Monday, August 1, 2022

अस्पर्शी गोंदणे


विदग्ध दुःखात कलते
अंधाराचे उजळ सुनेपण
आभाळाच्या व्याकुळ हृदयी
चांदण्याचे होता रोपण

फुलविहीन बहर बकूळ
सजवी निकटवर्ती दुरावा
डोंगरतळी निजल्या पाण्याचा
भोग ओला सरावा

माझे शब्द विस्तारी मौन
या सुकुमार दुराव्या काठी
बाभूळगीताच्या फुलांच्या
सोडवत अनावर गाठी

चाहूलपण तुझे रिकामे
चाचपडती दिशांचे कोने
बाभळीच्या झाडाखाली
काट्यात निजते सोने

तुझा हात घेवून यावा
कवितेच्या व्याकुळ गावी
तुझ्यातल्या तुझेपणास
मग काळीज कविता द्यावी

या अंधार तुकड्यांना मी
देऊ कुठले रंग?
किती वाहू तुझ्या ओटी
व्याकुळ भाव अभंग?

या संव्याकूळ नभावर
आता उधळावे तु चांदणे
तुझ्या तनूलिपीचे
अस्पर्शी..निर्मळ गोंदणे....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२ .८. २०२२





No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...