Saturday, August 27, 2022

भावसुवास.....

अरण्यके गात वनी
कुठला साधू फिरतो?
विरहांकित मेघदूत जणू
निरोप देण्या झुरतो

दे ना तु ही एक
मजला एक परवली
मनात मी त्यासाठी
महाकाव्यही ठरवली

नदीतिरावर मी ही
वाचू का अरण्य?
की टिपून घेवू तुझ्या
नयनातील कारूण्य?

सुचेल कशी मला
तुझ्या महाकाव्याची भाषा?
या भोजपत्रावरती रेख ना
तुझ्या मनातली भावरेषा

ऐकू का मी करूणाष्टके
की पाहू तुझेच डोळे?
सुचतील झरझरून शब्द
रेखीव ..भावभोळे..

गाठशील मग तु ही
माझ्या कवितेचा तळ
जोजवेल कविता माझी
हृदयातली तुझ्या कळ

नसेलही कदाचित महाकाव्य
पण होईल तसा भास
तु पेरत रहा या शब्दात
तुझ्या असण्याचा भावसुवास.....

༄᭄प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२७ .८. २०२२

कालिदास समजवणा-या मधूरेस......









No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...