
मी तुझ्या चांदण्यावरती
झुकलेली आभाळ रास

मी तुझ्या प्रकाशाचा तुकडा
अंधार सारता मागे
मी तुझ्या पदरातले स्तब्ध
अऊकल रेशीमधागे

मी तळव्यावरील रेषाबन
तुझे अस्पर्शी भविष्य
मी सुरवंटाच्या पंखाचे
रंगीत आभासी आयुष्य

मी तुझी रंगीत बाग
दुर कुठेतरी फुललेली
मी तुझी काळीज जखम
अनाहूत एकांती सललेली

मी दिर्घ निःश्वास तुझा
एकांत समयीचा कृष्ण
मी ओल्या नयनीचा तुझ्या
धारोष्ण अश्रूथेंब तृष्ण....

मी तुझे अनामगीत
वा-यावरती विरलेले
मी ढग तुझे एकाकी
दुर एकट झरलेले

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
३ .८. २०२२













Monday, August 1, 2022

अस्पर्शी गोंदणे


विदग्ध दुःखात कलते
अंधाराचे उजळ सुनेपण
आभाळाच्या व्याकुळ हृदयी
चांदण्याचे होता रोपण

फुलविहीन बहर बकूळ
सजवी निकटवर्ती दुरावा
डोंगरतळी निजल्या पाण्याचा
भोग ओला सरावा

माझे शब्द विस्तारी मौन
या सुकुमार दुराव्या काठी
बाभूळगीताच्या फुलांच्या
सोडवत अनावर गाठी

चाहूलपण तुझे रिकामे
चाचपडती दिशांचे कोने
बाभळीच्या झाडाखाली
काट्यात निजते सोने

तुझा हात घेवून यावा
कवितेच्या व्याकुळ गावी
तुझ्यातल्या तुझेपणास
मग काळीज कविता द्यावी

या अंधार तुकड्यांना मी
देऊ कुठले रंग?
किती वाहू तुझ्या ओटी
व्याकुळ भाव अभंग?

या संव्याकूळ नभावर
आता उधळावे तु चांदणे
तुझ्या तनूलिपीचे
अस्पर्शी..निर्मळ गोंदणे....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२ .८. २०२२





अंधारल्या दिठीतील चांदणे


ताटातुटीचा मुहूर्त
आभाळास फुटे पाझर
दुर ढगाआड चांदणे
उगवत असता ओझर

तु रविकिरण घेऊन हाती
अर्ध्य कुणाला वाहिले?
एकट तळ्याकाठी तुझे
भास बिलोरी राहिले

मी वेढलो आहे क्षणीक
तुझ्या भासाचे धुके
गीत मनात झुरते
सांजार्ती होवून मुके

दे शब्द आवेगी मला
मांडण्या आभाळ व्यथा
दुर देशी मुसाफिर चंद्र
नेईल आपली कथा

पंचनद्यातुन वाहील संथ
आपली प्रितधारा
गंधसुगंधी होईल
दुरदेशाहून येता वारा

कोण उदासी गाते
दर्ग्यातुन जळते धुप
मी बिलगुन भास घेतो
आठवत चांदणरूप

हसते तळे उदासून
पाहून एकट मिठी
चांदणे भरून वाहते
अंधारलेल्या दिठी

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१ .८. २०२२











राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...